….जेव्हा मातृत्व जिंकते (एक रहस्य कथा)

Written by

“कोणाची हिम्मत झाली माझ्या बहिणीच्या घरात चोरी करायची??” 

राजेश हाताच्या बाह्या वर करत तावातावाने संताप करत पोलीस स्टेशन मध्ये घुसला…

पोलीस ऑफिसर रश्मी ने राजेश ला शांत केलं आणि बसायला सांगितलं…

“हे बघा मॅडम, खुप झाला आता…तुम्ही चोराच्या तपासात टाळाटाळ केली तर याद राखा, पोलिसांच्या बदल्या आमच्या सहीने होतात हे लक्षात ठेवा…येतो…”

अशी स्वतःची प्रौढी मिरवत आणि धमकी देऊन राजेश तिथून निघून गेला…

रश्मी च्या चेहऱ्यावरचे हावभाव जराही बदलले नाही, तिच्यावर राजेश च्या बोलण्याचा काहीच असर झाला नव्हता..

रश्मी च्या केबिन मध्ये बसलेले निकिता, बबन, शांता, निलेश आणि केदार हे सगळं बघत होते…

रश्मी एक तडफदार पोलीस ऑफिसर, कित्येक गुंडाच्या मुसक्या तिने आवळल्या होत्या…

एक अत्यन्त साहसी आणि शिस्तप्रिय अशी पोलीस म्हणून रश्मी चा गवगवा होता, लग्नही अश्या माणसाशी केले की जो तिच्या पेशाला सांभाळून घेऊ शकेल… लग्न झाले, काही वर्षांनी मातृत्वाची चाहूल लागली, 7 महिन्यापर्यंत मोठं पोट घेऊन कामं करायची, अश्या अवस्थेतही गुंडांची कॉलर पकडून त्यांना सटासट टाकायची…

आई झाल्यावर 2 महिन्यात ती कामावर रुजू झाली, प्रखर अश्या रश्मी मध्ये आता एक ममतेने परिपूर्ण अशी आई दिसू लागली होती, बाळाला सोडून जातांना तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं, एरवी कधीही ती इतक्या सहजासहजी रडत नसे, बाळापासून दूर राहणं कठीण झालं, मग पोलीस स्टेशन शेजारीच एक फ्लॅट घेऊन सासूबाई, नवरा आणि ती राहायला आले…आता मधल्या वेळेत रश्मी धावत पळत आपल्या बाळाला भेटायला जाई.. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर फ्लॅट असला तरी रश्मी बाळासाठी कासावीस होऊन जाई….

घरी लेकरावर मायेची पाखरण आणि पोलीस स्टेशन मध्ये गुन्हेगाराला पट्ट्याने लाल करायचे असे रश्मी चे दुहेरी रूप होते…कामाच्या बाबतीत अत्यंत कडक म्हणून रश्मीची ओळख… 

राजेश ची बहीण निकिता, गर्भश्रीमंत घरात वाढलेली..सासरही तसेच…नवऱ्याची स्वतःची कंपनी….पण फार काटकसरी, नको तिथे पैसे खर्च करायला आवडत नसायचे…त्याचा स्वभाव असा होता की समोरच्याने आपले ऐकले नाही तर तो काय करेल काहीच सांगता येणार नव्हतं….सिगारेट ची त्याला सवय, टेन्शन मध्ये असल्यास तो सिगारेट ओढायचा…एकदा त्याने त्याच्या कंपनीत fraud करणाऱ्या माणसाला त्याचा घरी जाऊन थोबाडीत लावली होती…

निकिता च्या घरी तिचा नवरा विक्रम, नोकर बबन, बंगल्याचे रखवालदार शांता आणि तिचा नवरा अशी माणसं होती…योगेश नावाचा एक माणूस शेजारी राहत होता, स्वभावाने अत्यंत जळाऊ…

एक दिवस निकिता च्या तिजोरीतून एक महागडा हार अचानक गायब झाला होता…खुप शोधल्यावर समजले की चोरी झाली आहे…तिने तडक आपल्या भावाला आणि नवऱ्याला कळवले. .रश्मी कडे ही केस आली..

रश्मी ने ही केस सोडवायला घेतली…

नोकर बबन, शांता, तिचा नवरा किसन, शेजारी राहणारा योगेश, निकिता चा नवरा विक्रम हे सगळे संशयित होते…

रश्मी ला ही केस सोडवायची होती…

तिने चौकशीला सुरवात केली…ज्या रात्री चोरी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच निकिता च्या घरी गेली, घरात कुठलीही वस्तू हलवू नका आणि झाडलोट करू नका असे तिने बजावले…

रश्मी ने आधी निकिता ला संपूर्ण माहिती विचारली…निकिता ने सांगितले…

“मॅडम मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गुरुवारी संध्याकाळी गेले होते, विक्रम ला घरी यायला उशीर होणार होता असं तो बोलला, पूर्ण वेळ काम करणारा आमचा नोकर बबन घरी होता..डॉक्टरांनी मला 2 वेळ दूध घेण्यास सांगितले म्हणून जाताना तो माझ्यासाठी दुधाचा पेला घेऊन आला, मी 2 महिन्याची गरोदर आहे…मला घाई होती म्हणून त्याला मी नाही सांगितले… तो ते घेऊन परत गेला आणि त्याला मी उशिरा घरी येईन म्हणून सांगितले…मी रात्री येऊन पाहते तर काय, तिजोरी उघडी होती आणि हार गायब…”

“तिजोरीत अजून काय होतं?”

“बरेच दागिने होते, पण त्यांना हात नाही लावला, फक्त हा हार का चोरी करावा हे मला समजत नाहीये…”

“अजून काय काय घडलं होतं त्या दिवशी?”

“जातांना शेजारचा योगेश भेटला, त्याला विचारलं कुठे निघालास, तो म्हटला की बायकोने मसाल्याचं समान आणायला सांगितलं होतं, मिरच्या, हळद, लवंगा…अजून काय काय….

तो म्हणाला, “वहिनी, आमच्या बायकोने सांगितलं की तुम्हाला आबा जहागिराकडची हळद लागत होती म्हणून, तिने मला तेही आणायला लावले, तीच येणार होती द्यायला पण बरं झालं तुम्ही भेटलात, मी नको नको म्हटले पण त्याने बळजबरीने हळदीची पुडी माझ्या पर्स मध्ये कोंबली, त्याच्या सामानात ती जराशी फाटली होती, मी काही ते त्याच्या लक्षात आणून दिले नाही…गाडी काढतांना मी किसन ला सांगितलं की घराकडे लक्ष ठेव… घरात फक्त बबन आहे.

 “शांता कुठे दिसत नाही?? “

“बाईसाहेब ती गेलीये खंडोबाच्या दर्शनाला…पोराला इथेच टाकून गेलीये… तिची आई आलीये इथे ती सांभाळतेय लेकराला..” 

त्याला निरोप देत मी निघाले आणि घरी हे असं घडलं…

रश्मी तिजोरीची खोलीत गेली…तीने आसपास सर्व शोधलं, सुगावा मिळणं कठीण होतं… तिने फरशी चाचपली, तिला काहीतरी चिकट लागलं…दारापासून आत खोलीपर्यंत एक पुसटसा पिवळसर रंग फरशीवर दिसत होता..खोलीतली बारीकशी राखही रश्मी च्या नजरेतून सुटली नाही आणि सगळ्या दागिन्यांत फक्त हारच का चोरला हेही एक प्रश्नचिन्ह होतं…

रश्मी ने पुराव्यांचा फोटो हवलदारला घ्यायला सांगितला..

दुसऱ्या दिवशी तिने निकिता च्या नवऱ्याची चौकशी केली…कंपनीत त्याचावर खुप कर्ज झालं होतं…तो डिप्रेशन मध्ये होता…निकिता च्या उधळपट्टीचा त्याला वीट आला होता…असं त्याच्या बोलण्यातून जाणवलं .. त्याला सिगारेट ची सवय होती हेही हॉल मधल्या एश ट्रे कडे पाहुन समजलं, टेन्शन मध्ये असताना त्याला सिगारेट शिवाय होत नसे…निकिता ने बोलता बोलता रश्मी ला याची माहिती दिली होती…

नंतर बबन ची चौकशी केली गेली, त्याच्या बोलण्यातून समजले की त्याला अपमानजनक वागणूक मिळत होती…पण परिस्थितीमुळे त्याला तिथे काम करणं भाग होतं…

शेजारी योगेश ची चौकशी केली गेली, तो खूप घाबरलेला दिसला, आयुष्यात पहिल्यांदा पोलीस त्याची चौकशी करत होते…

बंगल्याचे राखणदार शांता आणि तिचा नवरा बंगल्याच्या आवारातच एका खोलीत राहत होते, त्या दिवशी किसन बागेला पाणी देत होता…कुंड्यांना रंग द्यायचं काम करत होता…असं त्याने सांगितलं..

रश्मी शांता कडे वळली, ती आपल्या बाळाला दूध पाजत होती, ते पाहून रश्मी ला आपल्या बाळाची आठवण झाली, तिच्या डोळ्यात बाळाच्या आठवणीने पाणी आलं, दुसऱ्या क्षणाला तिने आपल्या कर्तव्याला समोर ठेवुन डोळ्यातलं पाणी लपवले…

“किती महिन्याचा आहे?”

“4 महिन्याचा आहे बाईसाहेब”

 शांता ने हसून उत्तर दिले, रश्मी मॅडम सगळ्यांची चौकशी करताय हे तिला माहीत होतं त्यामुळे ती घाबरली नव्हती..

“माझा 2 महिन्याचा…”

शांता ने चमकून वर पाहिलं…आपल्या बाळाला सोडून आपलं कर्तव्य पूर्ण करणारी माऊली ती बघत होती, रश्मी बद्दल तिला वाटलेला अपार आदर तिच्या डोळ्यातून जाणवत होता…

“त्या दिवशी तू कुठे होतीस?”

“बाईसाहेब मी दुसऱ्या गावच्या मंदिरात गेले होते, नवस केला होता पोरासाठी, तो फेडायला…”

शांता इथे नव्हतीच त्यामुळे तिची चौकशी करण्यात काही अर्थ नव्हता…

रश्मी तिथून निघाली, निघतांना परत एकदा शांता च्या बाळाकडे पाहिलं, डोळ्यातलं पाणी झिरपू न देता ती झटकन तिथून निघाली… 

कर्तव्य आणि मातृत्व अश्या दोन्ही भूमिका पार पाडत असताना करावी लागणारी कसरत, बाळाच्या काळजीपोटी देवाच्या दारी पार्थना करणारी आई आणि पोटात गर्भ घेऊन आईच्या जन्माची वाट पाहणारी निकिता.असे हे मातृत्वाचे 3 पैलू या घटनेत सामील होते…

मग चोर कोण होतं? रश्मी सापडलेल्या पुराव्यातून कशी चोरापर्यंत पोहोचेल?? बघा पुढील भागात,

पुढील भागाचे लवकर अपडेट मिळण्यासाठी मला फॉलो करू शकता.

तुमच्यातील डिटेक्टिव्ह जागा करा आणि ओळखून सांगा मला कंमेंट मध्ये की चोर कोण होता…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत