तिची दिवाळी

Written by

अलक
आज तिने काखोटीला पिशवी मारली. सकाळीच घराच्या बाहेर पडली..
आज घरोघरी उरलीसुरली दिवाळी तिच्या पदरात पडणार होती. पोर काल पासुन दिवाळी मागत होती..
लोकांची दिवाळी संपायची व हिची चालू व्हायची तिची पोर रस्त्यावर न फुटलेली फटाके गोळा करायला भटकायची, तर हि दारोदारी जाऊन ललकारी द्यायची. ऊरली सुरली दिवाळी घाला ग बायांनो माझ्या पदरी ! लक्ष्मी वास करेल तुमच्या घरी, मायं लेकरं खातील, आनंदाने दुवा देतील. बायाबापड्या या ललकारीने खुष होऊन तिच्या पदरी उरलासुरला फराळ घालून अन्नदानाचे पूण्य पदरी पाडून घेत. काखोडीची पिशवी तीची भरायची, मग ती घराकडे धाव घ्यायची. तिची चार चिल्लीपिल्ली दारात वाट पहात असायची. आई आली कि, पिशवीवर झडप घालायची मग सगळ कागदावर ओतले कि लाडूचे भुगा, करंज्याचे तुकडे चिवड्याची चाळण, चकलीचे तुकडे,पोरं गोड मानुन खायची.मग गोळा करून आणलेल्या फटाके फोडायला पळायची. फटाके फोटल्याचा आनंद त्यात शोधायची. निष्पाप चेहऱ्यावरील आनंद माऊली डोळ्यात टिपायची. पूढच्या जन्मी तरी सदन कुटुंबात जन्माला घाल रे बाबा, म्हणून देवाला साकडं घालायची. आपलेच भोग म्हणून परत पुढच्या दिवाळी कडे डोळे लावून बसायची झोपडीत मिणमिणत्या दिव्यातील उजेडात अढ्याकडे डोळे लावून..!
ऊज्वला रवींद्र राहणे

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा