जावई माझा भला

Written by

अचल आणि परी कॉलेजपासून एकमेकांना ओळखायचे. पण मैत्री वगैरे अशी काही नव्हती त्यांच्यात. ‘हा आपला एक सिनियर आहे’ एवढं परीला आणि ‘ही आपली एक ज्युनिअर आहे’ एवढं अचलला माहिती होतं इतकीच काय ती दोघांची एकमेकांशी ओळख. आणि त्याहून जास्त खोलात शिरण्याची शक्यता दोघांकडूनही नव्हतीच.

परी तिच्या नावाप्रमाणे नाजूक, गोड गुलाबी अजिबात नव्हती, ना परिकथांमध्ये रमाणारी होती. तिची ध्येयं ठरलेली असायची आणि त्यांच्या पर्यंत जाण्याचा मार्गही. स्वतः जबाबदारी अंगावर घेऊन ती पार सुद्धा पाडण्याची ताकद बाळगणारी. पण अगदी हळवी. खास करून तिच्या आई बाबांच्या बाबतीत. आपण बरे आपला अभ्यास बरा अशी नाकासमोर चालणारी.
त्या विरुद्ध अचल. अतिशय चंचल. तोही नावाप्रमाणे अजिबात नाही. खेळ, स्पर्धा, गायन-वादन-नृत्य या सगळ्यात कायम झळकणारा पण कुठेही न स्थिरावणारा. सतत स्वतः हसणारा आणि इतरांना हसवणारा. त्याला गंभीर झालेलं पाहिल्याचं कोणाला आठवतही नसेल.
कॉलेज संपून दोघांचं आपापल्या क्षेत्रात भरारी घेणं चालू झालं. मग घरच्यांनी लग्नासाठी स्थळं बघायला सुरुवात केली आणि योगायोगानं दोघांना एकमेकांची स्थळं सुचवली गेली. घरच्यांनी प्राथमिक माहिती पडताळून ती पटल्यावर मुलांनी एकमेकांना भेटावं असं ठरवलं.
आश्चर्य म्हणजे या औपचारिक अश्या या पहिल्या भेटीत मात्र दोघांचेही सूर एकदम जुळले. Opposites attract म्हणतात तसं काहीसं झालं दोघांचं. स्वतःच्या आतलं लहान मूल जिवंत ठेवून निरागसता जपणारा अचल परीला भावला आणि आपल्यातल्या लहान मुलाला सांभाळून घेऊ शकेल अशी खंबीर, मितभाषी पण हळवी, प्रेमळ परी अचलला आवडली.
दोघांनीही घरी होकार कळवताच घरच्यांनीही भेटून पुढच्या गोष्टी पटापटा ठरवून घेतल्या. लवकरच साखरपुडाही केला छोटासा आणि नात्यावर शिक्कामोर्तब केलं. मग अर्थातच भेटी आणि येणं जाणं वाढलं. अचल परीच्या आणि परी अचलच्या कुटंबात अगदी विरघळून गेले लगेच.
लग्नाचा मुहूर्त लांबचा होता, पण तयारी सगळी चालूच होती. दोन्ही घरांमधून परी आणि अचलच्या संसाराला जमेल तितकी सगळी व्यवस्था लावून देण्याची धडपड चालू होती. दोघांना स्वयंपाक आणि घरकामाचं पद्धतशीर प्रशिक्षण दिलं जात होत. भेटी गाठी, जेवणं, मैफिली सगळी मजा चालू होती. आणि तश्यातच परीच्या बाबांना सिव्हिअर heart attack आला. परी आणि तिची आई खूप घाबरून गेल्या. परी कितीही खंबीर असली तरी बाबांच्या बाबतीत खूप हळवी असल्यानं घाबरली होती. पटापट निर्णय घेऊन बाबांना हॉस्पिटल मध्ये नेऊन उपचार सुरू होई पर्यंत ती धीरानं सगळं करत होती. पण अचल तिथं पोचला तेंव्हा मात्र तिचा धीर सुटला. अचलचे आई बाबा परीच्या आईला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि अचल आणि परी हॉस्पिटल मध्ये थांबले. बाबांना सोडून परी घरी जाणं शक्यच नव्हतं.
अचलनं तिला शांत केलं. आणि घरून आणलेलं जेवण गोड बोलून जेवायला लावलं. जाऊन डॉक्टरांशी बोलून त्यांनी सांगितलेली पुढची औषधं घेऊन आला.
सुदैवानं बाबांना लवकरच एका स्पेशल रूम मध्ये हलवलं आणि २-४ दिवसांतच घरीही सोडलं. काही पथ्यं, व्यायाम, औषधं आणि काळाजीच्या सूचना दिल्या होत्या डॉक्टरांनी.
घरी आल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता दार वाजलं. अचल आला होता. बाबांना मॉर्निंग वॉकला न्यायला! बाबांना म्हणाला, “दिवसभर मला ऑफिस असेल, तेंव्हा मी येऊ शकणार नाही. पण रोज सकाळी आणि संध्याकाळी वॉक मात्र नक्की आजपासून आपला. माझ्या आई बाबांना तसं प्रॉमिस करून आलो आहे मी. आता तुम्ही नाही आलात तर ते दोघं हसतील मला. येताय ना?”
परीचे बाबा हसून आवरून पटकन त्याच्यासोबत बाहेर पडले. वॉक करताना एका ठिकाणी थांबून ते म्हणाले, “मी कधी कोणाला सांगितलं नाही, पण तुला बघून मला वाटायचं, ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ असा आहेस तू. खूप बडबडया असल्यामुळेे तू कधीच गंभीर होऊ शकत नाहीस, वेळ प्रसंगी परीला आधार कसा देशील असं सतत वाटायचं मला. पण या माझ्या आजारपणात साफ खोटं ठरवलंस तू मला! तू खळखळता झरा असलास तरी उथळ अजिबात नाहीस हे मनापासून पटलं मला. तू केलेली सगळी धावपळ, परीला आणि तिच्या आईलाही तू आणि तुझ्या आई बाबांनी दिलेला आधार, त्यांची घेतलेली काळजी, प्रसंगी परीला ताण नको म्हणून ती नको म्हणत असतानाही केलेला खर्च, माझी घेतलेली काळजी हे सगळं बघून आज खरंच मनापासून म्हणावंसं वाटतंय, जावई माझा भला!”
दोघंही मनमुराद हसून पुढे चालायला लागले.
– अनुकूल

Article Categories:
प्रेम

Comments are closed.