जेव्हा ती सासू होते…

Written by

फार कमी वेळा सासू सुनेचे नाते चांगले असल्याचे दिसते, नशिबाने वैयक्तिक रित्या मला खूप चांगल्या सासूबाई मिळाल्या आहे. पण आजूबाजूला जेव्हा सुनांकडून त्यांचा सासवांचे गाऱ्हाणे ऐकायला येतात तेव्हा मन सुन्न होऊन जाते. जोशी काकू, अत्यंत विनोदी आणि हसरा स्वभाव, प्रत्येक गोष्ट.. मग ती कितीही गंभीर असो, अत्यंत मजेशीर रीतीने त्या घेऊन जात असत. पण जेव्हा सून घरात आली तेव्हा त्यांच्यात एकंदरीत आणि अचानक बदल झाला तो पाहून विचित्र वाटले. नोकराला जशी हाक देतो तशी तुसड्या शब्दात तिला हाक देत, प्रत्येक गोष्टीत नाक खुपसत आणि सतत सल्ले. तुला काय येतं, तुला जमत नाही, आजकालच्या मुलींना नाही येत काही..असं म्हणत तिला विचित्र अशी वागणूक मिळायला लागली. जोशी काकुंचं येणं जाणं कमी झालं, आणि कधी भेट झालीच तर नजरेत ते समाधान, तो विनोदी स्वभाव दिसत नव्हता.. प्रत्येक वाक्यात सुनेचे काहीतरी गाऱ्हाणे सुरू व्हायला लागले. असे कितीतरी अनुभव आहेत माझ्या आजूबाजूला दिसणारे, स्त्री ची जेव्हा सासू होतें तेव्हा काय काय उलथापालथ होऊ शकते ते दिसले.  एखाद्या घरात सून यायच्या आधी खाण्यापिण्याच्या बाबतीत कोणीही सजग नसेल, किंबहुना जेवणाची वेळ सुदधा शिळं खाऊन आनंदाने मारून नेत असणारे सून आल्यावर एकदम खवय्ये बनतात. आम्हाला असंच लागतं, जास्त फ़िक चालत नाही, नाश्ता हवाच, तोही गरमच. एक सुकी भाजी एक ओली भाजी हवीच. हे सगळं करताना सुनेची दमछाक होत असेल, आणि एखाद्या दिवशी एखादा साधा पदार्थ केला तरी शिळं खाऊन वेळ मारणाऱ्या घरातल्या लोकांना एकदम पोटात कावळे ओरडल्यासारखे होतात.  एक मैत्रीण, नोकरी करणारी..ती सांगत होती की नोकरीवरून घरी आल्यावर प्रचंड भूक लागलेली असे, पण सासूची ताकीद असायची की आल्या आल्या पूर्ण झाडाझुड आणि घर आवरूनच खायला बसायचं. मुळात आपली सून हुषारीच्या बाबतीत आपल्या वरचढ जे सासूला सहन नव्हते आणि म्हणून सुनेला कसं आपल्या पुढे झुकवायचं आणि कसं तिला मान खाली घालायला लावायची हा एकच प्रयत्न तिच्या सासू पुढे असायचा.  सून आली म्हणजे कित्येक सासवा कामातून निवृत्ती घेतात, हरकत नाही..पण ती इतकी की सून नोकरीला गेल्यावर किचन ओट्यावर कांद्याची टरफली पडलेली असतील तरी ती संध्याकाळ पर्यंत पडू द्यायची आणि सून आल्यावर तिने उचलायची. आपण फक्त बसून राहायचं, आयता चहा, पाणी आणि जेवण हातात घ्यायचं… बसून बसून सासवा कंटाळत असतील पण सून नोकरीवरून आल्यावर दमत असेल, आल्यावर धावपळ होत असेल तिची स्वयंपाकाची.. मग आपण जरा तयारी करून ठेऊ स्वयंपाकाची, निदान लसूण सोलून ठेऊ, कधीतरी स्वयंपाक करून तिला आयते जेवायला देऊ असा विचार कधी कोण्या सासूच्या मनात आला नसेल, किंबहुना आम्ही सुनेला नोकरी करू देतोय तर उपकार करतोय अशा भावनेने तिची होणारी धावपळ गमतीने पाहणारेही खूप लोकं आहेत.  एका डॉक्टर मैत्रिणीचा अनुभव, तिच्या हॉस्पिटल मध्ये प्रचंड गर्दी असे, आणि सेवेचं व्रत उचललेल्या तिला सगळं सोडून जावं लागायचं… पैसे पुरेपूर… घरातली कामं व्हावी म्हणून बाई कामाला लावूया असं तिने घरी सांगितलं. “आम्हाला नाही बाई बायकांच्या हातची कामं आवडत, घरातल्या सुनेनेच करायला हवं सगळं”  आपल्या सुनेच्या हुषारीला लोकं मानताय, तिचा आदर करताय हे सासूला सहनच होत नसायचे, मग मुद्दाम ती आवरून जायला निघाली की “तेवढा झाडू मारून घे…मला खीर खायची होती… तेवढी चटणी केली असती…” असं मुद्दाम काहीतरी कारणं काढून तिला घरातच कसं गुंतवून ठेवायचं हे करताना तिच्या सासूला प्रचंड मजा यायची…शिकलेली, नाव कमावणारी आणि जिला लोकं खूप मानतात त्या मुलीला आपण कसं आपल्या बोटावर नाचवतोय हेच तिच्या सासूला साधायचं होतं. सुनेकडे पाहायचा दृष्टिकोन खूप वेगळा होऊन जातो, मुळात आपल्या मुलाच्या अधिकारात कोणी भागीदार आयांना सहन होत नाही, सुनेला कधी मुलाने काही गिफ्ट दिलं तर तुलना होऊ लागते, मला तर नाही दिलं कधी…तिला दवाखान्यात नेलं तर माझा गुडघा दुखतोय कधीचा.. मला नाही नेलं कधी…सुनेच्या माहेरी मुलाने कधी स्वारस्य दाखवलं तर मुलाला हिने तोडलं, तिच्या घरचे जास्त प्रिय दिसताय याला..हिच्या आईनेच काहीतरी भलतं सलतं शिकवलं असेल तिला…असे अगणित प्रसंग मी ऐकलेत.

काही अशाही सासवा आहेत ज्यांना आपला मुलगा आणि सून एकत्र असलेलं सहन होत नाही, ती दोघे बोलत असताना मधेच बोलणे, त्यांना एकट्यात बोलू न देणे, कुठे बाहेर जायला परवानगी न देणे, जायचे झाल्यास काहीतरी कुरकुर करत बसणे अशा गोष्टी चालतात.

अशा सुनेला चार लोकांमध्ये नेऊन तिचा अपमान करायला काहींना आवडतं, “हे काय घातलंय, साडी सुद्धा नीट नेसता येत नाही हिला, चल इकडे ये, पाया पड यांच्या, त्यांचाही पड… त्यांना हळद कुंकू लाव ना बाई..पाहुणे आलेत, जा पाणी आण पाणी आण, चहा चहा…आता सरबत… नाश्ता आन नाश्ता आन….तिखट झालं वाटतं,.. ऐकलं का तिखट झालंय.”

एका मैत्रिणीचा अनुभव…पाहुणे येतात ते विचारपूस करायला, गप्पा मारायला.. पण त्यांची इतकी सरभराई होते की आपण हॉटेल मध्ये आलोय की काय हा त्या पाहुण्यांना प्रश्न पडतो, विचारपूस तर दूरच.. पण सगळा वेळ पाणी ने, ग्लास उचलून आण, चहा दे, कप परत आण, नाश्ता दे, डिश उचलून आण…यामध्ये आणि सासूच्या instructions मध्ये जातात. आणि निरोप देतानाही..” सरबत जरा गोडच झालेलं, चहात साखर कमीच होती नाही का..आमच्या हिला जमत नाही हो काही..” पाहुण्यांना चवही आठवत नाही पण पुन्हा यायचं नाही हा विचार करून ते परत जात असतील.

सून घरात आणली म्हणजे आपल्या हातातली कटपुतली असावी, आपण सांगू तसं वागायला पाहिजे, आपल्याला आवडेल तसं राहायला पाहिजे… यात तिला काये आवडतं या प्रश्नापुढे आपल्या घरात असंच लागतं, आणि या घरात आलीये मग इथे जसं सांगितलं जाईल तेच करायचं… एकंदरीत तुला घरी आणलंय म्हणजे तुझ्या आई बापाला जड झालेलं ओझं आम्ही कमी करून तुमच्यावर उपकार केलेत अश्या भावनेने सासवा वावरत असतात.  आपण जेव्हा सासू होऊ तेव्हा यातलं काहीही करणार नाही आणि आपल्या मनःशांतीत फरक पडू देणार नाही केवळ असा निश्चय आपण या घडीला करू शकतो.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत