ती आजारी पडली की सगळं घर आजारी पडतं?

Written by

“आई उठ ना ग काय सारखी झोपतेस,मला बोर होतं तू अशी झोपलीस की.”इति चिंगी,..दोन दिवसांपासून तिला बरं वाटत नव्हतं,..चिंगीची कुरकुर ऐकून,आई म्हणाली हं,पण ती उठली नाही तेवढ्यात सोन्या पण आला,”आई चल बरं तू दूध गरम करून दे ग,बाबाला तीनदा म्हंटल पण तो नाही हलत.”दोघे एका सुरात आई उठ ग,म्हणू लागले, तिने काढलंच अंगावरचं पांघरूण, आणि निघाली तरतर स्वयंपाक घराकडे,हॉंल मध्ये नवरोबा मोबाईलमध्ये गुंग,तिरपा रागीट कटाक्ष टाकून ती स्वयंपाकघरात गेली,तिला खूप काही बोलायचं होतं पण मुलं आणि सासरेबुवा समोर धिंगाणा नको म्हणून तिने तो कढ आतल्याआत गिळला,..असं खूपदा होत की त्याच्या काही वागण्याचा तिला इतका राग येतो पण ओठ घट्ट मिटून सहन करावंच लागतं, आताही तसच झालं,ती रडवेली होऊन मुलांना दूध देत होती,…चिंगी लगे आईला चिटकून म्हणते बघ,ओट्या जवळ उभी आई किती छान दिसते,आता नको हं जाऊन झोपू, तूच कर रात्रीचं जेवण बाबाने काल किती बोर भाजी विकत आणली होती,..ती उगाच कसनुशी हसली,…त्यावर सोन्या म्हणतो ,मग काय तर आई तू झोपली की बोर होत ग घरात,तू तिकडे खोलीत जाऊन झोपते,इकडे कोणीच घरात बोलत नाही,तू कशी गाणं गुणगुणत असते तस तर काहीच नाही तू इथं बस बाई पण तिकडे जाऊन झोपू नको,….मुलं दूध पिऊन खेळायला गेली,आणि सासरे सूनबाईच्या हातचा अदरकाचा चहा पिऊन देवळात गेले,…नवरोबा मस्त मोबाईलमध्ये गुंग,चहा पिऊन कप तिथेच पडलेला,तिने हॉलमध्ये नजर टाकली काल संध्याकाळ पासून ती आजारी पडली अजून 24 तास पण झाले नव्हते तर सगळं घर आजारी दिसत होतं,
हॉलमध्ये पेपर पसरून पडलेले,बूट,सॉक्स दारामागे रेंगाळत पडलेले,शाळेतून आलेल्या बॅग,त्यात डबे तसेच,पाण्याच्या बाटल्या,पुस्तकं, दिवाण वरच्या चादरी गोळा झालेल्या,ते सगळं पाहून आता ती चिडली,काय पसारा करता मी एक दिवस आजारी पडले तर,…तिचं रौद्र रूप पाहून जरा गडबडून त्याने पेपर आवरायला घेतले,… पण आता त्या अवरण्याचं तिला कौतुक नव्हतं,…मला कोणी रोज सांगत का? मग मी जस आपलं घर म्हणून आपसूक करते तस नवऱ्याने कधी तरी केलं तर काय हरकत आहे,?हा प्रश्न तिच्या मनात घोळत होता,..भरभर हॉल आवरून ती स्वयंपाकघरात शिरली, ..मस्त गरम मेथी पराठे बनवले,देवापुढे दिवा लावला,आज त्याची रांगोळी राखलेली नव्हती,..देवाला हसुन हात जोडून ती म्हणाली,..घराला तर येतच आजारपण मी आजारी झाले तर पण तुझ्याही देवघराला आजारपण आल्यासारखं झालं की रे,साधी झाडावरची फुलं आणून वाहिली नाही कोणी तुला नुसतीच पूजा करून ठेवली,…नकोरे बाबा सगळ्याच घरात स्त्रीला आजारी पडू नको ,…कारण ती आजारी पडली की सगळं घर आजारी पडतं,? ©स्वप्ना मुळे,(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा