तिला हवे कौतुकाचे दोन शब्द,…

Written by

तासभर राबून तिने सुंदर सजवलेल्या सुरळीच्या वड्या सासूबाईंसमोर धरल्या आणि म्हणाली,”आई बघाना जमल्या का वड्या,..सासूबाईंनी एक वडी तोंडात टाकली आणि म्हणाल्या अग फार जाड झाल्या आहेत अगदी पातळ असतात त्या…”त्यांचं उत्तर ऐकून ती जरा हिरमुसली बाजूलाच सासूबाईंची मैत्रीण बसलेली होती सुनेचा पडलेला चेहरा तिच्या लगेच लक्षात आला तिलाही एक वडी दिलीच होती ,ती लगेच म्हणाली,”अग सुनबाई,जमतील पण चव सुंदर झालीये हं,पण पहिल्यांदा केल्या असशील म्हणून थोडया जाड झाल्या असतील नेहमी करत जा जमतील,..तसा अवघड पदार्थ आहे हा,..तू प्रयत्न केला हेच खूप छान कारण खास सुगरणीचा पदार्थ आहे हा.”                              सासूबाईंच्या मैत्रिणीच्या कौतुकाने ही थोडी सुखावली आणि जरा मार्गदर्शन केलं म्हणून तिला बरं वाटलं पण तिला हे सगळं अपेक्षित सासूबाईंकडून होतं… कधी काही केलं की त्यांच्या सारखी चव जमत नाही म्हणून त्या लगेच बोलतात मग मुडच जातो परत काही करण्याचा,……बरं हे वागणं फक्त सासुबाईंचं अस नाही सगळेच तसं करायचे,..नवरा तर चहा पासून कुरकुर करायचा आणि कधी तर म्हणायचा आई तुझ्यासारखं नाही जमत हिला ,..ती खिडकीतून बाहेर बघत असा उदास विचार करत होती..
.इकडे हॉलमध्ये मैत्रिणीने सासूबाईला जरा समजवणीच्या सुरात सांगितले अग लग्न होऊन सहाच महिने झालेले ,..आईकडे काही न करणारी ही पोरगी आपल्या नव्या संसारासाठी जबाबदाऱ्या पेलायला शिकत असते पण तिला असं निगेटिव्ह बोलून मग तिचा आत्मविश्वास कमी होतो,..आणि ती शिकतेही पण सुरुवातीपासुन तिच्याविषयी जो दृष्टिकोन बनतो तो काही बदलत नाही तिने किती काही चांगलं केलं तरी हिला हे जमत नाही ह्याचा शिक्का तसाच असतो,..तुला जर तुमचं नातं छान टिकवायचं असेल तर जरा कौतुक करायला शिक आणि त्यातून शिकव जे चुकलं आहे ते नाहीतर ती करणारच नाही नवीन काही,…सासूबाईला पण पटलं,….
दुसऱ्या दिवशी मुलगा चहा घेताना कुरकुरायला लागला तेंव्हा सासुबाई स्वतःच म्हणाल्या अरे ,छान झालाय फक्त थोडी साखर जास्त आहे पण फ्रेश वाटतंय चहा पिऊन,…उद्या जरा कमी घाल सुनबाई साखर,….नंतर सासूबाईने मुलाच्या कानात काहीतरी कुजबुज केली,…आणि दुपारी चक्क नवरोबाने फोन केला हिला भाजी फारच सुंदर झाली आहे ग,बक्षीस द्यावं लागेल आल्यावर,..ती एकदम लाजली कौतुकाने मोहरली आणि अजून उत्साहाने स्वयंपाकाला लागली,…

रात्रीचा चविष्ट स्वयंपाक खाऊन सासरेबुवा सासूबाईला म्हणाले सुनबाई तर तुझ्यापेक्षा सुंदर स्वयंपाक बनवतीये,..त्यावर सासुबाई म्हणाल्या मला कौतुकाचे दोन शब्द मिळाले नाही ना कधी नाहीतर मी पण अशी स्वयंपाक लवकर शिकले असते….
               स्वप्ना मुळे(मायी)?

Article Tags:
Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा