तिची किंमत (भाग 1)

Written by

#तिची_किंमत (भाग 1)

किचनओटा पुसायचा आज निशा ला जरा कंटाळाच आलेला. नुकतंच मुलांच्या परिक्षांमधून सुटका झाली होती. इतके दिवस धावपळ करून तिला अशक्तपणा आला होता. मुलांना सुट्ट्या लागल्या तशी ती जरा मोकळी झाली. मुलं बाहेर खेळायला गेलेली, कमरेला हाताचा टेकू देत ती सोफ्यावर आडवी झाली. तिच्या आवडीच्या मालिकेचा भाग tv वर चालू होता…

“म्हणजे हा राणाच आहे नक्की?? तो तर राजा राजगोंडा सांगत होता…बरं झालं बाई आला एकदाचा…”

तो अंजली जवळ जात असतो…डोळ्यात प्राण आणून ती बघत असते इतक्यात मुलं आरडाओरड करत घरात येतात…

“आई ती रिंकू मला जाड्या म्हटली…तू रागाव तिला..”

आपल्या शेवग्याचा शेंगा एवढया टील्याला जाड्या म्हणायचं धैर्य दाखवणाऱ्या रिंकू चा तिला जाम अभिमान वाटला…

तिला झापायचं वचन देऊन तिने मुलांना परत बाहेर पिटाळलं… परत मोर्चा आपल्या राणा दा कडे वळवला तर नेमक्या जाहिराती सुरू झालेल्या…

“शी बाई, आपल्या नाशिबतच नाही शांततेत tv बघणं…”

शेवटचे 2 मिनिटं मालिका बघून ती अनिच्छेने उठली आणि किचन ओटा पुसून घेतला…अर्ध्या तासापूर्वी धुतलेले भांडे वाळत नाही तोच बेसिन मध्ये 3 डिश, 4 ग्लास आणि 1 पातेलं आ वासून बघत होतं….

ते धुवायची अजिबात हिम्मत नव्हती म्हणून न पाहिल्यासारखंच तिने आपला मोर्चा बेड कडे वळवला…

खूप दिवस नंतर तिने 1 तासाची दुपारची झोप घेतली होती….

उठल्या नंतर तिला जरा बरं वाटू लागलं…एव्हाना मुलंही घरात येऊन tv बघत होती….

दमलेली ती पुन्हा एकदा charged झाली…

संध्याकाळी नवरा कामाहून परत आला, आल्या आल्या “ही इथे काय घाण पडलीये”, “तिथे कसला कचरा दिसतोय”, “फ्रिज आज पण साफ केलं नाही का…” असा समाचार त्याने घेतला…

निशा ला त्याची सवय झाली होती…तिने हो ला हो जोडून वेळ मारून नेली….

पण आज राजेश जरा टेन्शन मधेच दिसत होता. तिने त्याचसाठी कडक चहा कवरून आणला…

राजेश कप हातात घेत शांतपणे पीत होता..

“काही टेन्शन आहे का कामाचं?”

निशा ने विचारलं..

राजेश काहीही बोलला नाही…

थोड्या वेळाने राजेश चिडचिड करू लागला, क्षुल्लक गोष्टी उकरून काढू लागला…

निशा चाही संयम सुटला, तिने प्रत्युत्तर दिले…

शेवटी राजेश म्हणाला..

“काय उपयोग ग तुझा?? एक तर चार पैसे कमवायचीही अक्कल नाही, मीच मर मर मरायचं… बर आणि घरातलं नीट आवरशील तर तेही नाही, वीट आलाय मला तुझा…”

असं म्हणत राजेश तिथून निघून गेला….

निशा ला धस्स झालं, तिच्या डोळ्यात पाणी आलं…संसाराचा गेल्या 7 वर्षांचा काळ सरसर तिच्या डोळ्यासमोरून गेला…

क्रमशः

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत