तपकिरी गूढ…एक विलक्षण प्रेमकथा

Written by

 

कॉलेजमध्ये सर्वांच्या नजरा गेटकडे खिळल्या होत्या…सिनियर्स च्या मुलांच्या एका ग्रुप ची पैज लागली होती…प्रिन्सिपॉल ला गाडीवर डबल सीट बसवून आणायची कोणाकडे हिम्मत आहे अशी पैज होती…

आर्यन ने ती ते चॅलेंज घेतलं होतं..एव्हाना पार्किंग मधल्या सगळ्या गर्दीचे लक्ष गेटकडे लागले होते…भयाण शांतता पसरली होती…आर्यन च्या बुलेट चा आवाज आला, आर्यन एकटाच येतो की पैज पूर्ण करत प्रिन्सिपल ला डबल सीट आणतो याच्याकडे सर्वांचे डोळे लागले होते….
बुलेट चा आवाज वाढत होता…डोळ्यात प्राण आणून सर्व बघत होते…आर्यन आला…डोळ्यावर काळा गॉगल, अंगात लेदर जॅकेट, हवेत उडणारे केस आणि पैज जिंकल्याचं स्माईल घेत आत आला..प्रिन्सिपल सर खाली उतरले, आर्यन ला थँक्स म्हणत आपल्या केबिन मध्ये गेले…सर नजरेआड होताच गर्दीने एकच जल्लोष केला…

“ये हुई ना बात…”

“भावा…तूच आहेस….”

“फुल्ल हवा ना भो…”

असं म्हणत गर्दीने त्याला घेरलं होतं…

कॉलेजमधली अशी एकही मुलगी नव्हती जिला आर्यन वर क्रश नव्हता….त्याचा भारदस्त आवाज, सिक्स पॅक, हिरोला लाजवेल अशी स्टाईल आणि त्याचा आगाऊपणा…बरं इतकं करूनही कॉलेज मध्ये टॉपर…
मग कोणाला आवडणार नाही तो?

त्याच गर्दीत एक अनन्या नावाची मुलगी होती..ज्युनियर…तिचा कॉलेजचा पहिलाच दिवस होता…जराशी भेदरलेली ती हे सर्व पाहत होती…ती आणि तिची मैत्रीण रक्षा..आर्यन पासून थोड्या अंतरावर उभ्या होत्या…गर्दीतून थेट त्याच्यावर नजर पडेल अशा कोनात त्या उभ्या होत्या…अनन्या ला जरा राग आला, कॉलेज मध्ये असले धंदे करायला येतात ही मुलं?

असं म्हणत रागाने ती आर्यन कडे पाहत होती, आर्यन त्याचा मित्रांत रमलेला…पाठीवर धपाटे मारून घेत होता..त्याला मित्रांनी जरा मोकळे केले तसा त्याने डोळ्यावरचा गॉगल काढला…

इतक्या वेळ रागीट हावभाव करून बसलेल्या अनन्या चे हावभाव चटकन बदलले….त्याचे ते तपकिरी डोळे…तिची नजर खिळून राहिली, अगदी एकाग्र झाली..त्याचा त्या तपकिरी डोळ्यात काहीतरी गूढ होतं… ती ते शोधायचा प्रयत्न करू लागली…काय ते डोळे…पाणीदार…प्रेमाने ओथंबलेले…एका क्षणात ती त्या डोळ्यांचा प्रेमात पडली…

“मॅडम, आता प्रोपोज करता का??”

रक्षा ने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली तशी ती भानावर आली…

दुसरा दिवस…अनन्या त्याला पाहायला आतुर झालेली…पार्कींग मध्ये नाही, कॉरिडॉर मध्ये नाही..असं विचारत थोडीच फिरणार…”अनन्या अगं का फिरवतेस मला अख्या कॉलेजमध्ये?? कोणाला पाहायचं आहे तुला?”

“ए गपे, मी कशाला कोणाला पाहू…कॉलेज मधल्या सगळ्या गोष्टी माहीत करून घेतल्या पाहिजेत रक्षा…”

“घंटा…कॉलेजमधल्या गोष्टी म्हणे…चल क्लासरूम मध्ये जाऊ आता…”

इतकं मोठं कॉलेज कस पाहू त्याला? या विचारात असतांना अचानक आर्यन आणि त्याचे मित्र ब्रेक मध्ये वर्गात शिरले…”हे बघ, इथे आपण पोस्टर लावू…”

कॉलेज मधल्या इव्हेंट साठी त्यांची तयारी चालली होती…आर्यन हाताची घडी घालून क्लासरूम मध्ये कुठे कुठे पोस्टर लावता येतील यासाठी आपली नजर फिरवत होता…पण पठ्याने गॉगल काही काढला नव्हता…

“याला काय वर्गात ऊन लागतंय? यडपट कुठचा…”
अनन्या मनातल्या मनात म्हणाली….

तेवढ्यात एक मित्र म्हणाला, ” अय यडछाप… ते ढापण काढ आधी…”

आर्यन रजनीकांत सारखी स्टाईल मारायला गेला आणि गॉगल खाली पडला..अनन्या आणि रक्षा ला हसू आवरलं नाही…आर्यन ने रक्षा कडे पाहिले आणि डोळे मिचकवले…त्याचा नजरेचा कोन अनन्या पेक्षा केवळ काही अंश दूर होता..रक्षा तिथेच चूर चूर झाली….”आर्यन इकडे… माझ्याकडे बघ…एकदा…फक्त एकदा..प्लिज…” अनन्या मनात घोळवत होती…. पण आर्यन ने रक्षा कडे पाहिलं आणि निघूनही गेला…

“एकदा तरी पाहायचं ना रे, तुझ्या तपकिरी डोळ्यांची फॅन झालीये मी…शीट….”

“ए कसला हँडसम आहे तो, माझ्या कडे पाहून हसला ग तो…अय्या…” चेहऱ्यावर दोन्हीहात ठेऊन लाजत रक्षा बोलली…

“सांगू तुझ्या घरी? सांगू तुझ्या मोठ्या भावाला? पोरांवर लाईन मारतेस तू…सांगू??”

“ए नाही ना…प्लिज ना…सॉरी ना…आता नाही करणार…शप्पथ…”

रक्षा चा पत्ता तिथेच कट करून अनन्या आता त्याचा पुढच्या दर्शनाची वाट पाहू लागली…

अनन्या तशी दिसायला खूप सुंदर, पण राहणीमान अगदीच साधं…पटकन नजरेत येणार नाही असं राहणीमान…

दुसऱ्या दिवशी तो दिसला..पार्किंग मधेच. अनन्या आणि रक्षा त्याचा ग्रुप च्या जवळच उभ्या होत्या…”रक्षा अगं मी नोटबुक विसरले की काय? थांब चेक करते..” अनन्या ने हात बॅग मध्ये टाकला आणि मुद्दाम आपण काहीतरी शोधतोय असा आव आणत डोळे भिरभिरवत होती…मधेच आर्यन कडे पाहत होती…तिला तिथे त्याला खूप वेळ पाहायचं होतं म्हणून हा बहाणा…बाकी काही नाही..आर्यन मित्रांतच दंग झालेला….”साल्या आता तरी बघ…………..नाही? निघ मग…”

“सापडली, चल रक्षा…”

रागारागाने ती तिथून निघाली…

आता ठरवलं…आर्यन च्या मागे लागायचंच नाही…आपल्याला साधा भावही देत नाही?

स्वतःला कोण हिरो समजतो काय हा? मी पण काही कमी नाही…आता त्याला दाखवतेच मी काय आहे ते…”

दुसऱ्या दिवशी अनन्या ने कपड्यांचा नवा खजिना बाहेर काढला…गुलाबी रंगाचा स्लीवलेस पंजाबी ड्रेस आणि त्यावर जाळीची ओढणी…चेहऱ्यावर मेकअप..भडक लिपस्टिक… हातात डायमंड च्या बांगड्या…कंडिशनर लावून धुतलेले रेशमी केस मोकळे सोडलेले…आणि फुल फॉर्म मध्ये कॉलेजला जायला निघाली…”ऑ?? अनन्या?? एकदम फटाकडी दिसतेस, काय माजरा आहे?? अं.. अं???? ”

“गपे रक्षे, चल गपचूप…”

कॉलेजमध्ये तिने एन्ट्री केली…अगदी “मै हू ना” मधल्या अमृता राव स्टाईल मध्ये..त्या गाण्याचे व्हायोलिन तिच्याच मनात वाजत होते…प्रत्यक्षांत झालं सुद्धा तसं… अनन्या ला फारसं कोणी ओळखत नव्हतं…पण इतकी सुंदर मुलगी कॉलेजमध्ये कधीपासून?? ते पाहायला पोरं लपत छपत तिच्या मागे जाऊ लागले…काहीजण मुद्दाम exuse me म्हणत तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती…आज कॉलेज मध्ये तिचीच चर्चा होत होती….

पण तिने ज्याच्यासाठी हे सगळं केलं तो दिसत नव्हता…”ओ माय गॉड…आज टप्पा दिला की काय याने?? म्हणजे सगळी मेहनत फुकट…”

नाराज होत ती कॉरिडॉर च्या एका टोकाला पाणी प्यायला गेली, ती एकटीच होती…गेल्यावर पाहते तर काय??

आर्यन तिथेच होता…एकटा…आणि आपणही एकटे….

“हम तूम…एक कमरे मे बंद….छे बुवा…काहीही काय सुचतय मला..विनाशकाले विपरीत बुद्धी….अनन्या…मन मे लदडू फुटा?? अनन्या concentrate…त्याच्याशी बोलायचा, ओळख करायचा हा एकच चान्स आहे….हर कदम फुक फुक कर डाल….”

ती जवळ पोचते आणि तो क्षण येतो…तो तिच्याकडे पाहात होता…हातातला ग्लास त्याने रागात जोरात खाली आदळला आणि संतापाने तिथून निघून गेला….

अनन्या पुरती भेदरली, घाबरली…हे काय होतं?? मी काय चुकीचं केलं?? तिला रडू आलं…लेक्चर अर्धवट सोडून ती घरी निघून आली… रात्रभर याच गोष्टीचा विचार करत तिला झोप लागली नाही..

दुसऱ्या दिवशी कॉलेजला गेली…पार्किंग मध्ये उदास होऊन एका स्कुटीवर बसली होती…रक्षा म्हणाली चल वेळ झाली लेक्चर ची, जाऊया…

“रक्षा तू जा…माझा मूड नाहीये आज लेक्चर ला बसायचा…”

“काय झालं तुला??अगं अटेंडन्स …”

“गप ग…सांगितलं ना तू जा म्हणून???”

आज मौसम जरा खराब आहे म्हणत रक्षा गेली निघून…

पार्किंग मध्ये अनन्या एकटीच होती….काल जे झालं त्याचाच विचार करत तिच्या डोळ्यातून अश्रू आले…”

“अनन्या….”

मागून एक आवाज आला…

“आर्यन??? तू???”

“डोळे पूस आधी…”

“अं?? हो..”

“काय म्हणतोस?…”

“काही नाही…असंच…”

“तू मला कसा ओळ्खतोस?? माझं नाव कसं माहीत तुला??”

“अनन्या…त कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायला आली होतीस तेव्हाच पाहिलं मी तुला…ओळखतो मी तुला..”

“मग इतके दिवस बोलला का नाहीस?? आणि काल काय झालेलं तुला??”

“हे बघ अनन्या, तू साधीच चांगली दिसतेस…काल तू जो पेहराव करून आलीस त्यामुळे मुलं वेड्यासारखी तुझा पिच्छा करत होती…मला नाही सहन झाले ते…म्हणून तुझाच राग आलेला मला…”

“का?? तुला राग यायचं काय कारण??”

“मला? कुठे काय…काही नाही…ते सोड…माझ्याशी फ्रेंडशिप करशील?”

“अरे फ्रेंडशिप काय, लवशीप द्यायला तयार आहे मी…आत्ताच्या आत्ता लग्न करू म्हटलास तरी चालेल..आपली पोरं होतील…पोरीचं नाव नयन ठेऊ…अनन्या…इतक्या पुढे कुठे चाललीयेस?? त्याने काय विचारलं तुला??” अनन्या मनातल्या मनात…

“अनन्या?? फ्रेंडशिप करशील माझ्याशी?”

“हो नक्कीच…”

असं म्हणत तिने हात पुढे गेला…

दोघांनी हातमिळवणी केली…त्याच्या स्पर्शाने तिच्यात अद्भुत लहरी संचारल्या..

त्या दिवशी तिला काहीही सुचत नव्हते..ज्या मुलासाठी आपण इतके अधीर झालो होतो तो माझ्या आधीच माझ्यावर भाळला होता? आणि कॉलेज मध्ये इतर इतक्या सुंदर मुली असून याला मीच आवडावी??

“आज मैं उपर… आसमा नीचे….” गुणगुणत तिने अक्खा दिवस काढला…

दुसऱ्या दिवसापासून कॉलेज मध्ये दोघंही बराच वेळ एकत्र रहात होते…पार्किंग मध्ये कितीतरी वेळ गप्पा मारत…

“अनन्या…तुझं आणि त्या आर्यन चं काही आहे का ग??”

“कोणी सांगितलं रक्षा तुला? आम्ही फक्त मित्र आहोत…”

“हुश्श…चला..बरं झालं…नाहीतर माझं काय झालं असतं…”

“Excuse me… माझं काय झालं असतं म्हणजे? तू लाईन मारतेस की काय त्याच्यावर??”

“अय्या…तुला कसं कळलं??”

“रक्षे……डोळे वर करून पहायचही नाही त्याच्याकडं…”

“का?? तुम्ही तर फक्त मित्र आहात ना? मग?”

“जास्त प्रश्न विचारू नकोस… सांगितलं तेवढं ऐक…”

छद्मी हसत रक्षा ने माघार घेतली आणि तिला अनन्या आणि आर्यन चं कन्फर्म झालं..

अनन्या ला जिथे मदत लागायची तिथे आर्यन असायचा…

लायब्ररीत दोघे सोबत…टिफिन खायला सोबत…अगदी अनन्या ला कॉलेजमधून आर्यन चा निरोप घेऊन निघतही नसे…

जिथे तिथे फक्त आर्यन…कॉलेजमधल्या इतर मुली त्याचा एका कटाक्षासाठी झुरायच्या…तोच आता माझा झालाय…तोच माझ्या मागे मागे करतोय…त्याचा डोळ्यात माझं प्रेम ओथंबून वाहतंय… ही भावनाच खूप सुंदर होती….

दिवस जात होते, अनन्या खुश होती पण मनात एक सल कायम होती…ती म्हणजे प्रेमाची कबुली…त्यांचं नातं फक्त फ्रेंडशिप वर येऊन थांबलं होतं… प्रेम असल्यासारखेच दोघे वागत होते पण प्रेमाची कबुली अजूनही त्याने दिली नव्हती…

एकदा असंच दोघेही गप्पा मारत बसलेले…

अनन्या म्हणाली, “आपल्याला ज्याचा सहवास आवडतो तोच आपला लाईफ पार्टनर झाला तर किती छान ना?”

आर्यन ला हळूहळू अनन्या च्या मनात काय आहे हे समजू लागलं… त्याने विषय टाळायचा प्रयत्न केला…

आर्यन विषय का टाळतोय? अनन्या ला समजत नव्हतं…

शेवटी तिनेच त्याला प्रेमाची कबुली द्यायची ठरवली…

“आर्यन, आज संध्याकाळी जरा बाहेर भेटशील का? काम आहे जरा…”

“हो चालेल ना, कुठे भेटायचं बोल…”

“स्टार कॅफे…7 वाजता…”

“Done..”

अनन्या खुशीत होती…तिच्या प्रेमाला आज एक नवीन वळण लागणार होतं…

ती कॅफेत त्याची वाट बघत बसली…तो आला…आज पहिल्यांदा त्याच्याशी बोलताना ती लाजत होती…

“आर्यन, तुला काहीतरी सांगायचं आहे…”

“अगं तू अशी बोलतेय जसं मला प्रपोज करणारेस…”

“हो…प्रोपोज करणारे…आर्यन तुलाही माहीत आहे की आपल्यात जे आहे ते केवळ प्रेम आहे….आपण त्याची कधीच कबुली दिली नाही…पण आज मला तुझी कबुली हवी आहे…”

“आर्यन शांत झाला, कसलातरी विचार त्याने केला..”

आर्यन का शांत आहे? त्याचा मनात काही वेगळं तर नाही ना? या भावनेने तिला धडकी भरली…आणि ज्याची भीती होती तेच झालं….

“अनन्या..तुला मैत्रीण मानलं तर मैत्रीणच राहा….माझ्या मनात असलं काही आहे असं तुला वाटलंच कस?”

“आर्यन… खोटं बोलतोय तू…तुला माझं नटून येणं आणि मुलांनी माझ्याकडे बघणं आवडलं नाही…ते प्रेम नव्हतं?? कायम माझ्या मागे पुढे राहिलास..ते प्रेम नव्हतं?? ऍडमिशन ला आल्यावर तू मला पाहिलं आणि नंतर परत ओळखलंस….ते प्रेम नव्हतं??”

“नाही….गल्लत करू नकोस मैत्री आणि प्रेमात….मी तुला नाही म्हणतोय….”

“ठीक आहे…मग आजपासून आपल्यात मैत्रीही नाही….माझ्या भावनांशी खेळलास तू…goodbye….”

असं म्हणत अनन्या संतापाने निघून गेली…

घरी खूप रडली…

दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये आर्यन कडे पाहिलंही नाही…सर्वांना समजलं की यांचं काहीतरी बिनसलं आहे…

रक्षा ने विचारायचा प्रयत्न केला पण अनन्या विषय टाळायची…

काही दिवसांनी आर्यन एका दुसऱ्या मुलीसोबत दिसायला लागला…

अनन्या ला ते सगळं विसरायला खूप कष्ट पडले…कितीतरी रात्री तिला झोप यायची नाही, कित्येकदा रडून रडून स्वतःची तब्येत खराब करून घेतली होती तिने…

एकदा अचानक दोघांची परत नजरानजर झाली…त्याचा तपकिरी डोळ्यात ती पुन्हा एकदा हरवून गेली…पण परत भानावर आली…अनन्या काहीतरी बोलेल अस आर्यन ला वाटत होतं…पण त्याने आता तिला गमावलं होतं…

रक्षा जेव्हाही अनन्या कडे आर्यन चा विषय काढायची तेव्हा अनन्या चं डोकं सटकायचं….

“नालायक आहे तो…एक नंबरचा हलकट…माझ्यासोबत टाईमपास केला आणि आता फिरतोय दुसऱ्या मुलीबरोबर….बरं झालं त्याचा पत्ता कट केला मी..नाहीतर फसले असते….अगदी मनापासून प्रेम करतोय तो असा वागायचा…पण कसलं काय…”

बाहेरून ती अशी बोलत जरी असली तरी आतून ती तुटली होती….

काही दिवस सरले..आर्यन कॉलेजमध्ये दिसला नाही…रक्षा ने चौकशी केली…आर्यन महिनाभर कॉलेज ला येणार नव्हता…तिने कारण शोधायचा प्रयत्न केला….

इकडे अनन्या अभ्यासात गुंतली होती…आता दुसऱ्या कुठल्याही माणसात जीव अडकवायचा नाही असं तिने ठरवलं होतं…

तिची नजर आजही आर्यन ला शोधत होती..पण तो दिसत नव्हता..परत मनाची समजूत घालत..”जाऊदेत…आपल्याला काय” म्हणत सोडून द्यायची…

1 महिना झाला, 2 महिने झाले….आर्यन चा पत्ताच नाही…

परीक्षा झाली..सर्वजण पार्किंग मध्ये गप्पा मारत होते…पेपर कसा गेला वगैरे चर्चा चालू होती….

मागून एक मुलगा म्हणायला लागला…”आर्यन असता तर तोच टॉपर राहिला असता यावेळी….”

अनन्या ला चीड आली त्याचं नाव ऐकून…

बसमधून दोघी परत येत होत्या…अनन्या ची बडबड चालूच होती…हुशार म्हणे, मार्क मिळवण्यापेक्षा माणसाशी कसं वागावं हे शिकायला हवं होतं…मार्कांचं काय लोणचं घालायचं आहे?? कसा वागला होता माझ्याशी…म्हणे दुसरी मुलं पाहतात ते आवडलं नाही मला…मित्र होता ना फक्त? मग का म्हणावं असं…. त्याला तर…..”

“अनन्या बस्स…. एक शब्दही बोलू नकोस यापूढे….”

“का गं? आता तुला डेट करतोय का तो?? की….”

“अनन्या…तुला म्हटलं ना गप बस…सत्य माहीत नसेल तर माणसाने गप बसावं….”

“सत्य?? कसलं सत्य?”

“मला आर्यन ने सांगायला मनाई केली होती…पण आज मी गप नाही राहू शकत…”

“काय बोलतेस रक्षा??”

“होय…आर्यन तुझ्यावर मनापासून प्रेम करत होता…तुला माहितीये तो गॉगल लावूनच का फिरायचा?? त्याला एक असाध्य आजार होता डोळ्यांचा..त्याची ट्रीटमेंट चालू होती….त्याला वाटलेलं की साधा आजार असेल. वेळोवेळी त्याला रिपोर्ट काढावे लागायचे..तो स्वतःहून तुला प्रोपोज करणार होता…पण ज्या दिवशी तू त्याला कॅफे मध्ये बोलावलं त्याच दिवशी त्याला वाईट बातमी समजली…की त्याचा आजार त्याचा जीव घेऊ शकतो…त्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागणार होती…पण त्यात वाचण्याचे चान्सेस फार कमी आहेत….शेवटी त्यांनू शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले..

आर्यन ला माहीत होतं की त्याचा जीवही जाऊ शकतो….मग तसलं काही झालं तर तू आयुष्यभर त्याची आठवण घेऊन कुढत बसली असती, त्याचा विरहाने तू खंगुन गेली असती…खूप पुढचा विचार करून त्याने तुला नाही म्हटलं…”

अनन्या च्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते…अपराधीपणाचा भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता..

“त्याने मला सरळ जे आहे ते सांगितलं असतं तरी चाललं असतं ना…”

“अनन्या…त्याने खूप पुढचा विचार केला होता ग…त्याने मुद्दाम तुझ्या मनात त्याच्याबद्दल चीड उभी केली…की जेणेकरून त्याची आठवण आली की तुला त्रास व्हायला नको…आणि त्याला सोडण्याचा कधी पश्चाताप ही व्हायला नको…मुद्दाम तू समोर असली की एका मुलीसोबत असल्याचा दाखवायचा…म्हणजे तू त्याला शिव्या देशील…त्याला धिक्कारशील…आणि मग तो कायमचा गेला तरी तुला काही त्रास नको म्हणून हा सगळा खटाटोप….”

“रक्षा…..का नाही सांगितलंस मला हे??… का??….” अनन्या हमसून हमसून रडत होती….

“मला बजावलं होतं त्याने…पण अशा मुलाबद्दल मी खरंच इतकं वाईट ऐकू शकली नाही….म्हणून बोलावं लागलं मला…”

“जा…सिटी हॉस्पिटल ला त्याची शस्त्रक्रिया चालली आहे…वाचला तर भेटेल तुला…”

अनन्या ने धावत्या बस मधून उडी मारली… भान विसरून ती रस्त्यावर वेड्यासारखी पळत सुटली…

“देवा…माझं प्रेम खर असेल तर आर्यन ला वाचव देवा…माझी सगळी पुण्याई पणाला लाव पण माझा आर्यन परत दे मला….”

ती आकांत करत होती….

धापा टाकत हॉस्पिटल ला पोचली…आर्यन ला उचलून वॉर्डबॉय बाहेर नेत होते….

त्याची आई रडत होती…

“अनन्या तिथेच खाली बसली…देवा तुला काहीही हक्क नाही आर्यन ला न्यायचा…माझा आर्यन मला परत दे….”

खाली डोकं टेकवून ती रडत होती… काही सेकंदात तिथल्या सर्वांचा हसण्याचा आवाज येत होता…ती गोंधळली… काय प्रकार आहे??

“आर्यन जाणार नाही इतक्या सहजासहजी अनन्या ला सोडून…”

आर्यन डोळे उघडून बोलत होता…

“आता काय पेशंट ला दुसरीकडे हलवायचं सुद्धा नाही का?”

“मग काकू का रडत होत्या??”

“त्याला आनंदाश्रू म्हणतात येडे..”

असं म्हणत तिने त्याचा हात पकडला…आणि म्हणाली…

“फ्रेंडशिप मे सब चालता है यार…”

“ए बस हा…आता तू drama करू नकोस…सांग ग आई हिला…”

“आर्यन बेटा… drama तर आता घरी होईल….”

“जीभ चावत त्या दोघांनी आवरतं घेतलं..”

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा