जिंदगी और कुछ भी नही ‘तेरी मेरी कहाणी है

Written by

#जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है,..!

©स्वप्ना मुळे(मायी)…

तिची सारखी कुरकुर चालु,…”तू वेळच देत नाहीस रे मला,..सारखं तुझं ऑफिस,..तुझं काम,..अरे आम्ही दोघी आहोत की नाही तुझ्या आयुष्यात,…?”
तो मग सतत कामाने,..सगळ्या ओढावून घेतलेल्या लाईफ स्टाईलने त्रस्त,…तो चिडायचा मग तिच्यावर,”तुलाच हौस होती ना,…आई बाबांचं छान छोटंसं घर सोडून हाय सोसायटीत फ्लॅट मग त्याला शोभेल अशी गाडी,…घरात सगळं चकचकीत फर्निचर,…अग हे फुकट नाही आलंय ह्याच्या साठी घेतलेलं कर्ज फेडावं लागेल मला म्हणून एवढ काम करावं लागतं,…ते करून यावं तर तुझी कटकट सुरूच वेळ देत नाही ,…कुठं फिरायला नेत नाही,…नाहीच जमणार मला तुला वेळ द्यायला,…”
हे चार आठ दिवसाला चालणारे भांडणं पोळ्यावाल्या मावशींना पाठ झाले होते,…त्यांना ते पाहून वाईट पण वाटायचं,….. इतकं भरलं घर,…पण नवरा बायकोला बसुन बोलायला वेळ नाही,…पण कोणी तरी आता समजवायला पाहिजे नाहीतर या वयात एकमेकांच्या कुरघोडी मुळे दुखावतील आणि मग आयुष्य छान होण्यापेक्षा रटाळ होत जाईल,…पण सांगणार कसं आपण नोकर माणसं बोलणं बरं दिसणार नाही,…पण चार दिवस रहायला आलेल्या साहेबाच्या आई वडिलांमुळे प्रश्न जरा सुटला,… त्या दिवशी ती नेमकी भाजीला आणि साहेब ऑफिसात गेल्यावर काढलाच मावशींनी विषय,…”सारखे भांडतात जरा लक्ष घाला नाहीतर विकोपाला जाईल म्हणून कानावर घातलं तुमच्या,..!”
आई बाबा समजदार होते,…नव्या पिढीच हे सगळं हाय फाय जगणं,.. फार विचार न करता घेतलेली कर्ज त्याचे येणारे ताण त्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात निर्माण होणारी दरी सगळं अभ्यासुन होते,…पण दोघांचा हट्ट म्हणून दिली होती फ्लॅट ला परवानगी पण नंतर घाई घाईने स्टेट्सच्या नावाखाली फर्निचर,गाडी ह्यासाठी न पेलणाऱ्या कर्जातून हे प्रश्न उदभवणार होतेच,…पोळ्यावाल्या मावशींना म्हणाले ,”बरं झालं तुम्ही सांगितलं,… आम्ही बोलु दोघांशी “,…मावशी म्हणाल्या खरंतर माझ्या सारख्या नोकर माणसानं लक्ष घालू नाही पण आजकालच्या या झटपट श्रीमंत होणाऱ्या संसारात माझा पोरगा होता त्याला असंच समजावलं दुनियेची चकाकी पाहून सगळं काही आपल्या घरात आलंच पाहिजे असं नको,…आपल्याला झेपेल तसा संसार मोठा करत न्यायचा म्हणजे नात्यांवर पण ताण येत नाही,…बरोबर ना काकु,..?हो बाई तुम्ही म्हणता ते अगदी खरं,.……अहो एक एक वस्तु काटकसर करून घेण्यात काय आनंद होता,… आता हे सगळं आणून टाकतात घरात आणि मग कर्ज फेडायचा ताण घेऊन बसतात भांडत,…बोलु आम्ही त्या दोघांशी,…
रात्री जेवणं आटोपताच बाबांनी त्याच्याशी चर्चा केली,…कुटुंबाला वेळ देणं हा मुद्दा समजावला,… अरे उद्या ती पोर मोठी होऊन जाईल,…तिला घोडा घोडा करण्याच,तिच्या सोबत लपाछपी खेळण्याचं तिला कधीतरी जेऊ घालण्याचं सुख मग किती पैसे दिले तरी मिळवू शकणार नाहीस तू,……आणि सुनबाई स्वतःच्या मनाला आवर घालून आहे त्यात छान संसार करता येतो,…घरातली बाई शांत,समाधानी असेल तर पुरुष तरी कशाला एवढे कर्ज डोक्यावर घेऊन आयुष्य भर तणावात राहील,…ज्याला सहजतेने जमतंय त्याला करू द्या ते पण ज्यांना नाही त्यांनी उगाच ओढून ताणून सुख मिळवू नका,…कारण त्यात तुम्ही एकमेकांना गमवाल शेवटी आयुष्य काय असतं लग्ना नंतर,…सासुबाई कॉफीचे कप स्वयंपाक घरातुन घेऊन गुणगुणत आल्या,…
“जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है,…”
सासु सासरे दोघे एकमेकांकडे बघुन हसले आणि ह्यांना दोघांना उगाच हलकं हलकं वाटलं आणि दोघांचे डोळे एकमेकांकडे बघताना पाणावले,…कदाचित कुठे तरी भरकटत असलो की सावरणारी मोठी माणसं हवीच ना,…असंच त्याला जाणवलं,…😊
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद…

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा