तिचं ऐकलं असतं तर….!!!!

Written by

वयाच्या 50व्या वर्षी जयेश ला भूतकाळातल्या आठवणींनी हैराण केलं होतं. 

“तिचं ऐकलं असतं तर??….”

एवढ्यात रमा चहा चा कप दिनक्रमानुसार हातात घेऊन आली आणि निघूनही गेली. रमा कितीतरी वर्षांपासून असंच यांत्रिकतेने काम करतेय, मला मानसिक उबेची गरज होती, पण रमा आता ते करायलाही धजत नव्हती… आता कुठलंच नावीन्य, प्रेम, आनंद उरला नव्हता. रमा ने मूकपणे मानसिक घटस्पोट घेतला होता.. मन भूतकाळात शिरलं…जयेश स्वतःशीच विचार करत राहिला..

माझं लग्न झालं, आमच्या घराण्यात शिकलेली अशी पहिलीच सून घरात आली होती.

मला फक्त ती शिकलेली आहे हे सांगण्यात अभिमान वाटायचा, बाकी तिच्या शिक्षणाला साजेसे काम तिला करू देण्यात मला रीती भाती अडवत असायच्या…

चूल आणि मूल या चौकटीत बसवून रमा संसार करत होती..

सासू सासरे दीर नणंद या सर्वांचं पाहण्यात त्यांचं आयुष्य गेलं..

रमा मला सांगत असायची, की आपण या लहानश्या गावात राहतोय पण बाहेरचं जग बघा…मोठ्या शहरात मोठ्या संधी असतात, आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही एक चांगलं आयुष्य जगता येईल…

तेव्हा मात्र मी साफ धुडकावून लावलं, रमा ला सासू सासरे नकोत म्हणून ही मला वेगळं करायचा प्लॅन करतेय असच मला वाटत राहायचं…

माझ्या मित्रांना मी याबद्दल सांगितलं, तेही म्हटले, अरे काय ठेवलंय त्या मोठ्या शहरात, आपलं गाव बरं आणि आपण भलं..

काही वर्षांनी तोंड लपवत हीच मित्रमंडळी शहरात गेली, 6 आकडी पगार कमवू लागली, पण मी मात्र 4 आकडी पगारातच गुरफटत राहिलो..त्यांची मुलं सडेतोड इंग्रजी बोलताय, 4 लोकांसमोर धिटाईने बोलताय..माझी मुलं मात्र मराठीही चाचपडत लिहिताय, 4 लोकांसमोर बोलायला लाजून लाजून अर्धे होताय…आता मला रमा आठवली..किती दूरदृष्टी होती तिची…पण मी मात्र तिच्यावरच दोषारोप करत राहिलो…

नवीन घर बांधायचं ठरलं होतं, आम्ही माणसं आपलं डोकं लावून घराची मांडणी करत होतो…रमा सांगायची, बंगल्याला खाली एखादा तरी गाळा काढा, आयुष्यभर थोडीफार आर्थिक कमाईचे साधन हाताशी असेल…

ही गोष्ट एखाद्या मित्राने सांगितली असती तर लगेच ऐकली असती, पण बायकोने सांगितली, म्हणजे नक्कीच तिचा काहीतरी स्वार्थ असणार…आणि कमी डोक्याच्या बाईचं तरी काय ऐकावं…म्हणून मुद्दाम तिच्या विरुद्धच करत गेलो…

आज या घडीला ईथल्या गाळ्यांचे भाडे अवाच्या सव्वा झालेत, किमती गगनाला भीडल्या आहेत..तेव्हा रमा चं ऐकलं असतं तर?? आज घरबसल्या गाळ्याचं किती मोठं भाडं मिळालं असतं..

मी नोकरी नको म्हणून छोटा व्यवसाय सुरू केला, रमा सांगत होती…हा व्यवसाय सगळेच करतात, आणि तुम्हाला तो व्यवसाय जमण्यासारखा नाही…तुमच्या कौशल्याला साजेसा दुसरा एखादा व्यवसाय करा…रमा नाही म्हटली म्हणून मी अजून जोराने कामाला लागलो, कारण बायकोचं ऐकणं म्हणजे बायकोचा बैल होणं असा समज करून बसलेलो…शेवटी केलेल्या व्यवसायात लाखो पैसे बुडवून बसलो….आधीच रमा चं ऐकलं असतं तर?? 

आज जुन्या मित्र मंडळींसोबत जायला लाज वाटतेय, आयुष्यात खूप पुढे गेली ती…आपल्या अशिक्षित बायकांना मॉडर्न बनवून मिरावताय…मी मात्र शिकून सवरून लक्ख अश्या हिऱ्याला पुरत्या अंधारात झाकोळून ठेवलं आणि त्याचा प्रकाश स्वतःवरही पडू दिला नाही….

रमा ला तेव्हा गरज होती, माझ्या साथीची, माझ्या विश्वासाची….मी मात्र केवळ आई वडील भाऊ बहीण आणि मित्रांतच अडकून पडलो….बायको म्हणजे घर तोडणारी मोठी दुश्मन असा किडा डोक्यात घेऊन बसलेलो….

आज भाऊ त्यांच्या संसारात रमली, मोठ्या शहरात जाऊन यशस्वी झाली,आई वडिल मुलांमधला हस्पक्षेप कमी करून देवधर्मात व्यस्त झाली, बहीण लग्न करुन मोठ्या घरात गेली…आज त्यांना कोणालाही माझ्याशी बोलायला वेळ नाही…मला आज रमा ची गरज आहे…पण तीही आता माझी बायको राहिली नाही…

तिला जेव्हा गरज होती तेव्हा मी तिच्यासोबत नव्हतो, मग आज मला जेव्हा गरज आहे तेव्हा ती कशीकाय साथ देईल मला?? शरीराने ती समोर आहे, पण मनाने मात्र खूप दूर गेलीये..रमा मला कधीही माफ करू शकणार नाही…माझ्या भल्यासाठीच ती सांगत होती, आपली बुद्धी वापरूनच सर्व बोलत होती…मी मात्र तिला कस्पटासमान वागवत गेलो, तिच्या मतांना, निर्णयाला पाठिंबा तर नाहीच नाही, पण मुद्दाम विरुद्ध वागत गेलो….

आता एकच पश्चात्ताप फक्त घोळवत असतो..

“तिचं ऐकलं असतं तर…..”

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा