“ती”च वेगळंच जग

Written by

#तीच_वेगळंच_जग

©सरिता सावंत भोसले

दोन जीवांची होती ती जेव्हा तो तिला सोडून गेला. दोन दिवसांनीच लग्नाचा दुसरा वाढदिवस होता…खरेदी करायला जायचं होतं…मी ऑफिसमधून लवकर येईन तू आवरून बस अस सांगून गेलेला…..ही पण छान साडी नेसून नटून तयारच झालेली. एवढ्यात फोन वाजला…समोरून  अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये या अस सांगण्यात आलं…तस हिचे हातपाय थरथरायला लागले…नक्की काय झालं असेल आणि कस???

विचारांचं काहूर डोक्यात घुमत होत…तशीच पर्स घेतली आणि हॉस्पिटल गाठलं. त्याच्या आणि स्वतःच्या आई वडिलांना फोन करून बोलवून घेतलं. काही वेळातच कळलं तो गेला कायमचाच….अवघा दोनच वर्षांचा संसार…अजून संसार मुरायचा होता..रुसव्या फुगव्यांनी सजायचा होता..आता त्या संसार वेलीवर फुल उमलणार होत…किती स्वप्न पाहिलेली..येणाऱ्या बाळाचं नावही ठरवलेलं. ते अस हसेल,तस दिसेल, तसं रडेल…त्याला अधिकारी बनवू..नको वैज्ञानिक बनवू..नको शिक्षक बनवू..त्या शाळेत घालू..नको या शाळेत घालू…रोज रात्री या स्वप्नांचा प्रवास चालू व्हायचा…आता थांबला की कायमचाच.

पार कोसळून गेली ती तो गेल्यावर. सासर माहेरची हक्काची माणसं होती सोबत पण सप्तपदी सोबत चाललेला गेला सोडून एकटीलाच. आता त्याच्या आठवणींशिवाय काही उरलं नाही तिच्या आयुष्यात.

एक प्रेमाची निशाणी सोबत म्हणून सोडून गेला. त्याच्यासाठीच ती जगत होती आता. तो जन्मला तस हळू हळू तिच्या दुःखातून बाहेर यायला लागली. आता मुलासाठी आपणच आई आणि वडील आहोत याची जाणीव झाली आणि नोकरीचा निर्णय घेतला. तस शिक्षण होत चांगलं म्हणून नोकरी मिळण्यात काही अडचण नाही आली पण एक विधवा, तरुण आणि सुंदर स्त्री म्हणून संधी साधणारे बरेच जण भेटले तिला.

एका ऑफिसमध्ये तर बॉसनेच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. धीराने आणि धाडसाने वागली ती तेव्हा पण ती नोकरी सोडून दिली. अशा वाईट अनुभवांमुळे बऱ्याचदा रडायची पण हार मानायची नाही. मुलाकडे बघून पुन्हा उभी राहायची. तोच आता तिची ताकद होता.

स्वतःसाठी अशी ती जगलीच नाही.  मुलाच्या शिक्षणासाठी राब राब राबली. त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून सदैव ती तत्पर राहिली. तीच विश्व म्हणजे तिचा मुलगा आणि मुलाचही विश्व म्हणजे आईच.  समाजाच्या भेदक नजरा, ऐकू न वाटणारे टोमणे, आरोप सगळं सहन करत ती मुलाच्या भविष्यासाठी निडर बनली.स्वतःची हौसमौज नाही की कसली आवड तिने जपली नाही. पै पै जमवून मुलाला इंजिनिअर केलं.

छोटंसं का होईना स्वतःच्या हिमतीवर तिने घरटं उभारलं पण त्या घरट्यातच तुझ्याही नवीन आयुष्याची सुरुवात कर असा अट्टाहास मात्र ठेवला नाही. मुलाचं लग्न झाल्यावर परदेशात नोकरीची संधी चालून आली तिने हसतच होकार दिला. मुलाची इच्छा होती आईनेही सोबत यावं पण ऊन पाऊस झेलून उभारलेल घरटं तिला सोडायचं नव्हतं. आठवणींपासून दूर जायचं नव्हतं आणि मुलानेही तिच्यासाठी स्वतःची प्रगतीची पंखच छाटावी हेही तिला मान्य नव्हतं. तिने स्वखुशीने दोघांना परदेशात पाठवलं.

आता तिला एक नातही आहे गोड. येतात वर्षातून एकदा तिला भेटायला. अजूनही मुलगा हट्ट करतो तू चल सोबत पण तिचं मन तयार होत नाही. आता पहिल्यासारख एकटीला घरकाम करताही येत नाहीत म्हणून वृद्धाश्रमात राहण्याचा निर्णय तिनेच घेतला. नात आली की तेवढे दिवस जाते ती तिच्या घरट्यात. काही दिवसांनी वाटत मुलगा कायमचाच परत येणार आहे तिच्याजवळ.

वृद्धाश्रमातल्या नेहमीच एका हसऱ्या, प्रसन्न चेहऱ्याच मला आकर्षक वाटायचं. त्या चेहऱ्याच गूढ आज जाणून घेतलंच.

नेहमी ऐकलं होत की मुलगा,सून नीट सांभाळत नाही म्हणून वृद्धाश्रमाचा आधार असतो पण त्या चेहऱ्याला बघून कळलं की अशाही काही कहाण्या वेगळ्याच असतात. “ती”च्या वेगळया जगाने मनाविरुद्धच वृद्धाश्रमाचा स्वीकार असतो या समजुतीला कुठेतरी छेद दिला.

नशिबाने जे जे समोर उभ केल ते ते तिने स्वीकारलं…लढून, सामना करुन स्वतःच वेगळं विश्व उभं केलं. न हारता स्वाभिमान जागा ठेवला. उतरणीच्या काळातही आनंदाने वृद्धाश्रम स्वीकारलं. इतरांच्या मते हे दिवस आपल्या हक्कांच्या माणसांसोबत घालवायला हवेत तिने पण आतापर्यंत ती धावतच आली…. स्वतःचा विचार करायलाही उसंथ तिने स्वतःला दिला नाही….आता तिच्या मनाला जिथे विसावायचं आहे आनंदाने तिथेच विसावून द्यावं. आहे ती खुश,आनंदी मनापासून.

लेख आवडल्यास लाईक,कंमेंट्स करा
आणि शेअर करा पण नावासहितच??.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा