ती सध्या काय करत असेल ?

Written by

उन्हाळा म्हटलं कि शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या, उन्हाळ्याच्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्यां मध्ये गावाकडून मुंबईला किंवा पुण्याला कामासाठी गेलेली गावाकडची लोक रोजच्या धावपळी च्या कामा मधून काही दिवस का होईना आराम मिळावा म्हणून आपल्या परिवारासह गावांमध्ये येऊन राहतात, शहरातील मुलांना परीक्षा संपताच गावाकडे जायची ओढ लागते आणि सुट्ट्यां मध्ये काय काय करायचे याच प्लांनिंग चालू होत…

माझं पण असच छोटस गाव आणि गावापासून साधारण ३ किमी अंतरावर आमचं शेतात बांधलेलं घर ,जवळ पास अजून ७ ते ८ घरं आणि सगळ्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती, गावाकडेच १० वी पर्यंत शाळा झाली आणि ११ वी ला जवळच्या गावाच्या junior कॉलेज मध्ये शिक्षण चालू झालं. मी तसा थोडा कमीच बोलणारा, एक साधारण आणि थोडासा हुशार मुलगा, दिसायला पण नीटनेटका होतो आणि नेहमी style मध्ये राहायचा प्रयत्न करत असायचो….

गावाकडे राहिल्या मुळे शहरानं मधून सुट्ट्यांमध्ये आलेल्या मुलां, मुलीं बद्दल मला खूप कुतूहल वाटायचं, त्यांची राहण्याची, बोलण्याची पद्धत हि गावाकडं च्या मुलानं पेक्षा थोडी वेगळी आणि आधुनिक असायची, त्यांना नवीन कार्टून्स बद्दल, सिरिअल्स ,गाणी, सिनेमा, हिरो, हिरोइन्स बद्दल खूप जास्त माहिती असायची आणि आम्ही गावाकडच्या मुलांना फक्त शक्तिमान आणि छायागीत हेच माहिती होत , कारण त्या वेळेस डिश टीव्ही नव्हता, दूरदर्शन आणि सह्याद्री चॅनेल वर जे काही असेल तेच पाहायचो, मोबाईल तर पाहायला सुद्धा मिळत नव्हता, १०-१२ तास तर लोड शेडींग असायचं त्यामुळे टीव्ही पण क्वचितच पाहायला मिळायचा ..
गावाकडे राहत आल्यामुळे सुट्टीच्या दिवशी घरच्यांना शेतात मदत करणे, गायी- बैलांसाठी चारा आणणे आणि दुपारी ४ नंतर आमचा मुख्य टाइम पास म्हणजे क्रिकेट ( बॅट आणि बॉल )…
संध्याकाळी कधी कधी रात्री ९ ते १० वाजे पर्यंत वीज नसायची त्यामुळे गप्पा मारणे, रात्री आकाशात ताऱ्यांचा निरीक्षण करणे आणि घरा बाहेर असलेल्या ओट्यावर बसून मित्रांबरोबर अंधारात काही तरी टाइम पास करायचा हेच आमचं रोजच ठरलेलं.

अशीच ११ वी ची परीक्षा संपली होती आणि उन्हाळ्याची सुट्टी लागली होती, आभ्यासातून काही दिवस सुटका झाली होती..आणि नेहमी प्रमाणे ती सुद्धा सुट्ट्यांमध्ये गावाकडे तिच्या नातेवाईकांकडे आली होती, लहानपणा पासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो, कारण ती सुद्धा प्रत्येक उन्हाळ्यात सुट्टी मध्ये तिच्या नातेवाईकांकडे येत असायची, ती शहरात राहत असल्यामुळे स्वाभाविकच तिच्या बोलण्याची आणि राहण्याची पद्धत अगदी नीटनेटकी होती. ती दिसायला पण सुंदर होती आणि मला तर लहानपणा पासूनच तीच खूप कुतूहल वाटायचं, कारण अजून पर्यंत मी एकदाही पुण्यात किंवा मुंबई ला गेलो नव्हतो, त्यामुळे शहरातील लोक कशी राहतात, मित्र मैत्रिणी एकत्र कसे ग्रुप मधे राहतात, मुलगा आणि मुलगी सुद्धा मित्र असू शकतात, कॉलजे लाइफ कसे असते या गोष्टींविषयी खूप आकर्षण होत..कारण गावाच्या कॉलजे मधे हे सर्व नसत, मूल आणि मुली क्वचितच बोलतात….

ती आणि मी एकमेकान बरोबर तसं कमीच बोलायचो, पण या वेळेस ते बोलणं पण अजून कमी झालं होत, त्यामध्ये दोन कारण होते, एक म्हणजे आम्ही आता मोठे झालो होतो, साहजिकच काय बोलावं , कोणत्या विषयावर बोलावं हेच कळत नव्हतं आणि चार लोकां समोर बोलताना कुणी गैर समज करून घेऊ नये म्हणून थोडं अंतर ठेवलेलं बर असे माझे विचार होते, ती पण असाच काही तरी विचार करत असणार कारण वयात आलेल्या मुलींना तर अधिक निर्बंध टाकले जातात …

असेच सुट्टी चे दिवस जात होते आणि आम्ही कधी तरी फक्त एक दुसऱ्याची विचारपूस करत असायचो ..गावाकडे तसेही मुलां मुलींचं जास्त बोलणं होत नव्हतं आणि सर्व काही अगदी नॉर्मल होत….

पण अचानक आम्ही आता बोलत का नाही आणि ती माझ्या बद्दल काय विचार करत असेल, असे प्रश्न माझ्या मनामध्ये हळू हळू येऊ लागले आणि कुठेतरी मी तिच्या बद्दल विचार करू लागलो , ती पण असाच काहीतरी विचार करत असेल का ? असे प्रश्न पण मनात येऊ लागले ..आणि हळू हळू हे विचार वाढतच गेले …
गावामध्ये उन्हाळ्यात संध्याकाळी वातावरणात खूप छान असते,शुद्ध हवा, थंड आणि जोरात वाहणारा वारा, मोठी मोठी हिरवी झाडे आणि शेतात असलेली पिके पाहून मन अगदी प्रसन्न होत, अधून मधून उन्हाळी पाऊस देखील पडतो आणि त्यामध्ये असलेली सुट्टी आणि शहरामधून आलेले मित्र त्यामुळे एकूणच एक अगदी आनंदमय वातावरण असते…

पण या सुट्टी मध्ये माझं मानसिक संतुलन थोडं वेगळंच वाटत होत, नक्की काय झालाय हे कळतंच नव्हतं, कोणीतरी सतत आपल्या नजरे समोर असावा असं वाटत होत, कुणाला तरी सतत पाहण्याची ओढ लागलेली असायची, थोडी सुद्धा चाहूल लागली कि मन इकडे तिकडे कुणाला तरी शोधायचा प्रयत्न करायचं…अचानक मित्रां पासून थोडं वेगळं आणि एकटा बसून काहीतरी मनात सतत विचार चालू असायचे , जेवाच पण भान नाही राहायचं, घरच्या शेतीच्या कामामध्ये पण मन लागतच नव्हतं..
फक्त एकच विचार मनामध्ये चालू होता आणि तो म्हणजे ती माझ्या बद्दल काय विचार करत असेल? तिला मी आवडत असेल का आणि काहीतरी कारण काढून दिवसातून एकदा तरी तिला कसे पाहता येईल अशी संधी मी शोधायला लागलो, ती दूर वरून जरी दिसली तरी मला खूप आनंद होत असे, कारण जे सगळं चालू होत त्यानुसार हे तर नक्की होत कि तिच्या मनात सुद्धा असेच काहीतरी विचार चालू होते, ती सुद्धा आता काही ना काही कारण शोधून माझ्या समोर येण्याचा, माझ्याशी बोलायचा थोडा थोडा प्रयत्न करत होती…

हि सगळी प्रेमाची सुरुवात होती का हे माहित नाही पण तिने माझ्या मनात कुठे ना कुठे एक घरं नक्कीच निर्माण केलं होत आणि हळू हळू आम्ही एक दुसर्यांकडे पाहून स्मितहास्य देखील करायला लागलो होतो, ती नेहमी मी जिथे असेल इथे जवळपास आपल्या मैत्रिणीनं बरोबर फिरायचा प्रयत्न करायची आणि मीही दिवसातून जितका वेळ मिळेल तितका तिच्या समोर असायचा प्रयत्न करायचो..आता तर आम्ही चालत जात असताना एकमेकांना मागे वळून सुद्धा पाहायला लागलो होतो. …आणि हे सर्व चालू असताना आमचं बोलणं अजून कमी झालं होत …फक्त एकमेकांना दुरून पाहत बसायचं आणि तेही कोणाला चुकून पण संशय येणार नाही याची काळजी आम्ही घेत होतो ..अगदी तिच्या मैत्रिणींना सुद्धा आणि माझ्या व तिच्या नातेवाईकांना काहीच कळू नये म्हणून आम्ही खूप काळजी घेत होतो..

हे सर्व चालू असताना आम्ही दोघांनींहि कधीही एकमेकांना प्रपोझ करायचा प्रयत्न देखील केला नव्हता , जे काही चालू होत ते मनाला खूप आनंद देणार होत..अगदी उन्हाळा असताना सुद्धा सगळी कडे जणू काही पाऊसच पडत आहेत असं वाटत होत, अशी फीलिंग आयुष्यात कधीही आली नव्हती, आयुष्यातील पाहिलं आणि निरागस प्रेम होत ते, काहीही अपेक्षा ना करता आणि दोघांकडून सारखाच मिळालेला प्रतिसाद, का झालं प्रेम, कधी झालं, कस झालं हे सर्व गोष्टींचा विचार देखील कधी केला नव्हता. एक दुसऱ्यावर असणार प्रेम अजून शब्दांमध्ये सुद्धा व्यक्त केलेलं नव्हतं आम्ही, एक दुसऱ्याच्या नजरेत नजर घालून फक्त एक टक पाहत बसने हेच आमच्यासाठी खूप समाधानकारक होत..जणू काही फक्त नजरेच्या भाषेतच आम्ही बोलत होतो..आपल्या भावना शब्दातून व्यक्त करण्याची हिम्मत देखील करायचा प्रयत्न आम्ही केला नव्हता..जणू काही संपूर्ण आयुष्य इथेच थांबावं आणि तिन असच माझ्या समोर असच बसून राहावं असं वाटायचे, इतरांच्या नजरा चोरून तीच माझ्याकडे बघणं मला खूप आवडायचं …आता मी दिवस आणि रात्र फक्त तिचाच विचार करत होतो …त्यावेळेस मोबाईल फोन्स पण नव्हते, एकमेकांशी कितीही बोलायची इच्छा असताना सुद्धा काही बोलू शकत नव्हतो, कारण कुणाला संशय येईल आणि तिला परत तिला कधीही गावाकडे येता येणार नाही अशी भीती दोघांच्या मनात होतीच, आणि तिचे नातेवाईक आणि माझे घरचे एक मेकांत नेहमी मिसळणारी लोक होती, म्हणून आम्ही अधिकच काळजी घेत होतो…
ती एखाद्या दिवशी माझ्या समोर आली नाही किंवा मी काही कामासाठी बाहेर गेलो तर दुसऱ्या दिवशी तिच्या डोळ्यांमध्ये असलेलं पाणी आणि भावुक झालेल्या नजारा यावरूनच समजायचं कि दिवस भर एकमेकांची किती आठवण काढली असेल ते …सर्व भावनांचे खेळ फक्त मनातल्या मनातच चालू होते आणि एकमेकांच्या नजरेतूनच आम्ही काही तरी सांगायचं प्रयत्न करत होतो..आम्ही दोघेही अगदी जसा वेळ मिळेल तसा काही तरी कारण काढून एकमेकांसमोर जाण्याचा प्रयत्न करत होतो ..हे अगदी रोज च routine झालं होत, एकमेकांची सवय झाली होती, ती २-३ तास जरी दिसली नाही तरीही मन अगदी कासावीस होत होत..तिला कधी एकदा डोळे भरून पाहतो असं वाटायचं..आणि तीही जमेल तसा प्रयत्न करत होतीच…शेवटी तिच्यावर माझ्या पेक्षा जास्तच बंधने होती..तरीही कुणाला न समजता लपून छपून एकमेकांच्या नजरेतुन आम्ही खूप काही बोलत होतो ..तीच रुसणं , रागावणं आणि माझ्यावर असलेलं प्रेम हे मी तिच्या नजरेमधूनच अनुभवत होतो ..उघडपने जे मनात आहे ते शब्दात बोलण्याचा प्रयत्न देखील आम्ही करत नव्हतो …

असेच हळू हळू सुट्टीचे दिवस संपत आले होते आणि सुट्टी संपली कि ती परत शहरामध्ये निघून जाणार असे विचार मनात येवु लागले होते आणि अचानक ऊर भरून येवु लागला होता, फक्त रडायलाच बाकी होत आता आणि ते सुद्धा मनातच, डोळ्यांमधून पाणी आपोआप बाहेर येऊ लागलं होत, का होत हे सगळं काहीच काळात नव्हतं..ती आपल्यापासून दूर जाणार हा विचारच सहन करण्या सारखा नव्हता, काहीतरी व्हावं आणि सगळं आयुष्यच इथे थांबावं असं वाटत होत …पण तिला परत जावं लागणार होतच..

शेवटी तिची सुट्टी संपत आली आणि तिचंही कॉलेज चालू होणार होत, ती कधी जाणार आहे या बाबत इकडून तिकडून काही तरी माहिती गोळा करायचा प्रयत्न करत होतो..आणि शेवटी तो दिवस आला , तिचे आई बाबा तिला घेण्यासाठी आले, ती जाणार त्या आधी रात्रभर मला झोप लागलीच नाही, काही तरी प्रॉब्लेम होऊन तीच जाण कॅन्सल व्हावं असं सारखं वाटत होत,  तिला आपल्या मनातील भावना शब्दात सांगायच्या राहूनच गेल्या होत्या .. कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच ती परत जाणार होती..
माझ्या नजरा रोजच तिला शोधत असायच्या आणि कसे का होईना दिवसातून एकदा का होईना आम्ही एकमकान समोर यायचो आणि पूर्ण दिवस अगदी आनंदी जायचा ..ज्या दिवशी ती समोर येत नसे तो दिवस आणि रात्र फक्त तिचाच विचार करण्यात जायची आणि कधी एकदा दुसरा दिवस उजाडतो आणि तिला पाहतो असे वाटायचे…

पण आता हे सर्वच बंद होणार होत कारण ती आता माझ्या पासून खूप दूर जाणार होती आणि ती पण असाच विचार करत होती… कारण जाण्याच्या दिवशी अगदी नेहमी हसत दिसणारा तिचा टवटवीत चेहरा आज कोमजलेला होता..आज तिचे डोळे देखील खूप काही सांगायचं प्रयत्न करत होते .. तिला पण मला खूप काही शब्दांत सांगायचं होत आणि हे पण राहूनच गेलं होत ..आणि शेवटी दुसरा काही पर्याय देखील नव्हता.. अजून कॉलेज , कॅरियर , सेटलमेंट या सर्व गोष्टी आयुष्यात येयच्या बाकी होत्या ..पाऊसाचा अगोदर जे वादळ उठत असच काही वादळ हे आयुष्यात आलं होत. एका शेवटच्या क्षणी आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी तिने माझ्याकडे पहिले आणि ती निघून गेली …

ती निघून गेली पण माझ्यासाठी पाठीमागे तिने सोडलेल्या आठवणी खूप त्रासदायक होत्या , काही दिवस तर जेवण सुद्धा जात नव्हते , दिवस भर काय हे करावं समजत नव्हते..मी एकटाच निर्जन ठिकाणी बसून तिचा विचार करायचो, ती कुठून तरी परत आपल्या समोर येईल असं मनाला वाटायचं, तिचा smile करताना , मागे वळून पाहताना , सगळ्यांच्या नजारा चकवून माझ्याकडे पाहतानाचा चेहरा सतत माझ्या डोळ्या समोर येत होता आणि माझ्या डोळ्यांत होत फक्त पाणी आणि तिच्या आठवणी…असं पाहिलं प्रेम परत कधीही आयुष्यात होणार नव्हतं..
दुसऱ्या उन्हाळ्याच्या सुट्टीला अजून एक वर्ष मध्ये जायचं होत, तिची भेट आता परत एका वर्षानंतरच होणार होती , मध्ये कुठल्याही प्रकारचा संवाद अपेक्षित नव्हता…सर्व आठवणी १२ महिन्यांसाठी जपून ठेवायच्या होत्या…
पहिलं प्रेम काय असतं याची जाणीव झाली होती..वयाच्या १८ व्या वर्षी बालपणातच झालेलं हे प्रेम होत..अजून शब्दांमध्ये व्यक्त करण पण बाकी होत , तिला काय आवडत , मला काय आवडत , तिला आयष्यात काय करायचं आहे, मला कसला छंद आहे या सर्वा पलीकडे झालेलं पाहिलं प्रेम आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही…

पुढे प्रेमाचं काय झाले , ती परत आली का, आम्ही एकमेकांना मनातील भावना शब्दांत सांगितल्या कि नाही असे खूप काही प्रश्न आहेत..मलाही असाच प्रश्न आहे …ती सध्या काय करत असेल ????

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा