तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे..

Written by

रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याच ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे..!!
तशी जाते मी एक दोन महिन्याला.. शनिवारी सकाळी उठायचं.. बॅगेत सापडतील तसे दोन ड्रेस घालायचे आणि निघायचं.. एक रात्र राहायचं आणि रविवार संध्याकाळी परत.. येताना एक बॅग एक्स्ट्रा हातात (कारण काय वेगळं सांगावे.. आठवा फक्त तुमचीही माहेरून निघताना सामानाची कथा..) तर ही कहाणी या दीड दिवसाची.. तुमची माझी नावं वेगळी.. गावं वेगळी.. पण ही कहाणी थोडी फार तुमचीही तितकीच, जितकी माझी.. !! ही जेवढी एका लग्न झाल्यावर दुसऱ्या गावी सासर असणाऱ्या मुलीची तेवढीच मूळ गाव सोडून नोकरीला दुसऱ्या गावी आलेल्या मुलांचीही.. !!
फक्त माय चे घर ते माहेर इतकी सोपी सरळ व्याख्या नाही ती.. फारच कंगोरे आहेत त्याला.. लहानाचे मोठे झालो ते घर, तिथल्या आठवणी, सगळे माहेरचे नातेवाईक, सासरचे खूप सारे नातेवाईक, भरपूर मित्र सगळेच आहेत इथे माहेरच्या गावाला.. शाळा, कॉलेज, ऑफिस, क्लास आणि गप्पांचे कट्टे सगळेच आहे इथे.. इथल्या हॉटेल मधील जेवण चविष्ट का गप्पा चविष्ट हा एक जागतिक चर्चेचा विषय आहे.. जी कथा हॉटेल ची तीच शॉपिंग ची.. एवढंच काय माझा शिंपी, डेंटिस्ट, पार्लर वाली आणि असे बरेच “वाले” हे पण अजुन इथेच आहेत.. या सगळ्यांना बसवायचं असतं या दीड दिवसात.. काही भेटतात.. काही रुसतात.. काही समजून घेतात.. कोणाला भेटायचं असा प्रश्न आयुष्यात पडण्यापेक्षा वेळ कमी पडला म्हणून भेटता नाही आलं हे जास्त छान.. कशाला आली भेटायला यापेक्षा भेटायला वेळ नाही झाला म्हणून रुसणारे आहेत हे जास्त छान.. आपण जमेल तेवढं जमवत रहायचं बाकीच्यांना नेक्स्ट टाईम म्हणत राहायचं.. दीड दिवसाच माहेर मिरवत रहायचं..!!
आपला जीव त्यात सगळीकडेच अडकतो.. हेही सोडवत नाही आणि तेही.. सासरचे पण इतके आहेत माहेर च्या गावात की कधी कधी माहेरी जाऊन पण “घरी” जायलाच वेळ मिळत नाही..घरचे समजूतदार.. उलट खुश होतात.. म्हणतात मुलगी रुळली सासरी आम्हाला अजुन काय हवं.. तरीही मन हुरहूर लावतच.. अशावेळी डोळ्यातला एक चुकार थेंब जाताना गल्लीत सोडून जायचं.. तीन तास मनात घर आठवत राहायचं.. अशावेळी माहेरच्या गल्ल्या सुधा आधार देतात.. जुने क्षण आठवून उगाच हसवून जातात..!!
इथले रस्ते सांगताना मी खूप गोंधळात पडते.. सगळे चिडवतात इतकी वर्ष गेली तुझी इथे, इतकी फिरलीस बाईक वर तुला रस्ते कसे सापडत नाहीत.. काय सांगू इथल्या प्रत्येक रस्त्यावर ढीगभर आठवणी सोडल्या आहेत.. त्या आठवणींच्या मागे जाताना आपण गाडीत चार गल्ल्या पुढे गेलेलो असतो.. आणि मग सगळंच हरवल्यासारखं वाटतं रस्ताही आणि आठवणीही.. आणि मी एक पुणेरी वाक्य बोलते फक्त.. पुण फार बदललं ना अशात..!!
आपलं म्हणजे कसं दीड दिवसाच्या गणपती सारखं.. एकच आरती.. त्यातच सगळ्यांना बोलवायचं, तेव्हाच वाटायचा प्रसाद, तेव्हाच दाखवायची आरास, बाप्पा ला मनात साठवायच तेव्हाच आणि पुढच्या वर्षी च्या आरतीची स्वप्न रंगवायची तीही तेव्हाच..!!
तस सुखासुखी चाललेलं आहेच की सासरी.. काय तक्रारी करायला थोडीच जायचं असतं माहेरी.. महत्त्वाचं असं काहीच काम नसत.. पण उगीच थोड पाय पसरून सुस्त व्हावं वाटत.. हातातलं घड्याळ थोड काढून ठेवावं वाटत.. तेवढंच समाधान वाटतं मनाला की रोजच्या routine मध्ये एक हक्काचं विसाव्याच ठिकाण आहे.. तीन तास अंतरावर माझं दीड दिवसाचं माहेर आहे..!!

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.