जुना झालास तू आता…!!!

Written by

शेवटपर्यंत वाचा…

आज पुन्हा एकदा तो दिसला…
थोडा जीर्ण झालेला, अनुभवाने त्याच्यावरील सुरकुत्या अजूनच ठळक दिसत होत्या..
एका रागीट कटाक्षाने कितीतरी वेळ माझ्या समोर होता…
माझंही बोलायचं धाडस होईना…मग तोच म्हणाला…
“गरज संपली आणि तू मलाही सोडलंस ना? आता खुश असशील…नवीन हातात आलाय तुझ्या…”

“माफ कर, पण परिस्थितीच अशी होती की तुला सोडणं मला भाग होतं… आणि आपलं नातं 2 वर्षाहून अधिक टिकणार नाही हे तुलाही माहीत होतं आणि मलाही…”

“तुलाच वाटतंय तसं, माझी तयारी होती तुझ्यासोबत आयुष्यभर राहायची…आपल्या शेवटच्या सहवासात किती दोष दिलेस तू मला, मान्य आहे की माझ्यात बऱ्याच त्रुटी होत्या, आणि त्या वाढतच होत्या…पण त्यावर उपाय म्हणून तू नवीन शोधलास? मला योग्य ठिकाणी नेलं असतं, माझ्यावर योग्य ते उपचार झाले असते तर मीही दीर्घकाळ राहिलो असतो तुझ्यासोबत…पण तुला कंटाळा आलेला माझा…नकोसा झालेलो मी…काय काय बोलत होतीस मला…तुझ्यात हे नाही तुझ्यात ते नाही…आता काळ बदलला आहे, नवीन शोध लागत आहेत…ही काय कारणं होती??”

“माफ कर मला, पण काळासोबत बदललं नाही तर मागे राहिले असते मी…मैत्रिणी, नातेवाईक हसले असते मला…आणि तुही जास्त दिवसांचा सोबती नसशील हे माहीत होतं मला आणि म्हणून दुसऱ्याचा आधार घेणं मला भाग होतं…”

“सोड ग तू, तुला आठवतंय? तुझ्या वेगवेगळ्या हावभावांचे कितीतरी फोटो तू माझ्याकडून काढून घेतले होते, कोणाला निरोप द्यायचा झाला तर ते कामही माझ्यावर सोपवायचीस आणि मीही वेडाच होतो, तुझी सगळी काम करायचो…अगदी तुला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते जवळ चांगलं हॉटेल कोणतं याची माहिती देण्यापर्यंत….माझा वापर करून तू मैत्रिणींसमोर स्वतःची बढाई मारायचीस, मला तुझ्या मैत्रिणींना दाखवून किती अभिमानाने मिरवायचीस…तुझ्या वडिलांना मात्र मी पसंत नव्हतो, तुझ्यासोबत किती वेळा त्यांनी मला पकडलं होतं आणि त्यांचा ताब्यात मला ठेवलं होतं…पण शेवटी तूच गयावया करून माझी सुटका कारायचीस…”

“ए… बस्स झालं तुझं आता…तू आता outdated झाला आहेस आणि तुझी स्क्रिनसुद्धा नीट दिसत नाहीये…मला नवीन मोबाईल घेणं भागच होतं…”

असं म्हणत आपल्या जुन्या मोबाईल ला गप बसायला सांगून तो मोबाईल परत अडगळीत ठेऊन दिला….

 

(असेच लेख वाचण्यासाठी खालील फेसबुक पेज ला नक्की लाईक करा)

https://m.facebook.com/irablogs/r

Article Categories:
विनोदी

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा