ती सहसा चुकत नाही……!!

Written by

 

ए, सगळंच काय रे तुला तुझ्या बायकोला विचारायचं असतं??
आता या शेअर्स मधलं तिला काय कळणार??
अतुलचा मित्र कुत्सितपणे म्हणाला.
तो अतुलला, त्याने घेतलेल्या कंपनीचे शेअर्स घ्यायला भरीस पडत होता.
अतुल म्हणाला, हे बघ आम्ही दोघेही पैसे कमावतो. जी काही सेविंग्ज् आहेत ती आमच्या दोघांची आहेत. तिला विचारल्याशिवाय मी त्याला हात लावू शकत नाही.
आणि राहिला प्रश्न तिला कळण्याचा, तर बरेचदा ती माझ्यापेक्षा जास्त अपडेटेड असते. बरेच निर्णय हातघाईवर येऊन घेतल्याने मी खूपदा पस्तावलोय, पण ती सहसा चुकत नाही; हे मी आता मान्य केलय. एखाद्या गोष्टीचा चारी बाजूने विचार करून तेवढा वेळ घेऊन ती योग्य तेच ठरवते.
आता कुठलाही निर्णय घ्यायचा झाल्यास आम्ही दोघे चर्चा करूनच घेतो. तेव्हा मी मिनलशी बोलल्याशिवाय तुला या गुंतवणुकीबाबत काहीच सांगू शकत नाही.
अतुलचा मिनलवर इतका विश्वास असण्याची कारणंही तितकीच होती. तो जरी चांगला बिझनेसमन होता, तरी त्याच्याकडे व्यवहार ज्ञान तेवढे चांगले नव्हते. त्याचा सगळा भर पैसे कमावण्यावर असायचा. त्याचे नीट नियोजन कसे करायचे, याचा विचार तो फारसा करायचा नाही. कोणाच्याही बोलण्यात येऊन तो कधी त्यांनी सांगितलेल्या कुठल्याही योजनेत पैसे गुंतवायचा आणि बहुतेकदा फसायचाच.
हे करण्यास गळी पाडणारे त्याचे मित्र असायचे किंवा कोणी जवळचे आप्तेष्ट, त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो अगदी सहज कोणतीही शहानिशा न करता पैशाची गुंतवणूक करायचा. त्यांनाही स्वतःबरोबर डूबायला कोणी जोडीदार हवा असायचा, मग काय अतुल होताच !!
असंच मागे एकदा अतुलच्या एका मित्राने लोणावळ्याला विकेंडसाठी सेकंड होम खरेदी करायची योजना मांडली.
अतुललाही ती खूप आवडली. लोणावळ्यासारख्या हिलस्टेशनवर घर, तेही त्वरित बुकिंग केल्यास भरघोस डिस्कउंटमध्ये मिळणार होतं. अतुलही हुरळून जाऊन त्यात पैसे गुंतवायला तयार झाला. सगळं कागदावर होतं. मित्राबरोबर जाऊन साईट देखील पाहून आला. आणि भलताच खुश होऊन मिनलला सांगू लागला.
मिनलने मात्र त्याला सबुरीने घ्यायला सांगितले. अश्या बऱ्याच योजना फसव्या असतात. नुसती ओसाड जमीन पाहून आलास तू, ती बघून पैसे गुंतवणार का??
तू पण एक बिझनेसमन आहेस ना?? हल्ली किती बातम्या येतात, जमिनी दाखवून लोकांचे पैसे लुबाडल्याच्या. ज्या जमिनी दाखवतात त्या पण बरेचदा त्यांच्या नसतात.
तू सध्या तरी काही पेमेंट करू नकोस. काही कोण पळून जात नाही कुठे. पूर्ण खात्री कर, आणि मगच पुढे जा.
मिनलने अशी आडकाठी घेणं, त्याला खटकतं, पण तरी तो थांबतो. त्याचा मित्र मात्र गुंतवणूक करून बसतो.
आणि वरून याला चिथवत राहतो, एवढ्या चांगल्या डिस्कउंटच्या ऑफर मध्ये सेकंड होम मिळणार होतं, घालवलास लेका तू!!
बायकांना कोणी असल्या गोष्टीत मध्ये घेत का??
अतुलला खूप टोचायचं ते, पण मिनलचं कुठेतरी बरोबर वाटत होतं. घाई करून अनेकदा फसला होता तो.
मित्राने डिवचल्यावर तो तिला बोलायचा, मी आपल्या घरासाठी चांगल्याचा विचार करतो,आणि तू नेहमी त्यात काहीतरी खोट काढतेस.
असं बोलला की मिनलला खूप वाईट वाटायचं, तरी ती म्हणायची ठिक आहे, तू सगळी डिटेल काढून आण, पूर्ण शहानिशा कर, मग आपण तू सांगशील तिथे पैसे टाकू.
हे सर्व करण्याचे पेशन्स काही अतुलमध्ये नसायचे, त्याला फक्त कुणी सांगितलं काही चांगलं आहे, की डोळे मिटून त्यावर विश्वास ठेवणे एवढंच माहीत होतं.
यांचं सेकंड होम घेण तूर्तास तरी रद्द झालं. मध्ये मध्ये तो मित्र मात्र अतुलला आठवणीने खिजवायचा.
पण पुढे दोनच महिन्यात त्याच मित्राने अतुलला फोन केला, आणि म्हणाला, तू वाचलास लेका, सगळं फ्रॉड होतं, माझे पैसे बुडाले रे!!
हे ऐकून अतुलने मोठा निश्वास सोडला. आणि मिनलला ताबडतोब फोन करून सांगितले, आज तुला माझ्याकडून पार्टी!!
मिनलने पेपरात वाचलंच होते, तिला कळलंच पार्टी कशाबद्दल ते!!
तेव्हापासून अतुलने कान पकडले, कुठलाही व्यवहार मिनालशी बोलूनच पुढे न्यायचा.
त्याने तिला एकदा विचारलेही, काय ग तुम्हा बायकांना खरंच का सगळं कळतं??
मिनल म्हणाली, सगळंच कळत असं नाही रे, पण आम्ही काही समजण्यासाठी पेशन्स धरून ठेवतो. बरेचदा समोरच्याला बघूनच ताडतो, आणि आमचा सिक्स सेंथ असतोच जोडीला, तो आम्हाला खूपदा काही सांगतो.
अजूनही त्याला भरीस पडणारे त्याच्या आजूबाजूला होतेच, बरेचदा बोलता बोलता ते त्याचा पुरुषार्थ जागा करू पहायचे. पण आता अतुल कोणाच्या शब्दात अडकत नव्हता. कारण त्याचा विश्वास मिनलवर जास्त होता, ती सहसा चुकत नाही हे त्याला अनुभवांती कळलं होतं. आणि तिला आपल्या घराची सर्वात जास्त काळजी असते, ती नेहमी आपल्या घराचं भलं पाहते, स्वतःपेक्षा जास्त ती घराचा विचार करते, यावर आता त्याचा पूर्णपणे विश्वास होता.
खरंच, बऱ्याच ठिकाणी अजूनही घरातल्या स्त्रीला डावललं जातं, तिला काय विचारायचं, तिला काय कळतंय ही वाक्य सहज फेकली जातात. पण खरंतर अनुभवांची शिदोरी तिच्याकडेच जास्त असते, त्याबरोबर पारखी नजर सुद्धा असते तिच्याकडे, जी तुम्हाला अचूक निर्णय घ्यायला नक्कीच मदत करू शकते.
काय वाटतं तुम्हाला??
©️ स्नेहल अखिला अन्वित
फोटो साभार: गुगल
कथा आवडल्यास लाईक, कमेंट नक्की करा आणि शेअर करताना नावासकटच करा.
Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा