ताकद सात फेऱ्यांची …!!!

Written by
“जाउ की नको? लग्न झालंय माझं…त्याला भेटणं म्हणजे व्यभिचार आहे….पण प्रेम आहे का माझं त्याच्यावर?? का माझी पावलं त्याला भेटायला आपसूक वळताय?? मी विवाहिता…त्याला भेटणं अयोग्य आहे…पण प्रेमाला कसलं आलंय बंधन?? मी जाणार…. नाही…मी नाही जाऊ शकत…तुला जावं लागेल….”
रेवा चं स्वतःशीच द्वंद्व सुरू होतं… 2 महिन्यापासून तिच्या बाबतीत झालेली घटना तिच्या डोळ्यासमोर आली…
2 महिन्यांपूर्वी तिची मैत्रीण शीतल रेवा कडे आलेली, सारंग ला घेऊन…
“रेवा, हा सारंग…..माझा चुलतभाऊ…तुझ्याच वयाचा आहे बर का… याला तुझ्याकडे पाठवते शिकवणीला…शेफ बनायचे आहे त्याला… म्हटलं आधी रेवा च्या हातचं शिक आधी…”
रेवा ची मैत्रीण रेवा ला सांगत होती…
सारंग ला शेफ बनून करियर घडवायचं होतं… करियर च्या बाबतीत सजग असल्याने त्याने अजून विवाह केला नव्हता…घरचे खूप मागे लागलेले, पण एक यशस्वी शेफ झाल्याशिवाय काहीही करणार नाही यावर तो ठाम होता….शेफ बनून tv शो करायचा, youtube वर series सुरू करायची, रेसिपी बुक लिहायचे असे त्याचे सर्व प्लॅंनिंग झाले होते….त्याचा कोर्सही सुरू झालेला, मध्ये काही महिने सुट्ट्या असल्याने त्याचा बहिणीकडे म्हणजेच शीतल कडे तो राहायला आलेला…तिथे शीतल ने त्याला रेवा कडून धडे घ्यायला सांगितले होते…
रेवा चा नवरा अनय… अगदी गोड माणूस…सर्वांशी अगदी पटकन मैत्री करणारा, प्रेमळ आणि सच्चा… वाईटपणा त्याचा मनालाही शिवणारा नव्हता…construction मध्ये असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करत होता, म्हणजेच त्याचं साईट वर्क असायचं.सारंग सोबतही त्याची चटकन मैत्री झाली, रेवा ला सांगितलं की माझ्या मित्राची गुरू बन आणि शिकव त्याला सर्व…
सारंग ची शिकवणी सुरू झाली…सारंग ला जिज्ञासा असल्याने अगदी मनापासून तो शिकून घेत होता…रेवा ला सुरवातीला त्याच्याशी बोलायला संकोच वाटायचा, पण हळूहळू त्यांच्यातही घट्ट मैत्री झाली..स्वयंपाकतले बारकावे, एकेक पदार्थ रेवा त्याला शिकवत होती..सारंग चा विनोदी स्वभाव, प्रत्येक गोष्टीत बिनोदबुद्धी चालवत तो रेवा ला हसवत असायचा…
सारंग जास्तीत जास्त वेळ रेवा च्या घरी असायचा…शिकवणी झाली की दोघे गप्पा मारायचे, मनसोक्त हसायचे…शीतल जॉब ला असल्याने सारंग केव्हा घरी येतो,केव्हा जातो याची तिला कल्पनाही नव्हती…
या 1 महिन्याच्या सहवासाने दोघांना त्यांच्यात प्रेम फुलत गेले…एक दिवस सारंग ला बाहेर काम असल्याने तो एक दिवस रेवा कडे आला नाही…तो दिवस रेवा ला खायला उठला…तिच्या मनात वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले…
“सारंग कोणा मुलीला भेटायला गेला असेल का? त्याला एखादी मैत्रीण असेल का?? त्याला माझ्याबद्दल काय वाटत असेल?? पण….मला का फरक पडावा याच्याने…?? मी विवाहित आहे, त्याच्याबद्दल विचार कसा करू शकते मी??”
दुसऱ्या दिवशी सारंग आला…रेवा च्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव होते…
“का नाही आलास काल??”
“एक दिवस आलो नाही तर इतका फरक पडतोय तुला??”
“मला?? मला काय फरक पडणार आहे??”
“तू बोलणार नाहीस, पण तुझ्या मनात जे आहे तेच माझ्या मनात आहे…”
“अं…. म्हणजे…?”
“तुझी सवय झालीये मला, आणि माझीही तुला…नाही राहू शकत एकमेकांशिवाय….हे प्रेमच आहे ना??”
रेवा च मन सांगत होतं…”नाही,हा व्यभिचार आहे…मी विवाहित आहे…हे समाजमान्य नाही, हे चांगलं नाही…” पण ओठावर मात्र शब्द आले…”हो…आवडतो मला तुझा सहवास….”
“बस्स मग..मला बाकी काहीही दिसत नाहीये, तुझं लग्न झालंय वगैरे…तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर संध्याकाळी चौकातल्या देवळात येशील, देवापुढे आपल्या प्रेमाची साक्ष देऊ आपण….”
असं म्हणत सारंग निघून गेला…
रेवा च्या मनात द्वंद्व सुरू झालं…मी विवाहित असतांना असं दुसऱ्याशी सख्य करणं व्यभिचार आहे…पण मनाचं काय??मन ऐकेल त्याला नाही म्हणायला??कितीही म्हटलं तरी मनाला यावर घालणं शक्य होईल का??
संध्याकाळ झाली,रेवा खोलीत येरझारा घालत होती…
जाऊ की नको? सारंग वाट बघत असेल…नवऱ्याला समजलं तर?? आणि नाही गेले तर?? सारंग ला काय वाटेल?? त्याला गमवायच नाहीये मला…
रेवा ने तडक तयारी केली… पर्स घेतली अन मंदिरात जायला निघाली…. आता जे व्हायचं ते होऊदेत…पण सारंग जवळ प्रेमाची कबुली देणार…
दबक्या पावलांनी ती निघाली, मनात विचारचक्र चालूच होते…
रस्त्यावरून जात असताना एका घरातून करपलेल्या भाजीचा वास आला….आणि तिच्या आठवणी जाग्या झाल्या…
अनय… म्हणजेच तिच्या नवऱ्याने तिची अशीच करपलेली भाजी आनंदाने खाल्ली होती, आणि तरीही सुगरण आहेस तू म्हणून तिला बळ दिलं… तेव्हापासून तिला जी प्रेरणा मिळाली त्यामुळे आज ती उत्तम स्वयंपाक बनवत होती…
रस्त्याच्या कडेला मोगऱ्याचा सुगंध तिला आला आणि अनय दर रविवारी आणत असलेल्या गजऱ्याची तिला आठवण झाली….
तिचे पाय आता तिला थांबवत होते,मंदिर जवळ आलं… सारंग तिला लांबून दिसला…ती मंदिराकडे जाताच अनय सामोरा आला…
“अनय??? तू इथे??”
“मॅडम अहो आमचं काम असंच आहे, मंदिरा शेजारी जे काम चालू आहे तिथे आज माझी हजेरी…, असो, सारंग वाट बघतोय… जा…काही समान आणायचं असेल ना तुम्हाला?? करा तुम्ही तुमचं काम….”
किती हा विश्वास?? किती हे प्रेम?? सारंग रोज घरी येतो…घरात कोणीही नसताना….तासनतास इथे घालवतो….त्याबद्दल अनय ने एक शब्दही विचारू नये?? आणि हाच विश्वास मी तोडायला निघाले??
अनय अजून तिथेच होता,सारंग ला शंका आली…तो दोघांच्या जवळ आला…
“ये सारंग, आमच्या मॅडम उशिरा पोचल्या ना तुला वाट पाहायला लावून?? अशीच आहे ती काय करणार…हा हा हा…”
सारंग चा जीव भांड्यात पडला, त्याला वाटलेलं की याला सर्व समजलं की काय….
इतक्यात मंदिरा शेजारची एका बिल्डींग ची भिंत पाडण्यात आली आणि अगदी कानठळ्या बसवणारा आवाज झाला…सर्वजण घाबरले, लहान मुलं रडू लागले आणि रेवा…
रेवा कान बंद करून डोळे गच्च मिटून अनय च्या कुशीत घाबरून बिलगली होती.अनय ने सुद्धा अगदी गच्च तिला सावरून घेतलेले….अनय च्या कुशीतल्या उबेने तिच्यात एक वेगळंच रसायन संचारलं…एक सुरक्षितता, एक विलक्षण अशी प्रेमाची ऊब…तिच्या आयुष्यातील प्रत्येक संकटात ढाल बनलेला अनय तिला आठवला…. मायेची पाखरण करून आईचीही आठवण येऊ न देणारा अनय तिला आठवला…सारंग सोबत इतका वेळ घालवूनही कधीही शंकेची पाल चुकू न देणारा आणि बायकोवर विलक्षण विश्वास असलेला अनय तिला आठवला….देवा ब्राह्मणाच्या साक्षीने घेतलेले सात फेरे आणि त्या पवित्र प्रेमाचे सोहळे तिला आठवले…एका क्षणात सारंग च्या क्षणिक आकर्षणाची पट्टी तिच्या डोळ्यावरून उडाली…
“रेवू, घाबरू नकोस, काही नाही झालेलं…अनय ने तिला कुशीतून काढत डोक्यावरून हात फिरवत सांगितलं….”
“तुम्ही दोघे तुमचं काम करून घ्या, मी जातो माझ्या कामाला… आणि रेवा, जास्त उन्हात फिरू नकोस…जाताना नारळपाणी घे आठवणीने…सारंग…आठवण कर रे बाबा तिला…”
असं म्हणत अनय निघून गेला…
सारंग लाही एव्हाना त्याची चूक कळली होती, रेवा आणि सारंग अजून उभेच होते…रेवा ने काहीतरी विचार केला…सारंग चा हात पकडला आणि आणि ती त्याला मंदिरात घेऊन गेली…सारंग तिच्याकडे चकित होऊन पाहत होता…
“सारंग, आपण जे करत होतो तो व्यभिचार होता…हे प्रेम नाही आकर्षण होतं… आज मला जाणीव झाली, की माझ्या अनय च्या रूपाने माझ्या आयुष्यातील पोकळी भरून निघालीये… इतकं भरभरून असताना मी दुसऱ्याच एका लाटेने वाहवत चालले होते..
सोड…
आज प्रेमाची नाही पण आपल्या मैत्रीची कबुली आपण देवाजवळ देऊया…आपली मैत्री अशीच राहो म्हणून प्रार्थना करूया….
सारंग आणि रेवा ने हात जोडले, डोळे मिटले….दोघांच्याही चेहऱ्यावर आज समाधानाचे भाव तरळत होते….
Article Categories:
मनोरंजन

Comments

  • Khupch sunder… Khupch Chan…. अनय trr khupch goad

    Sonali Kalbhor 17th जुलै 2019 7:57 am उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत