“जो जे वांछील, तो ते लाहो”

Written by

“जो जे वांछील, तो ते लाहो”

..काही वर्षांपूर्वी मला एका, कल्पनेपेक्षा जास्त विदारक असलेल्या वास्तवाला सामोर जावं लागलं. आजही, विशेषतः पाणी पिताना, त्याची आठवण डोकं सुन्न करून टाकते. त्याचीच ही गोष्ट..

धप्प.. राजाने पाठीत एक धपाटा खाल्ला. आईने मारल्याचं त्याला काहीच वाटलं नाही, पण तिने हातातला पेला ओढुन घेतल्याच् त्याला दुःख झालं.

“माये, प्यू दीना गिलास भरून पानी एक डाव तरी..”
“न्हाय.. तुला कितीनदा सांगितलं, पानी त्या पसरट झाकनातून प्यायाच्..”

त्याच् नाव जरी राजा असलं तरी, श्रीमंती नावापुरतीच होती.
गावोगाव फिरून, मिळेल ते, पडेल ते काम करायचं, गावाबाहेर पालं टाकून राहायचं, मिळेल ते ल्यायच्, मिळेल ते खायच् अन् प्यायच्.. अशा परिस्थितीत ‘गिलासभर’ पाण्याची श्रीमंती न त्याला परवडणार होती, न त्याच्या बरोबर भटकंती करणाऱ्या ईतरांना..

“आरं पोरा, आपुन आजच्यालच सकाळी आलतू की न्हाई हिकडं.. आजुन झोपडी उभी केली न्हाय.. पानी बी न्हाय भेटलं आजुन.. मंग आताच सगळ संपिवतोस व्हय? दोन घुटच पानी प्यायाच्.”
“बा कुठ गेलाय?”
“तो गेलाय खायची- प्यायची सोय हुती का ते बगायला.”
“आय, त्या मानसानी कावून हुसकुन लावल ग आपल्याला? गेल्या बारीला तर आपन त्या जागीच तर झोपडी बांदली हुती ना?”
“आरं, तिकड मोठ्या लोकांची घर बांदायची हायेत. मंग आपुन कसं राहनार तितं.”

गेल्या वेळेला ते जिथं उतरले होते,तिथे आता एक मोठी हाउसिंग सोसायटी तयार होणार होती. बांधकाम सुरु झालं नव्हतं आजुन, पण ‘घूसखोरी’ होवू नये म्हणून बिल्डरने चारी बाजूंना भिंत उभारली होती. तिथल्या मुकादमानेच त्यांना हाकलुन दिलं होतं.

“आय, लैच मोठ भिताड हाय ग ते.. पार इतपासून ते त्या टोकाला..आपला पूरा गाव बसल त्यात.. म्या आनी गनप्या पळूत् गेल्तो.. म्या जिकलो..”
“म्हनून तहान लागली व्हती व्हय माज्या राजाला? जरा कळ धर.. बा यीलच् इतक्यात तुजा.”

“अग ये, चल, सगळी भांडी,कुंडी घे.. राजा तुबी गिलास, वाटी जे घावल ते घे.. पान्याची सोय झालीया.भरपूर पानी घावल बग” .
राजाला आपला ‘बा’ लई भारी वाटला.. “भरपूर पान्याची सोय काय कुनी बी करु शकत काय्? बापुस लई भारी है आपला..”
राजाने बघितलं, त्यांची सगळी वस्ती त्या मोठ्या भिंतीजवळ जमली होती. गणप्याने पण त्याच्यासारखचं जे मिळेल ते आणलं होतं.
“बा, पानी कुठय?”
“आरं, त्यो ट्यांकर दिसतुय का? त्यात है पानी.”
“बाई, बाई.. आपल्यासाठी आनलाय व्हय त्यो ट्यांकर?”
“यडी का खुळी तू.. आपुन कोन लागून गिलोय, आपल्यासाठी आनायला?”
“मंग? कायला आनलाय् इतका मोठाला ट्यांकर?”
“अग.. त्यो मुकादम त्या भिताडाला पानी देनार हाय्”
” पर बा.. मंग आपुन कसं घ्यायाच् ते पानी?”
“आर्, त्यो जवा भिताडावर पानी वतलं, तवा ते पानी उडून इकड- तिकड जायल.. ते जिमीनीवर पडायच्या आत आपुन भांड्यात भरून घ्यायाच्..” राजाला आपल्या बापाचं आजुन कौतुक वाटलं. “लैच डोस्केबाज है आपला बापुस.”
राजाच्या आईला मात्र हे सगळं कसंतरीच् वाटल.
“पन त्ये सगळ माती अन् सीमेट पडल ना त्यात..”
“गप रहाय.. काय मरनार हाइस् का त्ये पानी प्यून? बेअक्कल कुटची”..

तेवढ्यात त्या टँकरवाल्याने पाणी द्यायला सुरवात केली. सगळी वस्ती धावली. राजाने बघितलं, ‘बा’ म्हणाला होता तसंच झालं. मुकादम टँकरवरची डिझेलची मोटर चालु करून भल्यामोठ्या पाईपने भिंतीला पाणी देतं होता. ते पाणी भिंतीवर पडून इकडे तिकडे उडत होतं. अन् सगळी वस्ती ते भिंतीवरच् पाणी जमिनीवर खाली पडायच्या आतचं त्यांच्याकडच्या भांड्यात भरून घेत् होती.

टँकर पुढे पुढे सरकत होता. मघाशी खुप मोठी असलेली भिंत आता मात्र सगळ्यांना वरदान वाटत होती. कारण त्यामुळे सगळ्यांनाच्ं पाणी मिळत् होतं. कोणी कोणी पाईपाच्या धारेत भांड धरुन मधल्या मधे पाणी भरायची मर्दुमकी पण दाखवत होता. त्यासाठी मुकादमचा ओरडा देखील खायला त्यांची तयारी होती. हो, अपमानापेक्षा पाणी नक्कीच् महत्वाच् होतं.
राजा अन् गणप्या दोघेही खिदळत होते. इतकं पाणी बहुतेक पहिल्यांदाच पहायला मिळालं होत त्यांना. पोटभर पाणी पिऊन घेतलं राजाने. परत, त्या उडणाऱ्या पाण्याने आंघोळ होत होती, ते वेगळच्. आय आणि बा दोघही खुश वाटतं होते.

पण, अचानक बा तोंडातल्या तोंडात कोणाला तरी शिव्या देऊ लागला.. आय पन चिडचिड करू लागली.. अन् त्या बरोबरच तो मुकादम मात्र खदाखदा हसु लागला.. त्या मुकादमाबरोबर असलेले त्याचे लोकं पण हसु लागले.. राजाला ते हसंण विचित्र वाटलं, पण त्याचा अर्थ समजला नाही..

.. समजणार तरी कसा? फार लहान वय होतं त्याचं.. पण वय मोठं असलं तरी काय झालं असतं?
त्यालाही ईतर मोठ्या लोकांसारखं तिथे घडत असलेल्याकडे दुर्लक्ष करावं लागलं असतं..
..पाण्यासाठी चाललेल्या त्या त्रासाकडे..
..भिंत सोडून मधेच गर्दीतल्या बायकांवर पाईपाने पाणी उडवणाऱ्या मुकादमाकडे..
..त्या पाण्याने भिजलेल्या त्याच्या आईच्या अन् ईतर बायकांच्या शरीराकडे..
स्वतः च शरीर हाताने झाकण्या पेक्षा हंडयातलं पाणी सांडू नये म्हणून धडपड करणाऱ्या तिथल्या बायकां कडे..

आणि ते पाहुन जिभल्या चाटणाऱ्या मुकादमाकडे..

तिथे असलेल्या सगळ्यांनाच्ं हवं ते मिळतं होतं..
कोणाला पाणी, तर कोणाला दृष्टीसुख..
आणि मला त्यावेळी चालु असलेल्या माझ्या शिक्षणात उपयोगी येणारा अनुभव.

…. माउलींच् वचन, “जो जे वांछील, तो ते लाहो” फारचं विचित्रपणे खरं ठरतं होतं.

(सत्य घटनेवर आधारित)

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.