जोरू का गुलाम…की खरा जीवनसाथी…?

Written by

गिरीश सोसायटी मध्ये सर्वांचा टारगेट बनला होता. बायकोचा बैल, जोरू का गुलाम म्हणून लोकं त्याला हिनवायचे… गिरीश ने प्रचंड दुर्लक्ष केलं, त्याला या बिरुदांच काहीही वाटत नव्हतं… गिरीश अंगणाला झाडू मारायचा, कचरा टाकायला जायचा, कपडे वळत टाकायला जायचा…शेजारच्या स्त्रियांना हेवा वाटायचा, त्या आपल्या नवऱ्या जवळ बोलायच्या…

“पहा तो गिरीश त्याचा बायकोला किती मदत करतो ते, शिका जरा तुम्हीपण…” मग त्यांचे नवरे तुसड्यात सांगत….”आहे तो जोरुचा गुलाम, बायकोचा बैल…..मी पण असा बैल बनू का??” कामं केल्याने आपल्या नवऱ्याच्या पुरुषार्थाला ठेस लागेल अशी समजूत स्त्रिया करायच्या….मग त्याही गिरीश लाच बैल म्हणायला मागे पुढे पहायच्या नाही…. एकदा सोसायटी चा कार्यक्रम होता…जेवण चालू होती, गिरीश आपल्या बायकोला पाणी आणण्यासाठी उठला तोच कुजबुज ऐकू आली….”पहा तो बैल, बायकोचा बैल….” आता मात्र गिरीश ला सहन झाले नाही, तो तडक स्टेज वर गेला, माईक हातात घेतला आणि बोलायला सुरुवात केली… “नमस्कार, मी बैल….बायकोचा बैल….म्हणजे माझं हे बारसं तुम्हीच केलंय ना… तुमच्या सारख्या संकुचित प्रवुत्तीच्या माणसांना मी शक्यतो टाळतो, पण या देशात स्त्रियांची स्थिती पाहता तुम्हा पुरुषांमुळे जो कचरा भरलाय तो आज जरा काढावा म्हणतोय… मी माझ्या बायकोला कामात मदत करतो, तिला साथ देतो, दोन्ही मिळून आम्ही कामं करतो…यात तुम्हाला कसला त्रास होतोय?? माझ्या बायकोच्या जागी माझी आई अथवा बहीण असती आणि मी तिला अशी मदत केली असती तर किती कौतुक लागलं असतं ना तुम्हाला?? किती प्रेमळ आहे, किती चांगला आहे वगैरे?? तेव्हा “आईचा बैल”,”बहिणीचा बैल” असंच म्हटला असता काय?? माझ्या आईला आणि बहिणीलाही मी मदत करायचो, नंतर माझी बदली झाली आणि मी बायकोला घेऊन इथे आलो… मदत मी तेव्हाही करायचो आणि आत्ताही, फक्त स्त्री बदलली, आधी आई आणि बहीण होती, आता बायको आहे..मग बायको म्हटल्यावर तुमचा दृष्टिकोन का बदलला?? बायको स्त्री नाही?? माणूस नाही?? की बायको ला गुलाम बनवून आपल्या इशाऱ्यावर नाचतं ठेवायची विचारसरणी तुमच्या मनात खोलवर दबा धरून आहे??  बायकोला मदत केली, तिला कधी आयते जेवण बनवून दिले, आयते पाणी दिले…पण मला नाही वाटत त्याचमुळे माझ्या पुरुषार्थाला धक्का बसला असेल… निकम साहेब, तुम्ही मला बैल म्हणण्यात अग्रेसर…तुम्ही आपल्या बायकोला कश्या पद्धतीने शिवीगाळ करतात हे सगळ्या सोसायटीला माहीत आहे, आणि तुम्हाला मात्र त्याचा फार अभिमान वाटतो…. नाही का??? हाच का तुमचा पुरुषार्थ?? 

गेली 4 वर्षे तुम्ही कामधंदा न करता घरी बसून आहात… वडिलांच्या कमाईवर जगत आहात….तिथे कुठे गेला तुमचा पुरुषार्थ???  एकीकडे स्त्री सक्षमीकरणाच्या बाता बडवायच्या आणि दुसरीकडे स्त्री ला आपल्याच घरात गुलाम बनवून ठेवायचं… हाच तुमचा पुरुषार्थ… बायकोला अर्धांगिनी म्हटले जाते, मी माझ्या बायकोला तिच्या सर्व कामात, अगदी झाडलोट पासून कपडे वाळत घळण्यापर्यंत मदत करतो, यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही. माझी बायको सुद्धा माझा आर्थिक भार कमी व्हावा म्हणून 4 पैसे कमावते, घरातली इलेक्ट्रिक ची कामही करते…जशी मी तिचा भार कमी करतो तसाच तीही माझा भार कमी करते…त्यामुळे आमचा संसार अगदी सुखाचा चाललाय… उगाच लोकं काय म्हणतील याचा विचार करून माझ्या बायकोलाही गुलामगिरीच्या त्याच मार्गावर न्यायला माझ्या बुद्धीला पटणारे नाही…माझ्या बायकोचे सल्ले, तिचे विचार मी ऐकून घेतो, कुठल्याही स्त्री ला व्यवस्थापन आणि आर्थिक नियोजनाचे तंत्र मुळातच अवगत असते…त्या बाबतीत मी तीचंच ऐकतो…माफ करा पण त्यामुळेच माझी आर्थिक परिस्थिती तुम्हा सर्वांहून फार चांगली आहे…तुमच्या सारखं बायकोचे विचार डावलत, नुकसान झालं तरी चालेल पण बायकोचं ऐकणार नाही या विचारांचा मी नाही…. मी माझ्या बायकोला अशीच साथ देत राहणार, भलेही मला कोणी जोरुचा गुलाम म्हणो वा बायकोचा बैल… धन्यवाद… गिरीश एवढं बोलला आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यात आनंदाश्रू आले…असा रोखठोक, सत्याची कास धरणारा आणि सत्यापुढे लोकांच्या टिकेचीही पर्वा न करणारा एक महान पुरुषार्थी तिला नवरा म्हणून मिळाला होता… सोसायटीतलीे लोकं अंतर्मुख झाली, बायकांना सार्थ कौतुक वाटले आणि माणसांची नजर शरमेने झुकली….

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा