तिचं पाहिलं प्रेम💘……..अर्ध अधुरं

Written by

“इस प्यारसे मेरी तरफ ना देखोsss प्यार हो जायेगा” हे गाणं आजही जेव्हा कुठूनही मुग्धाच्या कानावर पडतं, तेव्हा वयाच्या पस्तिशीतही तिला मनात काहीतरी होतंच.

नवीन नवीन आलेला शाहरुख खान खूप आवडायचा तिला, आणि तिच्याच वर्गात असणारा सुजयही. कारण तिच्या मते तो शाहरुख सारखा दिसायचा.

आठवीत होती ती फक्त. पण एक वेगळच काहीतरी वाटायचं त्याला पाहिल्यावर तिला. कोणाला म्हणजे कोणाला कळू दिलं नव्हतं काही तिनं. अगदी त्यालाही काही माहीत नव्हतं.
पण त्यावेळी तो तिच्या स्वप्नांंचा शाहरुख होता हे मात्र खरं. आणि हे गाणं तर खूपच आवडतं होतंं तिचं.

तसं वर्गात जवळपास प्रत्येकालाच कोणीतरी आवडत होतंच. अगदी मुग्धाच्या सुजयलाही. त्यालाही कोणीतरी दुसरीच आवडायची. आणि तिला कोणी तरी तिसराच.

बस्स हेच होतं सगळं. ते जसं होतं तसंच राहीलं तिच्या आठवणीत कायमसाठी!!!

कुठल्या गाण्यांच्या कुठल्या कुठल्या आठवणी, त्या गाण्यांबरोबर कुठे कुठे घेऊन जातात आपल्याला, मुग्धाचही अगदी तसंच व्हायचं!!!

एक असंच गाणं होतं तिच्या अगदी जवळचं, अशाच नाजूक बंधाच्या आठवणीत नेऊन सोडणारं……..

ते ऐकलं की मुग्धा तिची राह्यचीच नाही, हरवून जायची त्या आठवणींत…….

तेव्हा टिनएज मधे असलेली मुग्धा अगदी गोड दिसायची. स्वप्नाळू तर फारच होती.

जशी जशी मोठी होत होती, तसं तिलाही कोणी जवळचं असावं असं वाटू लागलं होतं. सिनेमा बघताना आपलाही एक हिरो असावा, तो कुठेतरी असाच फिल्मी स्टाईलने येऊन धडकावा, असं खूप वाटायचं तिला.

तशी अगदी नववी दहावी पासून एकटी बरेचदा गावाला जायची ती, प्रवासात कोणी हिरोने येऊन बाजूला बसावं, नाहीतर स्वतःहून कोणी आपली सीट द्यावी असे मनाचे इमले तयार करायची, पण प्रत्यक्षात कोणी हिरो तिला असा भेटला नाही.

काही नाही तर परीक्षेत तरी एखादा छानसा कोणी बाजूला बसावा असंही बरेचदा वाटायचं तिला, पण नेहमी एखादी मुलगीच बसायची तिच्या बाजूला!!!

पण मुग्धा अकरावीत असताना मात्र एकदाचा तो चमत्कार झालाच!!!

दुसरी युनिट टेस्ट होती, आणि ही नेहमीप्रमाणे या वेळी तरी कोणी चांगलं बसू दे रे देवा करत वर्गात आली.

एन्ट्री मारल्यावर तिची नजर सर्वात प्रथम जिथे गेली, तिथेच तो बसला होता. लास्ट बेंचवर. ती तिचा नंबर शोधत होती आणि तो शोधता शोधता त्याच्या बेंचजवळ आली.

तिच्या हृदयाची धडधड एवढी वाढली की बस्स रे बस्स, दोघांचा बेंच एकच!!!

तिला वाटलं खरं आहे का हे ?? एवढे दिवस मी वाट बघत होते तो दिवस खरोखर आला???

बारावीत होता तो, स्मार्ट आणि हिरो टाईपच होता. मुग्धाच्या मनात तर आनंदाच्या उकळ्याच फुटत होत्या.

भले देणं घेणं काही नसलं तरी एवढ्या दिवसांच स्वप्न जे पूर्ण झाल होतं.

आणि काय नुसतं जवळ बसल्याने प्रेम थोडंच होणार होतं??
पण तिला तो एका नजरेत आवडलेला एवढं खरं.

एक नंबरचा धम्माल आणि मस्तीखोर होता तो. अगदी तिच्यासारखाच. तोही इकडे तिकडे बघत याला त्याला विचारत खरडत असायचा, आणि तिही अगदी तशीच होती. मज्जा यायची तिलाही उगाच इकडे तिकडे डोकावत पेपर लिहायला.
पहिल्या पेपरची वेळ कधी संपली ते तिला कळलं सुद्धा नाही. तिला तर पेपर कधी संपूच नये असं वाटत होतं.

एका शब्दानेही बोलले नाहीत त्या दिवशी ते दोघे एकमेकांशी. पण जे काय चाललेलं ते मुग्धाला खूप आवडत होतं.

आता कधी एकदा उरलेला दिवस निघतोय आणि दुसरा दिवस उजाडतोय असं होत होतं तिला.
असेच उमटत होते तिच्या मनात तरंग बरेच हवेहवेसे!!मनातल्या मनात किती वेळा देवाचे आभार मानले असतील तिने, तिचं तिलाच माहीत.

दुसऱ्या दिवशी तर एंट्रीलाच दारात तो उभा…….

नजरा-नजरेबरोबर पुन्हा मुग्धाच्या हृदयात धडधड झाली.
पुन्हा त्याच्या सहवासात आणि एका धुंदीत पेपर लिहीणं सुरु झालं. आज मात्र तोच तिच्याशी पट्टी मागायला का होईना पण बोलला. आणि त्याहून विशेष म्हणजे तिला न येणाऱ्या एका प्रश्नाचे उत्तर स्वतःहून सांगितले.

मुग्धा हवेत होती, पण चेहऱ्यावर चुकूनही काहीही दाखवत नव्हती. फक्त तिला मनातून फार वाटायचं ही परीक्षा अशीच चालू राहू दे. ती पेपर संपल्याची घंटा कधी वाजूच नये.
पण घंटा वेळच्या वेळी वाजायची. मुग्धा अगदी जड मनाने तिथुन हलायची.

दोनच दिवस झालेले. पण मुग्धाला तो खूप आवडू लागला होता. खरं तर मुग्धाचं आणि त्याच राहण्याचं ठिकाण एकच होतं. एरिया वेगळा फक्त. बस स्टॉपवर तिने त्याला पाहिलंही होत बरेचदा, पण अपने बस की बात नही म्हणून सोडून दिलं होतं. आणि त्यावेळी तिला काही वाटलंही नव्हतं त्याच्याबद्दल.

पण आता मात्र सोडून दिलेल्या गोष्टीतच मुग्धा अडकून बसली होती.

तिला त्याच्या मनात काय आहे काही माहीत नव्हतं, आणि तिला काही अपेक्षाही नव्हती. ती तिचं प्रेम मात्र स्वतःशीच हजारदा व्यक्त करत होती.

तिसऱ्या दिवशी तिला परीक्षेला पोचायला थोडा उशीर झाला. आणी ती आल्यावर तो आज मात्र छानसा हसला.

मुग्धा घायाळ. पण विशेष काहीही न दाखवता हसून पेपर लिहायला लागली. आता तो तिच्या पेपरमध्ये जास्तच इंटरेस्ट घ्यायला लागला, स्वतःचा सोडून. जरा कुठे अडली की कुठून ना कुठून तिला तिला उत्तरं मिळवून द्यायला लागला. गाणी गुणगुणनंही सुरू झालं होतं त्याचं. तिला ऐकू जाईल अशी रोमँटिक गाणी गुणगुणत असायचा तो.

त्यातलंच एक “जाओ तुम चाहे जहाँ याद करोगे वहाँ”
नरसिंहा मधलं उर्मिलाचं. तिलाही आवडायचं ते, पण त्याच्या तोंडून ऐकून तिचं टॉप फेव्हरेट झालं होतं.

तो फक्त तिच्यासाठी गुणगुणत होता. आणि ती मनात इतकं काही वाटत असूनही काही न दाखवता सगळयाचा आनंद घेत होती.

हे सगळं चाललेलं असताना ती घंटा ठणठणायची.

का होते ही घंटा……का एवढी छान वेळ संपून जाते??

नाही जायचं मला घरी, इथं त्याच्या बाजूला पेपर लिहितच बसायचंय फक्त, मुग्धाला अजिबात आवडायची नाही ती घंटा.

वेड्या वयातलं वेडं स्वप्न होतं तिचं, कायम त्याच्या बाजूला बसून पेपर लिहीत बसायचं……

कसं असतं ना, एवढे दिवस एकमेकांना बघत होते, पण दोघांसाठीही एकमेक दुर्लक्षित होते, आणि आता अगदी दोन दिवसांतच एकमेकांसाठी एवढे जवळचे झाले होते.

मुग्धाला पेपर सुटल्यानंतरचा वेळ घालवणं अतिशय जड जाऊ लागलं. अभ्यास तर ती करायची पेपरचा, उगाच त्याच्यासमोर जास्त पचका नको म्हणून. पण मनात मात्र सतत त्याचाच विचार असायचा.

चौथ्या दिवशीचा पेपर लिहिताना सुद्धा मुग्धाला खूप मज्जा येत होती. तो खोडकर होता, उगाच काहीना काही करत असायचा. त्यांची प्रिलिम्स असल्याने येणारे टिचर्स सुद्धा त्यांना नुसतं ओरडून सोडून द्यायचे.

पण तिचा मस्त टाईमपास होत होता. काही अडलं तर मदतीला असायचाच तो तत्पर.

सवांद फक्त जेवढ्यास तेवढाच होता दोघांंत. आणि लागलं तर पट्टी, पेन्सिल, खोडरबर मागण्यापुरता.

पण मनं मात्र खूप बोलत बसायची एकमेकांशी!!

दोघांच्याही मनात एकाच वेळेस गिटार जी वाजली होती. तो दाखवत तरी होता काही ना काही करून पण मुग्धा नाहीच. मनात एवढं प्रेम असतानाही!!

ती फक्त सारे क्षण पुरेपूर अनुभवत होती. तिचा सारा आनंद तो तिच्या बाजूला आहे एवढ्यातच होता. तिला हे दिवस पकडून ठेवावेसे वाटत होते. ही परीक्षा संपूच नये असंच वाटत होतं मुग्धाला.

पण दुसऱ्या दिवशीचा पाचवा पेपर शेवटचा होता. आणि त्याचा गोड, कधीही संपू नये वाटणारा सहवास संपणार होता.

नेहमीप्रमाणे ती आली, पण आज नजरानजर झालीच नाही.

त्याचं आणि तिचंही चित्त धड नव्हतंच. एकमेकांकडे बघायची हिम्मत होत नव्हती आज. त्याला तर तिला मनातलं सांगायचं होतं आणि तिच्या मनात नक्की काय आहे, याची यत्किंचितही कल्पना नव्हती. कारण मुग्धाने चेहऱ्यावर कधी काही दाखवलंच नव्हतं.

इकडे मुग्धाला तरी माहीत होतं, त्यालाही आपण आवडतोय. तो तर पूर्ण अनभिज्ञच.

आता त्याचे मित्रही त्याला तिच्यावरून चिडवायला लागले होते. ती वर्गात आली की सगळे एका सुरात ओरडायला लागायचे.

ती सगळी वेगळीच मज्जा होती त्या वयातली. सर्वांना हवीहवीशी वाटणारी.

आज त्याला खरंच काही सुचतच नव्हतं. त्याने आपलं नेहमीचं गाणं सुरू केलं, जाओ तुम चाहे जहाँ…..

तो त्यातूनच व्यक्त होऊ पाहत होता. आणि ती मनाला थोपवून पेपर लिहीत होती. आज तो प्रत्येक प्रश्नात तिला मदत करत होता. हे लिही, असं लिही, दोघेही तिचाच पेपर सोडवत होते. आणि दोघांनाही फक्त तेच करावं वाटत होतं. बस्स असंच एकमेकांच्या बाजूला बसून पेपर सोडवत राहावं!!

त्यांच्यासाठी ते दोघेच होते फक्त तिथे. पिक्चरमध्ये दाखवतात तसच अगदी सगळे पॉझ झालेले त्यांच्यासाठी आणि हे दोघेच पेपर सोडवत होते एकमेकांसाठी.

नको नको वाटत असतानाच विरहाची वेळ जवळ येत होती. तो प्रचंड बेचैन होत होता आणि तिने डोळ्यांतील पाण्याला कसंबसं थांबून ठेवलं होतं.

अगदी शेवटची दहा मिनिटं राहिली होती. त्याला तिला सांगायचं होतं, पण सांगता येत नव्हतं.

शेवटची अगदी शेवटची काही मिनिटं. पुन्हा कधी हा सहवास मिळणार नव्हता, त्याच्या प्रिलिम्स नंतर त्यांना सुट्टी लागणार होती. त्याचं वर्ष संपलेलं. कॉलेजही बारावी पर्यंतच होतं.

आता अगदी शेवटची पाच मिनिटं उरलेली. जीवाची नुसती घालमेल.

दोघांनाही हव्याहव्याशा वाटणाऱ्या सुंदर सहवासाचे अखेरचे क्षण!!

होणारी घंटा झालीच. तो उठून झटकन बाहेर निघून गेला. मुग्धाने जाताना पाहिलंही नाही त्याच्याकडे.
रडावसं वाटत होतं आणि रडताही येत नव्हतं.

तिला वाटलं झालं आता संपलं सगळं…….

तो काही न बोलताच गेला होता, धीर झालाच नाही त्याचा.

मुग्धा कॉलेजमधून बाहेर पडली, तो कुठेच दिसत नव्हता. तिला वाटलेलं असेल बाहेर उभा तिच्यासाठी, पण तो कुठेच नव्हता. खूप खूप राग येत होता तिला त्याचा. असा कसा गेला? शेवटचं बघायलाही नाही मिळालं नीट. खरं तर तो असता तरी तिनं बघितलं नसतंच त्याच्याकडे.

पाच दिवसातही जी काही चुकून नजरानजर झाली असेल तेवढीच, तिने डोळेभरुन कधी पाहिलंही नव्हतं त्याच्याकडे, फक्त बाजूला बसून अनुभवलं होतं त्याला. पट्टी, पेन्सिलची देवाण घेवाण करताना जो काही ओझरता स्पर्श झाला असेल तेवढाच…….

पण आता थांबायचं तरी ना, मग ते त्याचं वागणं खोटं होतं का सगळं? मनात काही असतं तर गेला असता का असा??

मुग्धा विचार करत करत मैत्रिणींबरोबर बस स्टॉपवर आली. आणि बघते तर काय तिचा हिरो त्याच्या गँगबरोबर तिची वाट बघत तिथे उभा….तिला त्याक्षणी आनंदाने उड्या माराव्याशा वाटत होत्या!! पण ती काहीही न दाखवता त्याच्याकडे न बघता मैत्रिणींबरोबर बोलत उभी राहिली.

तो बेचैन होता. त्याला सांगायचं होतं त्याच्या मनातलं, विचारायचं होतं तिच्या मनातलं. त्याचे मित्र त्याला ढकलत होते पुढे, पण त्याला अजूनही धीर काही होत नव्हताच. नकाराचीही भीती वाटत असावी बहुतेक……..

आता मुग्धाला बस येवू नये असं वाटत होतं. आली तरी तोही असायला पाहिजे होता तिला. दोघांचा स्टॉप एकच होता उतरण्याचा. पण बस आलीच, नको तेव्हा बरोब्बर लवकर येते. बसला शिव्या घालत मुग्धा आत चढली. तो चढलाच नाही. काय हे, आता काय झालं याला???

तो खाली उभा राहून तिला पाहत होता. आणि बस हलली तसा धीर करून जोरात ओरडला, आय लव्ह यू मुग्धा!!!

नशीब बसमधल्या लोकांना ही मुग्धा नेमकी कोण ते माहीत नव्हतं!!!

तिच्या हृदयाचं पाणी पाणी झालं एकदम. तिलाही ओरडावसं वाटत होतं अगदी त्याच्यासारखंच फिल्मी स्टाईलने. ती मनातल्या मनात बोलली फक्त आय लव्ह यू टू……💕

बस्स जे ऐकावसं वाटत होतं ते ऐकलं एकदाचं. त्याने तिला विचारलंच नाही सांगून टाकलं फक्त.

घरी आल्यावर पहिले बाथरूम मध्ये जाऊन मुग्धा खूप खूप रडली, शांत केलं मनाला. आनंदही होता आणि स्वतःला व्यक्त होता नाही आलं याचं दुःखही.

इतके दिवस जे सारं आपल्याबरोबर घडायची ती वाट बघत होती ते सगळं तिच्याबरोबर घडलं होतं. जसं तिला हवं होतं तस्सच अगदी एखाद्या पिक्चरसारखं!!

दुसऱ्या दिवशी कॉलेजला जाताना तो आला होता बस स्टॉपवर तिला पाहायला. तिने पुन्हा एकदा काहीही दाखवलं नाही.

नंतरही बरेच दिवस तो येत होता, पण हिने काहीच रिस्पॉन्स दिला नाही. पण तो आला नाही तर मात्र देवाला आळवत बसायची त्याला पाठवण्यासाठी.

मुग्धा अक्षरशः झुरत होती त्याच्यासाठी……..
कधी त्याच्या एरियात गेली तर तिची नजर फक्त त्यालाच शोधत बसायची. आणि दिसला की चेहऱ्यावर मात्र काहीच नाही दाखवायची ती.

त्यावेळी काही मोबाईल नव्हते. मुग्धाच्या घरी तर लँडलाईन पण नव्हता. संपर्क होणार तरी कसा???

तो तिच्या घराच्या इथेही यायचा, पण ती त्याला कुठलाच रिस्पॉन्स द्यायची नाही. एकदा रस्त्यात त्याने थांबवलं तर थांबलीही नाही जराशी. काय समजणार तो??

नंतर त्यालाच वाटलं असावं, ये अपने बस की बात नही!!

का करत होती मुग्धा असं?? जीवापाड प्रेम करत होती त्याच्यावर, मग सांगत का नव्हती त्याला??

कारण मुग्धात ते प्रेम पेलायची हिम्मत नव्हती. निदान त्यावेळी तरी त्या वयात तरी. त्यांच्या प्रेमात सर्वात मोठा अडसर होता तो धर्माचा. तिच्या घरात दुसरी जात चालणारी नव्हती, तर दुसरा धर्म कुठून चालला असता??

अगदी पहिल्यापासून माहीत होतं हे तिला आणि त्यालाही………

पण वेडं प्रेम हे सारं समजतच नाही अगदी कुठल्याही वयातलं!!

म्हणतात ते खरं आहे; प्रेम कोणावरही होतं, धर्माचं, जातीचं, वयाचं कुठलंच बंधन ते जुमानत नाही. तसंच त्यांनाही झालेलं, माहीत असूनही नकळत गुंतले गेलेले त्यात दोघेही.

तशी मुग्धा पहिल्यापासून कुठलंही बंधन न मानणारी होती. पण त्यावेळी तिचे विचार कदाचित तेवढे ठाम नव्हते. भीती जास्त होती आणि त्याच भीतीने तिच्या प्रेमावर मात केली.
कदाचित त्याने जोरदार पिच्छा पुरवला असता, तर भेटलेही असते ते. पण मुग्धाच्या वागण्याने त्याला काही समजलेच नाही. आणि तिला आपण काही आवडत नसावं, असे समजून काही महिन्यांनी तोही शांत झाला.

मुग्धा खर तर वेडी होती त्याच्यासाठी. तिने आपलं प्रेम त्याला दाखवलं असतं तर तो सहवास कदाचित वाढलाही असता, कदाचित आयुष्यभरासाठीही………!!!

पण त्यासाठीचा मार्ग प्रचंड खडतर होता.
आणि कदाचित तो पार करू शकू हा विश्वासच नसावा त्यावेळी तिला.
तिला विश्वास द्यायला तोही कमी पडला असावा कदाचित.

त्या पाच दिवसांचाच सहवास होता त्यांच्या नशिबात!! एकाच भागात राहून नंतरही पुन्हा कधी ते एकमेकांना भेटलेच नाहीत, दिसलेही नाहीत.

तिचं प्रेम कायमसाठी अधुरंच राहिलं………

पण जेव्हा कधी तिला कोणी तिच्या पहिल्या प्रेमाबद्दल विचारतं तेव्हा तिला फक्त तोच आठवतो. हो, पहिलं प्रेम होतं तिचं ते, तिने त्याच्याच नावावर केलेलं आयुष्यभरासाठी.

जेव्हा कधी “जाओ तुम चाहे जहाँ” गाणं तिच्या कानावर पडतं तेव्हा अजूनही तिला हृदयात एक हलकीशी कळ जाणवते आणि मग त्या गाण्याबरोबर तिचं मन तिला अकरावीच्या परीक्षेच्या हॉलमधे त्याच्या सोबत पेपर सोडवायला घेऊन जातं……….

आणि पेपर सोडवताना आता, मुग्धा गुणगुणत असते…..

मैंने ज़िंदगी में सिर्फ़ तुमसे प्यार किया

लेकिन तुमसे कभी ना पूरी तरह इकरार किया…..

दिल में छुपाए हूँ मैं कितनी उमंगे जवाँ

जाओ तुम चाहे जहाँ, याद करोगे वहाँ…….

©️स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत