‘जागर स्त्री शक्तीचा’

Written by

दुर्गा पूजा म्हणजे आदिशक्तीची पूजा, मातेची पूजा, अंबिका, जगदंबा आणि लक्ष्मीची पूजा. ही दुर्गा असते सगळ्यांच्या घरात अव्याहतपणे आपल्या लेकरा बाळांवर, आपल्या पतीवर, घरातील इतर सर्व लोकांवर, मायेची, स्नेहाची, प्रेमाची पखरण करणारी ती असते अखंड ऊर्जेचा स्त्रोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरातील सर्वांसाठी राबणारी माता असते. मुलांचा डबा, नवऱ्याचा डबा, त्यांचा नाश्ता, दूध, पाणी वेळेवर देणारी अन्नपूर्णा असते.

‘दुसर्यांसाठी झिजणे ‘हा आहे तिच्यातील स्थायिभाव.तिच्या अंत:करणात असतो अखंड प्रेमाचा, मायेचा झरा, घरात कोणी आजारी असेल तर त्यांच्यासाठी झटणारी ती सेविका होते.घराचं घरपणं टिकवून ठेवणारी ती ग्रहलक्ष्मी असते . घरातील सदस्य म्हणजे सासु-सासरे, दीर-नणंदा, आले गेले पै-पाहुणे या सर्वांचं हसतमुखाने स्वागत करणारी, त्यांचा पाहुणचार करणारी, घरातील इतर जबाबदाऱ्यांना हसतमुखाने सामोरी जाणारी, प्रत्येकाची आवड जपणारी, बँकेचे, पोस्टाचे, एलआयसीचे व्यवहार जपणारी, मुलांवर संस्कार करणारी , त्यांच्या अभ्यासात लक्ष देणारी ती सरस्वती असते.

सद्सद विवेक बुद्धी, संस्कारित मन, परंपरा जपणारी, कधी स्वतःच्या छंदात रमणारी,मुलांच्या छंदांना प्रोत्साहन देणारी, कधी असते ती मोठमोठ्या जबाबदारी सांभाळणारी कर्तव्यदक्ष अधिकारी, ती इंजिनिअर, डॉक्टर असते, ती शिक्षिका असते,शेतात कष्ट करणारी शेतकरीण असते, ती पूर्ण वेळ गृहिणी असते. हे पद तर तिला अति उच्च पदावर नेऊन ठेवतं. ती छोटी मोठी काम करणारी असते, ती कामवाली मावशी देखील असते, पण स्वाभिमान जपून असते . अडी-अडचणींवर मात करणारी, सदैव इतरांच्या मदतीला धावून जाणारी, सामाजिक भान जपणारी, काटकसर करून संसार सांभाळणारी, कामाचं उत्तम नियोजन करणारी, शांत, धीरगंभीर ,धीरोदात्त, चैतन्यमय उदात्त विचारांची, प्रगतीची स्वप्न बघणारी, स्वप्न दाखवणारी, स्रुजनशील, सहनशील अशी असते. तिच्यातील शक्ती सगळ्या चराचराला व्यापून टाकणारी असते. ती अखंड तेवत राहणारी ज्योत असते.

ती अन्यायाचा विरोध करणारी देवी चंडिका असते .स्त्रियांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचं निर्दालन करण्यासाठी कधी कधी तिला दुर्गा रूप दाखवावं लागत आणि हाती त्रिशूळ घ्यावं लागते. स्वतःच्या अस्मितेसाठी समस्त नारीवर्गासाठी तिला दुर्गा व्हावं लागतं. महिषासुर मर्दनासाठी तिला दुर्गेचे रूप द्यावं लागतं .

याच कारणासाठी हा आहे तिच्यातल्या शक्तीचा जागर. दुर्गा देवीचा जागर ……

या शक्तीची उपासना आपण नऊ दिवसात केलेय. नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवून. ही ज्योत प्रत्येकीने कायम आपल्या मनात तेवत ठेवायला हवी, एकजुट होऊन कुप्रथांचा विरोध करायला हवा.कायम जागरूक रहायला हव.

 

ही शक्ती तुमच्यात आहे,माझ्यात आहे.. …. हा आहे स्रीशक्तीचा जागर…….

विजयादशमीच्या खुप खुप शुभेच्छा सख्यानो …….

व्यक्त व्हा….

सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा