ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही…

Written by

©️सौ.योगिता विजय टवलारे ✍️

त्या दिवशी मी एकटीच घरात होते.. संध्याकाळची वेळ होती.. हळू हळू अंधार आपले साम्राज्य पसरवित होता..मी देवाजवळ दिवा लावून रिमोट घेऊन टीव्ही समोर बसले.. नुकतेच “पुरानी हवेली” लागलेला..मी खुश झाले..लहानपणी भीतीदायक वाटणारा सिनेमा … आता मात्र तोच सिनेमा पाहून जाम हसून घेते..

मी सिनेमा बघण्यात मग्न होते ..मला अचानक कसलासा आवाज आला..मी कानोसा घ्यायचा प्रयत्न केला..तर तो आवाज अगदी जवळून येत होता..पण दिसत मात्र कुणीच नव्हते..नाही म्हणल तरी भीतीची एक लाट सळसळून गेली..मला अचानक अस्वस्थपणा जाणवायला लागला आणि मी खिडकीतून बाहेर डोकावून बघितले..हवेची एक हलकीशी झुळूक येऊन मला स्पर्शून गेली.. तेवढ्यापुरते बरे वाटले …पण अस्वस्थपणा काही कमी झाला नाही…

घर थोड गावाबाहेर असल्यामुळे बाहेर तुरळकच गर्दी होती..मी ह्यांना फोन लाऊन विचारले , केव्हा येणार आहात ?? त्यांनी तिकडून उत्तर दिले.. दोन तास तरी लागतील !! हे ऐकुन माझ्या काळजात धस्स झाले..मी घड्याळीकडे बघितले.. आठ वाजत आलेले..म्हणजे ह्यांना यायला दहा तरी वाजतील..

मी फोन खाली ठेऊन कीचनकडे वळणारच होते तर माझे लक्ष टीव्ही कडे गेले..त्या सिनेमावर आताशी हसणारी मी !! पण घरात येणारा आवाज आणि त्या सिनेमातील भीतीदायक आवाजाने मी चांगलीच दचकले आणि टीव्ही बंद करायला गेले ..टीव्ही बंद करणारच काय ? तर परत तोच चिरपरिचित आवाज कानावर येऊन धडकला..आणि…आणि…

चुकून टिव्ही बंद न करता लाईट बंद झाला..मग तर माझी आणखीनच टरकली..मी परत लाईट ऑन करायला गेले तर लाईट चालूच होईना..मी बाकीचे बटण ऑन , ऑफ करून बघितले तेव्हा लक्षात आले लाईन गेलीय..

म्हणजे नियती आज माझ्यावर सूड उगवणारच होती..मी मोबाईल शोधण्यासाठी धडपडत होते..विचार केला मोबाईलचा टॉर्च लाऊन खिचडी लाऊन घेते व सोबतच कढी नी पापड तळून घेते..स्वयंपाक करण्याच्या बेतात माझ्या लक्षातच नाही आले की तो आवाज परत वर डोकं काढू बघतोय..

मी देवाचे नामस्मरण करत मेन डोअर बंद केले आणि स्वयंपाक करण्यात मन गुंतवून घेऊ लागले..कूकरच्या तीन सिट्या होईस्तोवर लाईट आलेली..देवाचे आभार मानत पदराने घर्म बिंदू टिपत ..मी हॉल मधे आले.. फॅन ची बटण ऑन करून सोफ्यावर स्थिरावले..हुश्श ! किती बरे वाटले मला तेव्हा..परत टिव्ही लावण्याचा विचार मनात आला..पण . नकोचं.. थोडावेळ विश्रांती घ्यावी म्हणून बेडरूम कडे वळले..

पण तिथे माझ्या आधीच कुणीतरी दबा करून बसले असेल ह्याची मी कल्पना सुद्धा केली नव्हती..त्या आवाजाने माझी पूर्ण रूम व्यापून गेलेली..मी घाबरतच लाईट ऑन केला ..पण रूम मध्ये तर कुणीच नव्हते…पण मग माझा तो भास असेल का ?? असू देत.. मी मन पक्क करून बेडवर स्थिरावले..क्षणात डोळा लागला..आणि..आणि..परत तोच आवाज कानी आला..

ह्यावेळी मात्र तो भास नव्हता..ते , जे काही होते..ते अगदी माझ्यासमोर होते ..माझ्याकडे एकटक बघत .. त्याची खुनशी नजर बघून माझ्या काळजात कळ उठली…to be or not to be.. तो एकटा नव्हताच ..त्यांची पूर्ण गँग होती..एकट्या बाईला पाहून त्यांनी त्यांचा डाव साधला होता..पण मी माझे होते नव्हते बळ एकवटून , जवळचीच बॅट उचलून त्यांच्यावर सपासप वार करू लागले..

त्यांची पूर्ण गँग माझ्यापुढे निष्प्राण होऊन पडली होती..आज एका स्त्रीने विजय मिळवला होता..ह्यानंतर जगात एकही स्त्री डासांना घाबरणार नाही..ती माझ्यासारखी लढेल… आणि जिंकेल..एकटी स्त्री बघून कधीही आणि कुठेही हे डास छेड काढतात.. जेव्हा कधी तुमच्या आयुष्यात असे प्रसंग येतील तेव्हा माझी आठवण काढून लढा..आणि कायम लक्षात असू द्या..आपण स्त्रिया अबला नाहीयोत..

मी डेंग्यू आणि मलेरिया सारख्या आजाराला जवळ फिरकू सुद्धा देणार नाही..घरात कुणी नसतांना मी स्वतः चे प्राण वाचवले..ह्यातच मी धन्य झाले..आणि तेव्हाच ह्या योगिताची मी एक रणरागिणी झाले.

पण …ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही…?

#लेख आवडल्यास नावासकट शेअर करा..कारण ती लढाई मी जिंकली तुम्ही नाही..??

?योगिता विजय ?

२१/८/१९

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत