तसलंच काहीतरी असेल म्हणून तर……

Written by
वेलकम माय डिअर, कॉंग्रॅट्स फॉर युअर सक्सेस!!
चल चल पटकन आवर, मस्त डिनरला जाऊ, तुझा तो आनंदाच्या बातमीचा फोन आला, आणि म्हटलं आज लवकर घरी जाऊन तुझं सहर्ष स्वागत करावं.
ऋषभ अगदी उत्साहाने तनुश्रीला सांगत होता.
पण तनुश्रीच्या चेहऱ्यावर काहीच आनंद दिसत नव्हता. ती त्याला म्हणते, आज नको ना जाऊया, माझा मुड नाहीये.
ऋषभ म्हणतो, अगं एवढ्या मोठ्या प्रोजेक्टसाठी तुझी निवड झाली आणि तो हँडल करायला तुला लंडनला जायला मिळणार आहे, ही छोटी गोष्ट आहे का?
सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे!!
ऋषभ असं बोलतो अन् आतापर्यंत मनात साचून ठेवलेलं सारं तनुश्रीच्या डोळ्यांवाटे बाहेर पडतं.
तनुश्री ऋषभला मिठी मारून जोरात रडायलाच लागते.
ऋषभही तिचं मन मोकळं होऊ देतो.
थोडी शांत झाल्यावर तिला पाणी देऊन विचारतो, आता सांगशील इतक्या आनंदाच्या क्षणी तुला एवढं रडायला का येतंय ते?
ऋषभ तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रे, मी कशी आहे तुला माहिती आहे ना चांगलंच?? कोणीही काही बोललं तर तुला खरं वाटेल का??, तनुश्रीला पुन्हा भरून येतं.
अगं बाई, सांग ना आता काय झालं ते. असे प्रश्न आजच अचानक का विचारावेसे वाटले तुला?
तुही स्वतःला ओळखलं नसशील एवढं ओळखतो मी तुला, तू स्पष्टपणे सांग आता काय झालं, मला नाही बघवत तुला असं रडताना, ऋषभही तिच्याबरोबर भावुक होऊन जातो.
ऋषभ प्रोजेक्टसाठी माझं नाव डिक्लेअर झालं, सर्वांनी आनंदाने टाळया तर वाजवल्या. पण जेव्हा पर्सनली अभिनंदन करायला एकेक आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव होते रे!!
माझा एक कलीग भुवया उंचावत म्हणाला, अभिनंदन!! फारच लवकर बाजी मारलीत तुम्ही!
दुसरी जिला मी आजपर्यंत माझी मैत्रीण समजत होते, ती कुत्सितपणे म्हणाली, चार वर्षं झाली; पण मला नाही जमलं बुवा असं काही, तू तर वर्षभरातच भरारी घेतलीस!!
सर्वजण वरून तर हसत होते, पण डोळ्यांनी एकमेकांना काहीतरी खुणावत होते.
एक तर येऊन सरळ बोलला, काय मग आज डिनर कोणाबरोबर? मिस्टरांना माहिती आहे ना सगळं??
अशी तिडीक गेली ना डोक्यात, साणकन् वाजवावीशी वाटली एक, पण बाजूला सर्व सिनिअर्स होते म्हणून कन्ट्रोल केला. त्याला एवढंच म्हणाले, नाही माहिती, तुम्ही देता का माहीत करून?? घ्या नंबर लावा फोन, ओका काय ओकायचंचय ते. गेला निघून हरामखोर!!
कूल डाऊन तनु, शांत हो तू आधी, ऋषभ तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो.
कशी शांत होऊ रे? हे बघ अजूनही थरथरतेय मी, ते सारं डोळ्यासमोर येतंय सारखंच.
तुला माहिती आहे ना, हा जॉब मला कसा मिळाला ?
किती राऊंडस झाले माझे, किती कठीण इंटरव्ह्यू होता. डिस्क्टींशन मध्ये मार्क्स होते तरीही!!
केवढं बारकाईने मूल्यमापन केलेलं त्यांनी एकेका गोष्टीचं, एका क्षणी वाटलेलं, नको तो जॉब असल्या कंपनीत.
पण तरीही हार मानायची नाही म्हणून दटून एकेक राऊंड पार करत राहिले. तुला तर माहितीये ना सगळंच!!
हो ग मी तर होतोच ना तूझ्याबरोबर, ऋषभ तिला धीर देत म्हणतो.
आणि यांना वाटतं मी बॉसबरोबर झोपून सिलेक्ट झाले.
शीss कुठली मानसिकता घेऊन जगतात रे हे??
सगळ्यांना एकाच माळेत बांधतात.
एवढ्या लवकर मला बाहेरच्या प्रोजेक्टसाठी सिलेक्ट केलं म्हणजे, मी तसला मार्ग अवलंबला.
मला तो आनंद साजराच करून दिला नाही रे कुणी!!
आम्ही चार जण सिलेक्ट झालोय. पण त्यात मी एकटीच
लेडीज आहे, म्हणून डोळ्यात सलतीये साऱ्यांच्या.
त्या तिघांकडे कोणी बोट नाही दाखवलं. चौथी एक स्त्री आली म्हणजे तिला स्वतःच्या टॅलेंटवर काही मिळूच शकत नाही. हेच गृहीत का धरतात सर्व?
तिला प्रमोशन मिळालं, तिला पुढे जाण्याची संधी मिळाली, तर तिच्या चारित्र्यावर शंका घेतली गेलीच पाहिजे,असं का??
तू नको ना लक्ष देऊ, हि तर सुरुवात आहे. असे बरेच काटे तुझ्या वाटेत येणार, तुला बोचणार. म्हणून तू तुझी वाट सोडणार का?
त्यांचं कामच ते आहे, तू अडलीस, तू व्हिवळत राहिलीस तर त्यांना फावणारच आहे.
मी आहे ना तुझ्या पाठीशी? मला माहित आहे ना तू कशी आहेस ते? तुझं घर तुझ्या साथीला असताना, दारच्यांची पर्वा हवी कशाला तुला?
चल खूप झालं, रडणं, आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, त्याला साजरं करूया.
सहज नाही आलाय हा दिवस आपल्या जीवनात, त्याच्यामागे ध्येयासाठी घेतलेले अथक परिश्रम आहेत.
आता सर्वांना फळ दिसतंय, पण ते कसं मिळालंय, किती वर्षांने मिळालंय, किती कष्टाने मिळालंय हे ज्याचं त्यालाच माहीत ना?
तर मग आता ऊठ, मस्त एन्जॉय करुया. मन मोकळं झालं ना तुझं, आपला सक्सेस आपण सेलिब्रेट करणार नाही तर कोण!!, ऋषभ तिला हट्टाने आवरण्यासाठी पाठवतोच.
तिलाही वाटतं, काय मन असतं ना माणसाचं,  जवळच्यांपेक्षा लांबच्यांचाच जास्त विचार करत बसतं.
ऋषभ माझ्याबरोबर आहे आणि मी लांबचे लोक नावं ठेवतायत त्याच दुःख करत बसलीये.
वाईट तेव्हा वाटायला पाहिजे जेव्हा ऋषभ माझी साथ सोडेल, तो आहे तर मला कशाला पर्वा कोणाची??
खरंच मला हे क्षण गमवायला नकोच, हेच क्षण उद्या मला शक्ती देतील दुनियेला सामोरं जाण्यासाठी, हेच क्षण मला प्रोत्साहन देतील, पुढे आणखी मोठं यश मिळवण्यासाठी!!
मनातलं सारं मळभ झटकून, मस्तपैकी तयार होऊन ती ऋषभबरोबर, हसऱ्या चेहऱ्याने सेलिब्रेशनसाठी बाहेर पडते………!!
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
Article Categories:
नारीवादी

Comments are closed.