‘ती’ची भुक…

Written by

काळ बदलला की सगळं काही बदलतं हे लहानपणापासूनच ऐकत आलोय , वेळ बदलली की जागा बदलते , जागा बदलली की भूमिका बदलते आणि भूमिका बदलली की चेहरे बदलतात. कधी घेतले जातात गरजेनुसार हात हातात तर सोडलेही जातात हातातले हात गरजेनुसारच. घर बदलतं , छप्पर बदलतं , अंगण बदलतं , सगळं काही बदलतं , बदलत नाही ती फक्त “ती”… तिचं मन , तिच्या भावना , आणि आतल्या आत तिने अश्रु लपवल्याचे संदर्भ….
जेव्हा घरातली माणसं घराबाहेर जातात तेव्हा एकटीच मुसमुसते ती आतल्या घरात.., डोळ्यांच्या कडांवर नेहमीच जमते गर्दी , लागते रांग दुःखद आसवांची… पण तरीही चेहऱ्यावर क्षणोक्षणी मुखवटे घालते हो ती हसऱ्या सौंदर्याचे..,
हल्ली तिच्या आसवांना वाटा भेटत नाहीत आणि तिचे अश्रू पाहुन त्याच्या निद्रिस्त संवेदना कधीच उठत नाहीत.
तिनं पोटासाठी कधी घर सोडलं तर एखादी खोली दिली जाते भाडे तत्वावर , तसं
हृदयाचा एक कप्पा देता आला असता तर….??
काल गेला , आज जातोय , उद्याही जाईल कालच्या दिशेने. कायम राहतील तिची स्वतःशी असलेली सुखदुःखाने वेढलेली मनोगतं…
इथं रोजचीच रात्र अपेक्षाभंगाच्या रक्ताळलेल्या जखमांनी सजलेली असते.वाट पाहून थकलेले डोळे आधाराचा किनारा शोधत असावेत कदाचित , तोवर स्पीडब्रेकर येत राहतो हुंदक्यांचा ,”अश्रूंवर प्रयोग करता येत असता तर ?”, तर “शोधून काढले असते त्याचे निर्माते आणि घडवून आणल्या असत्या त्यांच्या कत्तली , रक्ताचे अगणित पाट वाहिपर्यंत ,रक्त शांत होईपर्यंत”
रक्त हा शब्द उच्चारेपर्यंत हजारदा उसळलेलं असतं तिचं रक्त ,
भल्या पहाटे अंगणातल्या तुळशी वृंदावनाला पाणी घालताना वाटत असेल का तिला…”आपण सुध्दा सामवावं यामध्ये???
… पण नको सुगंधाला वेदनेचा गंध नको..”
घरासमोर रांगोळी रेखाटताना आसवांचा पाऊस रंगोळीवर झाला तर समजायचं की तिच्या काळजावर खोलवर रुजलेल्या वेदनांच्या रंगोळीशी तिचा अविरत संघर्ष सुरुय आणि भूकेचा अंशही मिटला नाही अजुन ,
पोटातल्या
आणि
मनातल्याही…

– सुजित काळंगे

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा