…जेव्हा मातृत्व जिंकते(चोर सापडतो)भाग 2 अंतिम

Written by

रश्मी या केस चा विचार करत घरी गेली.

तिने सार्थक सोबत, म्हणजेच आपल्या नवऱ्या सोबत या केस ची चर्चा केली, तो म्हणाला..

“रश्मी ही केस सुटली नाही तर राजेश खरंच काहीतरी विपरीत कारेल, तो मोठा गुंड आहे आणि त्याच्या बहिणीच्या घरात चोरी झालेली तो कशी सहन करेल??”

“सार्थक, चोर सापडलाय…पण मी त्याचं नाव सांगायला माझं मन कचरतंय…”

“काय? चोर सापडला?? कसा?? आणि कोण आहे??”

“सार्थक, मी संपूर्ण माहिती काढली, शांता खंडोबाच्या मंदिरात गेली होती, आपल्या मुलासाठी… तिच्या मुलाला एका असाध्य रोगाने पछाडलं होतं आणि दवाखाण्याचा खर्चही खूप होता…शांता देवळातून आली आणि परस्पर निकिता च्या घरी गेली..घरात बबन काम करतोय हे पाहून गपचूप तिजोरी ची चावी शोधली…आणि हार घेऊन ती पसार झाली…ती खंडोबाच्या देवळातून आलेली, तिच्या शरीराला खंडोबाच्या देवळातील हळद आणि कपाळाला अंगारा चिटकलेला होता, हार काढण्याच्या झटापटीत तो फरशीवर थोडा विखुरला गेला…”

“अगं पण हळद योगेश च्या पिशवीतलं असू शकतं आणि राख तिच्या नवऱ्याच्या सिगारेटचीही असू शकते…”

“बरोबर, पण अजून एक पुरावा होता..जमिनीवर चिकट पदार्थ…”

“मग बबन च्या हातात दुधाचा ग्लास होता तोही असू शकतो…”

“नाही, दुधात साखर असली की मगच इतका चिकटपणा येतो, निकिता ला साखर व्यर्ज होती…”

“मग काय होतं ते??”

“शांता चं बाळ चार महिन्याचं, अर्थात पूर्ण आईच्या दुधावर…शांता दिवसभर देवळात होती, घरी तिच्या आईला वरचं दूध बाळाला द्यायला सांगितलं…अश्या आईचा पान्हा कितीतरी तास बाळाला पाजलं नाही तर आपोआप सुटतो…आणि चोरीच्या वेळी तिला आपल्या बाळाच्या आयुष्याची आठवण झाली आणि तिला तिथेच पान्हा फुटला…तिचं दूध जमिनीवर ओघळलं…तिच्या मनात खुप चलबिचल होती, चोरायचं की नाही या द्विधा मनस्थितीत फक्त हार घेतला.. बाकीचे दागिने तसेच ठेवले… ही चलबिचल अश्या कठीण प्रसंगी एका आईच्या मनात होणं साहजिक आहे”

“बापरे रश्मी, किती सुक्ष्म निरीक्षण आहे ग तुझं…”

दुसऱ्या दिवशी निकिता धावत पोलीस स्टेशन ला आली, आपली पर्स एका खुर्चीवर ठेवली आणि दुसऱ्या खुर्चीवर ती सावरत बसली…

“मॅडम, अहो हार मिळाला…माझ्या तिजोरीत पुन्हा जिथल्या तिथे तो सापडला…”

“शांता ने असं का केलं?? रश्मी मनातल्या मनात विचार करू लागली…”

“चला, बरं झालं, आता टेंशन घेऊ नका..आराम करा…”

निकिता घरी गेली, घरी गेल्यावर शांता ला तिने सांगितलं,  …इतक्यात राजेश तिथे आला…

“दादा, अरे हार मिळाला…”

“अरेवा…कमालच झाली की…पण त्या रश्मी मॅडम माझ्या डोक्यात गेल्या आता…चोर हार परत ठेऊन जातो तरीही यांना चोराचा पत्ता लागत नाही?? नाही त्या बाईची नोकरी घालवली तर नावाचा राजेश नाही…”

“अरे दादा तू असलं काहीही करणार नाहीये, हे बघ त्यांची काय चूक यात??”

निकिता ने राजेश ला समजवायचे निरर्थक प्रयत्न केले, निकिता चं बोलणं पूर्ण होत नाही इतक्यात तो तिथून निघाला…

शांता आता सैरभैर झाली, तिने तडक पोलीस स्टेशन गाठलं…

“मॅडम, म्याच चोर हाय, बोलून टाका सर्वासणी… तुमचं बी लेकरू हाय, त्याचं पोट भराया नोकरी लागल की तुमास्नी…

माझं काय, लेकराच्या काळजीपोटी मला म्होरचं काय बी दिसलं नाय बघा…देवाला साकडं घातलं.. हार चोरला, शप्पथ सांगते आजपतुर म्या कधीच चोरी केली नाही…पण लेकराच्या जीवसाठी कसाबसा हार घेतला पहा…  दुसऱ्या दिवशी डाक्टर ने रिपोट तपासली अन म्हणतो रिपोट नार्मल आलेत, चमत्कार झाला म्हणे…आता लेकराला कसला बी आजार नाय…खंडोबाची किरपा…

नंतर त्या हाराचा मला लय पस्तावा झाला पाहा, उद्या माझं लेकरु बी चोरी कराया शिकलं म्हंजी?? काय इज्जत राहील लोकांत?? आणि निकिता बाईसाहेब बी त्यांच्या पोटातल्या लेकरसाठीच तरतूद म्हणून ह्यो दागिना बनविला व्हता ना… म्हणून हार मी जिथल्या तिथं ठेऊन आले पहा..

पण मॅडम तुमच्या नोकरीवर गदा येणार असल तर मी स्वतः कबुली जबाब देते, 2 महिन्याचं पोर सोडून येतांना तुमच्यावर काय बितत असल ठाव हाय मला… माझं नाव सांगा त्या राजेश भाऊ ला…

“शांता, चोरी तू केली हे ठाऊक होतं मला, पण एका आईच्या मजबुरीला आणि बाळाच्या आयुष्याची भीक मागणाऱ्या आईच्या कृतीला मी गुन्हा नाही म्हणू शकत…तुझं नाव कुठेही बाहेर येणार नाही..”

शांता चे हावभाव एकदम बदलले, इतकं वेगाने बोलणारी ती एकदम स्तंभित झाली…रश्मी शी नजर लावून “मग का??” अश्या प्रश्नार्थक नजरेने ती रश्मी कडे कितीतरी वेळ पाहत होती…

“काय?? तुम्हाला समजलं होतं?? लई हुशार हाय तुम्ही… कसं हुडकलं तुमास्नीच ठावं…आवं मॅडम पर त्यो राजेश….??” 

“त्याला मी बघून घेईल, भाऊ आहे माझा, माझं नाही ऐकलं तर कान धरून ऐकायला लावेल…”

पर्स विसरलेली निकिता परत पोलीस स्टेशन ला पर्स घ्यायला आली होती आणि तिने सर्व संभाषण बाहेर उभं राहून ऐकलं होतं…

शांता च्या डोळ्यात अपराधीपणाचे भाव आले…निकिता चे पाय धरत ती म्हणाली..

“बाईसाहेब माफ करा मला, म्या कधीच तुमच्याशी बेईमानी केली नाय पर ही येळच अशी व्हती की….”

तिचं बोलणं अर्ध्यात तोडत निकिता म्हणाली…

“शांता, तू चोर नाहीस, आपल्या बाळासाठी सर्व सीमारेषा तोडून बाळाला जिंकणारी हिरकणी आहेस…ही गोष्ट आता या खोलीत बसलेल्या आपल्या तिघींशिवाय बाहेर कुठेही जाणार नाही…”

बाळासमोर आदर्श उभा करावा म्हणून लढणारी धाडसी रश्मी, लेकराला जीवनदान मिळावे म्हणून धडपडणारी शांता…आणि आई होण्याची चाहूल लागतांनाच आई पणाची पूर्वसमज प्राप्त केलेली निकिता…असे मातृत्वाचे द्वंद्व पोलीस स्टेशन सारख्या कायद्याच्या चौकटीत सुरू होते…

पण ना कुठला कायदा, ना कुठले नियम…या कायद्यांच्या आणि नियमांच्या चौकटीत जिंकले ते केवळ मातृत्व…

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा