जिवलगा…..तू धावू नको रे उगा !!

Written by

काय ग त्याच्या नोकरीचं काही झालं का नाही??, श्वेताच्या आईने फोनवरून विचारलं.

हो ग, चाललेत प्रयत्न मिळेल लवकरच…

अगं दोन महिने झाले श्वेता, कधी मिळणार?

तुझी ओढाताण नाही बघवत बाई मला!

अगं आई, कसली ओढाताण?? एवढे वर्ष तर नोकरी करत होता ना तो? बसला दोन महिने घरी केला आराम तुमच्या भाषेत तर ज्याला त्याला एवढा त्रास का झाला पाहिजे??

जिथे कामाचा आनंदच नाही, नवीन कल्पनांना वाव नाही, तिथे उगाच मन मारून काम करत बसण्यात काय अर्थ??

ते काय असेल ते असेल, आम्हाला नाही बाई पटत, कर्त्या पुरुषाने घरी बसून राहणं, असं म्हणत श्वेताच्या आईने नाराजीने फोन ठेऊन दिला.

श्वेता आणि अमोल यांचं एक छोटंसं छान कुटुंब.

दोघेही नोकरी करणारे. पण हल्लीच दोन महिन्यांपूर्वी अमोलने नोकरीतील तणावाला आणि चढाओढीला कंटाळून राजीनामा देऊन टाकला.

म्हणजे खरंतर श्वेतानेच त्याला द्यायला लावला.

नोकरी तशी चांगल्या मोठया कंपनीत होती, पण अंतर्गत राजकारणाचा त्याला फार त्रास व्हायचा. बरेचदा मनाविरुद्ध काम करण्यासाठी दबाव आणला जायचा त्याच्यावर.

हे सारं तो श्वेताशी शेअर करायचा. खूपदा डिस्टर्ब असायचा. नको ती नोकरी असं वाटायचं त्याला.

पण आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी एवढ्या मोठ्या कंपनीतली नोकरी सोडावीशीही वाटत नव्हती त्याला.

मात्र याचा अमोलच्या तब्बेतीवरही परिणाम होऊ लागला होता. कमी वयातच त्याला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला.

श्वेताला हे काही पाहवत नव्हते, तिने त्याला खूप समजावले, तू नीट असशील तर सगळ्याला अर्थ आहे. मला नाही बघवत तुझी अशी कोंडी. मला माहितीये आपल्या कुटुंबासाठी तू हे सारं सहन करतोयस, तुझ्या मनाविरुद्ध तिथे नोकरी करतोयस.

पण आपण थांबुया ना थोडं. तुझ्या शिक्षणाने आणि अनुभवामुळे तुला आणखी कुठेही चांगली नोकरी मिळेल.
मला तर वाटतं, तू ब्रेक घेवून थोडा फ्रेश हो.

नुसतं धावण्याला काय अर्थ आहे रे!!

आणि माझी नोकरी तर आहे, सेविंग्जही आहेत आपले. मग का ताण घ्यायचा उगाच?

मला जर असा त्रास होत असता नोकरीत, तर तू करू दिली असतीस का? माझ्या काळजीने सोडायला सांगितली असतीसच ना?

अगं हो, पण मी नोकरी सोडून घरी राहिलो तर लोक काय म्हणतील श्वेता?
हो, लोक बरंच काही म्हणतील. म्हणू देत त्यांना.

पुरुषांनी ब्रेक घेतलेला चालत नाही लोकांना. तो लगेच आळशी, कामचुकार ठरतो.

पण त्याचेही काही प्रॉब्लेम असू शकतात ना? शेवटी मन त्यांनाही आहे ना??

श्वेताने त्याला भरीस पाडलच नोकरी सोडायला.

दोन महिने तर विचारही करायचा नाही नोकरीचा. मी मॅनेज करेन सर्व, तू स्वतःकडे बघायचस. तुला आवडेल ते कर, मस्त फ्रेश हो आणि मग नव्याने सुरुवात कर.

हे जरी सुखी होते, तरी बाहेरच्या लोकांनाच नाही तर जवळच्या नातेवाईकांनाही त्रास व्हायला लागला; एका पुरुषाने नोकरी सोडून मजेत घरी राहण्याचा.

कोणीही फोन केला की पहिला प्रश्न हाच, लागली का नोकरी?

बरं समजावून पण कळत नाही अशांना की नोकरी मर्जीने सोडली, काढलं नाही, आणि लगेच दुसऱ्या नोकरीत अडकण्याची घाईही नाही. कितीही सांगितलं तरी त्यांच्या  मनात काळं-बेरं येतच येतं.

एवढंच काय पुरुष दोन दिवसापेक्षा जास्त घरी दिसला तरी सगळ्यांच्या भुवया उंचावतात, हा घरी कसा?

अरे , एवढी सक्ती का?? त्याने सतत कामावरच दिसलं पाहिजे का?? तो कधी सहजच घरी नाही राहू शकत का?? आणि कंटाळला तर शक्य होत असेल, तर ब्रेक नाही घेऊ शकत का??

श्वेताने अमोलची तगमग बघून घेतलेल्या निर्णयामुळे अमोल स्वतःला वेळीच सावरू शकला.

या दोन महिन्यात इतर कोणतही दडपण मनावर नसल्याने त्याच्या मनात नव-नवीन कल्पनांचे धुमारे फुटत होते, अगोदरच्या बंदिस्त वेळापत्रकाने त्याच्यातली सारी उर्मी मारून टाकली होती.

उत्साही मनाने त्याच्या अंगातही उत्साह आणला.

या शारीरिक आणि मानसिक विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तो नव्या उत्साहाने सज्ज झाला, जगाकडे एका नव्या दृष्टिकोनातून पाहायला.

लढत तर तो तेव्हाही होता आणि नंतरही कायम लढायचंच आहे, पण आता नव्या जोमाने आणि नव्या कल्पना हाताशी घेऊन तो आव्हाने पेलायला पूर्णपणे तयार होता.

खरंच, साचलेपण आलं आयुष्यात की माणसानं थोडं थांबणं गरजेचं असतं!!

शक्य असेल तर प्रत्येकानेच थोडा काळ विश्रांतीचा थांबा घ्यावा, आपल्या जीवलगांनाही वेळीच रोकावं.

जीव तोडून धावत राहतात आपलीच माणसं आपल्यासाठीच, आणि बरेचदा वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं, अरे थांबवायला पाहिजे होतं आपण!!

नोकरीतील तणाव, चढाओढीत घुसमटून जातात आपलीच माणसं आपल्यासाठीच, आणि बरेचदा वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं, अरे समजायला पाहिजे होतं आपण!!

बघा बरं विचार करून, पटतंय का!!

©️स्नेहल अखिला अन्वित

फोटो साभार: गुगल

लेख आवडल्यास लाईक, कमेंट आणि फॉलो नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा?

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा