जबाबदारीच ओझं.. पुरुषांच्या नजरेतून.

Written by

 

जबाबदारीच ओझं.. पुरुषांच्या नजरेतून… भाग 1
?✒️ जयश्री कन्हेरे -सातपुते

सुधांशु आणि रजनीच काही तरी बिनसलं रुममधुन जोरात आवाज येत होता.. किती चिडचिड.. किती त्रागा… आणि शेवटी रजनी बॅग आणि 1वर्षाच्या मुलीला घेऊन रूमबाहेर आली . रागानेच सासू – सासऱ्यांकडे बघत घराबाहेर पडली…

काय झालं?

हा निर्णय इतका तडकाफडकी का घेतला?

रजनीला थांबवावं का? या प्रश्नाचा घोळ डोक्यात सुरु होता.. सविता काकू काही विचारणार त्या आधीच रजनी घराबाहेर पडली होती.

असं का झालं?  हे मुलाला विचारायची हिम्मत होतं नव्हती काका -काकूंची.

सुधांशु रुममधे, डोक दोन्ही हातात पकडून बेडवर बसला होता.. हे त्या रूमच्या अर्धवट उघड्या दरवाज्यातून दिसत होतं…            आतमध्ये जाऊन त्याला या विषयी विचारणं दोघांनाही योग्य वाटलं नाही जरा शांत झाला की विचारू असं मनातल्या मनात म्हणतं काका काकू एकमेकांकडे बघत होतें

बराच वेळ झाला तरी सुधांशु बाहेर आला नाही. तसाच बेडवर बसून होता.. कोणत्यातरी गहन विचारात डुबलेला…

रात्र झाली… जेवायला पण आला नाही.. दरवाजा तसाच होता अर्धवट.. आपल्या मुलाची घालमेल पाहून काका -काकू कासावीस होतं होतें..
हिम्मत एकवटून काकू त्याला जेवायला बोलवायला गेल्या..

“आई.. मला भूक नाही तुम्ही जेऊन घ्या”

इतकंच काय तो सुधांशु बोलला.. आई रूमबाहेर गेल्यावर त्याने रूमचा दरवाजा लावून घेतला…

काकूंच्या मनात कालवाकालव सुरु झाली.. काही बरेवाईट नको व्हायला म्हणून.. ????या विचारातच काका -काकू न जेवताच तसेच हॉलमधे बसून होतें…

आणि इकडे..

सुधांशुचा विचार सुरु झाला…

त्याला वाटलं आताच जावं व रजनीला मनात आहे ते सगळं सांगावं...

पण

हा पण नेहमी आडवा येतो व अनुत्तरितच राहतो..

    आज सुधांशूने त्याच्या भावनेला वाट मोकळी केली आणि बऱ्याच वर्षांनी त्याने हातात डायरी व पेन घेतला आणि मनातलं सर्व काही त्या निर्जन पानावर उमटवू लागला.. जणू काही तो रजनीशी बोलत आहे.. 

???
प्रत्येक वेळी मीच वाईट कसा ग…?

किती आणि कुणाला कुणाला समजून घ्यायचं मी…?
मला का नाही समजून घेत कुणी?

माझ्या मनाची घालमेल, मी असा का झालो याच कारण, माझ्या भावना… का नाही कळतं कोणालाच ??? ???
(विचारांची सुरुवात झाली ती माझ्या जन्मापासून. जेंव्हा मला काही कळतही नव्हतं. )

मुलगा झाला म्हणजे त्यांन आपल स्वप्न पूर्ण करावं ही माफक अपेक्षा वाटते आई -वडिलांना..
पण….

मला जन्मच का दिला हा प्रश्न पडतो मला?
नाही व्हायचं होतं मला डॉक्टर तरी ही

“बाबा आहेत न डॉक्टर.. मग तुही व्हायलाच पाहिजे ” असं जणू अलिखित नियमच असतो घरच्यांचा.. कीती मानसिक ताण असतो माझ्यावर… (मुलांवर )

जन्म झाल्याबरोबर.. “झाला बाई वंशाला दिवा… माझ्या म्हातारपणाचा आधार… माझे स्वप्न जे अधुरे राहिले ते आता हाच पूर्ण करणार ”

असे कितीतरी वाक्य मला समजत नव्हते तरी माझ्या कानांवर प्रहार करत होतें..

त्यानंतर मोठा होऊ लागलो तसा तसा… खेळण्याचा ओघ.. तोही डॉक्टर किट, कार, बंदूक,यांचाच.

का बर मला बार्बी नाही घेऊन दिली…?

का मला मुलींसारखं किचन सेट नाही घेऊन दिला?

मला ही कळलं असत न मुलीला किती त्रास होतो स्वयंपाक करायला, भांडे घासायला, खेळण्यातच सही पण संसार मांडायला.. या प्रत्येक बाबीतून मी गेलो असतो तर आज तुझ्या कष्टाची जाणीव असती ग मला.. असा धसमुसळे पणा नसता केला ग मी..तुझ्या मनाला व हाताला लागणाऱ्या चटक्याची जाणीव आधीच झाली असती मला..

शाळेत जायला लागलो तेंव्हा.. मुलं म्हणजे खास असतात मुलींपेक्षा असं बिंबवलं गेलं मनावर.. मुलांनी मुलीसमोर हार नाही मानायची… मुलींच्या मागे नाही राहायचं.. हेच शिकलो ग मी.

मुलगा होणं म्हणजे खुप महान असणं असच फिल व्हायचं मला. तिचं सवय आताही आहे ग.. तू माझ्या समोर जाउ नयेस.. माझं चुकलं तरी मी सॉरी म्हणायचं नाही... नेहमी तुझ्या समोर असलो पाहिजे या धावपळीत मीच कधीतरी एकटा राहील असं वाटलं नाही ग मला…

कॉलेज ला गेलो.. मग विचारायलाच नको.. मुली.म्हणजे अश्लील कमेंट पास करण्याचं व मनोरंजनाचं साधनचं होतं.. जाता येता.. टवाळ्या व टपोरी पणा.. त्यामुळे मुलीना आदर द्यावा लागतो हे कळलंच नाही मला.

घरी पण बाबा,आजी आजोबा आईला अशीच दुय्यम वागणूक द्यायचे त्यामुळे मुली व स्त्रिया याचं जग असंच असत उपेक्षित हेच नोंदले गेलं माझ्या मनावर.

त्यावेळेस जर कुणी कानउघाडणी केली असती माझी की.. ” त्या मुली सुद्धा कुणाची तरी बहीणी आहेत “ तर आजच चित्र वेगळं असत. माझ्या घरी आईला योग्य मान मिळाला असता तर आज तुला मान मिळवण्यासाठी झगडावं लागल नसत.

समोर डॉक्टर झालो तेंव्हाही तेच… “मुली व स्त्रिया या नाजूक असतात त्यांनी या क्षेत्रात येणेच अयोग्य आहे..” तो पर्यंत माझ्या मनावरचे थर.. एकावर एक रचून आता पक्के झाले होतें.. व मीच श्रेष्ठ असा अविर्भाव मनात ठाम मांडून बसला होता.

त्यानंतर तू माझ्या आयुष्यात आली. तेंव्हा आजीची जागा आईने घेतली व तू पुन्हा उपेक्षितच राहिलीस.. दुसऱ्या घरात येउन आपल सर्वस्व अर्पण करूनही तुला मिळालेला वागणुकीचा विचार केला तर राग येतो मला स्वतःचा… किती करतेस तू सगळ्यांसाठी .. तरीही तू उपेक्षितच असते..
यात माझा दोष नाही ग. या समाजाने जे अलिखित नियम बनवले आहेत न त्यांचा दोष आहे. मी पण माणूस आहे.. मला पण भावना आहेत..

 “तू मुलगा आहेस, तुझ्यावर जबाबदारी आहे, ती तू पूर्ण करायलाच पाहिजे, त्यासाठी मग तुझं मन मारून जगलास तरी चालेल.” अशा वाक्यांनी माझ्या भावना मेल्यात ग कधीच्या.. म्हणूनच मी तुझ्या भावनांची कदर नाही करू शकलो. किती प्रयत्न करतो मी सुधारण्याचा
पण…

पण…

हा पण नेहमी आडवा येतो..

आज बोललीस तू....”मी काय अपेक्षांचं ओझं पेलणार गाढवं आहे का?”

बरोबर आहे तुझं….तू नकोच बनू अपेक्षाचं ओझं वाहणार गाढवं…

त्या गाढवाला भावना नसतात ग..प्रेम भरपूर असते मनात पण व्यक्त करता येत नाही..

काळजी असते डोळ्यात ती दाखवता येत नाही… या समाजाच्या अलिखित नियमांनी माझे हातपाय बांधले गेले ग..
आज तू जाणीव करून दिलीस मला..

माझी, माझ्या अस्तित्वाची..

जे ओझ्याखाली कधीचच दबून मेल ग. बरंच झालं आज तू बोललीस पोटतिडिकीने तुझ्या मनाविषयी.. भावनांविषयी, अस्तित्वाविषयी…. कुठेतरी कोमात गेलेला माझ्यातला मी जागा झालो...

आज मलाही वाटत प्रत्येकाला जाऊन तुझ्यासारखाच जाब विचारावा..

“का केल्या माझ्या कडून अपेक्षा, का मला असं घडवलं,मी पण निरागस होतो… का हिरावला माझा निरागसपना, होऊ द्यायचं होतं माझ्या मानाने मला “शेफ” खुप आवडायचा मला स्वयंपाक करायला.? का बनवलं मला अपेक्षांचं ओझं पेलणार गाढवं?..

मी कुणाला विचारू हा जाब…?

कारण मी तर जबाबदार पुरुष न..

किती घुसमट होतें माझी या “जबाबदार पुरुष ” या शीर्षका खाली.

माझी ही तगमग कळेल का कुणाला….?

की जगासमोर तोऱ्यात मिरवणारा माझ्यातला पुरुष हा अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेल्या गाढवासारखा संपून जाईन एक दिवस…? ???

आज मला खरंच हलक वाटतंय या डायरीत मनातलं सर्व लिहून…

तरीही बघ रजनी मी तुला नाही बोलू शकलो हे…

कारण..

हो ग माझ्यातला पुरुष… तो कस काय बोलेल न. त्याला समाजाने असं मोकळ बोलण्याची परवानगी नाही दिली..

तुम्ही स्त्रीया रडून, मैत्रिणींजवळ बोलून मन हलक तरी करता ग.. तो हक्क ही नाही मला व माझ्यासारख्या पुरुषांना..

पुरुष रडत नसतात आणि मित्रांसमोर रडगाणं सांगायला काय मी स्त्री आहे..?

हे नियम सुद्धा समाजाने लावलेत बर आम्हाला. त्यामुळे आतल्याआत घुसमट होतें ग माझी
रजनी प्लीज समजून घे मला.. आणि परत ये ग आपल्या बच्चा सोबत ??

क्रमशः …..

आता….विचारांचा कल्लोळ झाला असेल वाचून तुमच्या मनात..

भांडण झालं.. रजनी गेली पण कारण कळलं नाही…, ???

डॉक्टर असलेला सुधांशु इतका हळवा आणि आतल्याआत घुसमटलेला कसा..?

डायरीत लिहिलेलं रजनी पर्यंत पोहचणार कस?

काय रजनी येईल परत?
अशा सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असेल तर नक्की कमेंट करा… दुसऱ्या भागात याचा खुलासा नक्की होईल..
आवडल्यास like करा.. एका पुरुषांची मनस्थिती मांडण्याचा प्रयत्न करतेय तर ती पुरुष वाचकांपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करा… ?जयश्री कन्हेरे -सातपुते ?

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत