तिची किंमत (भाग 4 अंतिम)

Written by

इतक्यात मुलं मागून पळत आली,

“पप्पा, औषध घेऊन काही फायदा नाही, दादू चं पोट अजून दुखायला लागलं…”

निशा ने पटकन मुलाला जवळ घेतलं, तो आईला बिलगून रडत होता…निशा ने पटकन त्याला पिशवी गरम करून पोट शेकून दिलं, त्याला बरं वाटलं…

राजेश हताश होऊन तिच्याकडे बघत होता..

“माफ कर निशा, अगदी कालपर्यंत माझा तोरा तसाच होता, पण या 8 दिवसात आम्हाला खरंच तुझी किंमत कळली ग…”

“आधीचे 2 दिवस छान गेले, सगळी मजा करून झाली, मी जेव्हा घर आवरायला घेतलं तेव्हा माझ्या नाकी नऊ आले…मला वाटलेलं घरात कामं असतात तरी काय, पण मुलांनी घरभर केलेला पसारा, 10 वेळा खाऊ खायला काढलेल्या डिश आणि चिखलाचे पाय आवरत आवरत माझा दिवस निघून गेला…”

किचन मध्ये वास कसला येत होता राजेश??

अगं भांडी घासून वैतागलो होतो मी, मग सगळे एकदम घासू म्हणून जमा केले, आणि मला लक्षातही राहिलं नाही अगदी कालपर्यंत…तू आली आणि दिले एका ठिकाणी कोंबून…

काल माझ्या एका लांबच्या भावाच्या लग्नाला गेलेलो, तू नव्हतीस म्हणून कोणी मलाही विचारत नव्हतं…तू असतीस तर सर्वांची विचारपूस करून वातावरण अगदी आनंदी केलं असतं…. मला जाणीव झाली, लोकं तुझ्या प्रेमळ स्वभावानेच मलाही ओळखत होते, तुझा नवरा म्हणून मानाने बघत होते, मी काय फक्त ऐटीत वावरायचो…मला वाटायचं की माझीच वट आहे म्हणून लोकं मला विचारताय….पण जाणीव झाली की मला माझी ओळख फक्त तुझ्यामुळे मिळाली…

मला अगदी माझा रुमाल शोधण्यापासून ते मुलांचं जेवण बनवण्यापर्यंत नाकी नऊ आले होते, पदोपदी तुझी आठवण यायची….पण माझा हेकेखोरपणा मला नडला…असं वाटायचं की फोन करावा आणि लगेच घेऊन यावं तुला..

मला घर आवरत आवरत इतका थकून जायचो की संध्याकाळी काही बनवायला अंगात त्राणच नसायचे…मग शेवटी रोज बाहेरून मागवून खायचो…

मुलांना बजावून सांगितलं होतं की आईला यातलं काहीही सांगायचं नाही…

बाहेरच्या खाण्याने दादू चं पोट बिघडलं, कालच दवाखान्यात जाऊन दाखवलं..

निशा, खरंच तू किती काम करतेस…किती गृहीत धरलेलं मी तुला…तुझ्या कष्टाची जाणीवच ठेवली नाही मी…पण तू 8 दिवस दूर काय गेलीस आणि इथे मी पुरता गेलो…

मी अपूर्ण आहे तुझ्याशिवाय, तुला जे काही बोललो ते अगदी चुकीचं बोललो…माफ कर…

निशा च्या डोळ्यात पाणी आले,

“बस की आता, तुम्हाला माझी किंमत कळाली हेच खूप झालं….चला आता आवरून घ्या, गरमा गरम भाजी पोळी बनवते…पोटभर जेऊन घ्या…

एरवी भाजी पोळी ला नाक मुरडणारे दोन्ही मुलं शिस्तीत मांडी घालून भाजी पोळीची वाट पाहू लागले….

समाप्त

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा