ती

Written by

 

साधारणपणे रात्रीचे ११ वाजलेले असावेत. गार हवा सुटलेली होती. त्यात या दुमजली इमारतीचं बांधकामही दगडी होतं. आजूबाजूला अगदी निरव शांतता होती . आज अमावस्या वगैरे  नव्हती पण आकाशात त्यामानानं चांदणं तसं कमीच होतं किंवा मला तरी तसं जाणवत होत.  मी इथं आत्ता एकटाच होतो. कुणीतरी येण्याची चाहूल लागली,पण  तिकडं लक्ष न देता मी तिथंच खिडकीत उभा होतो.ती  खिडकी लाकडी होती आणि खूप जुनी होती.

पुढच्या काही मिनिटांमध्येच तिथं जवळपास १० ते १२ लोक जमले.त्या सगळ्यांचा पोशाख साधारण एकसारखाच होता म्हणजे सदरा -लेंगा आणि त्यातल्या काही जणांनी पांढऱ्या रंगाची टोपी घातलेली होती.सगळे साधारण एकसारखेच वाटत होते.

मी खिडकीजवळून मागे आलो. दारातून बरोब्बर समोर एक कबरीएवढ्या उंचीचा एक दगडी चौथरा होता.मी त्यावरच जाऊन बसलो.मी बसल्यावर  ते सगळे  पण खाली बसले. ते सगळे माझ्यासमोर बसलेले होते. मी काहीवेळ त्या सगळ्यांकडं दुर्लक्षच केलं आणि पुन्हा खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो.

पुन्हा जेव्हा माझं लक्ष गेलं तेव्हा त्या सगळ्यांच्या हातात भाकऱ्या होत्या आणि ते एकमेकांना ते भाकऱ्या वाटत होते आणि तेव्हा  ते काहीतरी बोलतदेखील होते पण मला त्यातलं काहीच ऐकू यात नव्हतं.मला ते ऐकून घेण्यात रस नसावा किंवा रस असूनही ते मला कळत नव्हतं.

आणि पुन्हा जेव्हा मी त्यांना पाहिलं त्यावेळी ते अचानक उठून उभा राहिले आणि त्यातले काही उठून बाहेरदेखील गेले.मला इथे नक्की काय घडतंय ते कळत नव्हतं.

मला इथून घरी जायचं होत.मी  मला एका माणसाला घरी जाण्याबद्दल विचारल्याचं आठवत होत आणि त्याने त्यावर “आपण एक काम करू आज रात्री इथेच थांबू आणि पहाटे पहाटे इथून बाहेर पडू” असं म्हणलेला आणि मी त्याच म्हणणं मान्यही केलेलं होत मला वाटत तो माणूस ह्या माणसांपैकीच होता बहुतेक किंवा नसेलही !

मी तिथंच त्या चौथऱ्याच्या मागे पहाट  होण्याची वाट बघत आडवा झालो.

जेव्हा मला जाग आली तेव्हा त्यांच्यापैकीही काहीजण तिथंच आडवे झालेले होते,साधारण मध्यरात्र झालेली असावी,हवेतला गारवा वाढतच होता,आजूबाजूची झाडी त्या गारव्यात भरच टाकत होती. तेवढ्यात त्या  दरवाजातून एक चेंडू आत आला आणि त्याच्या पाठोपाठ एक अवघ्या ३-४ वर्षांची,फिकट निळ्या रंगाचा फ्रॉक घातलेली एक चिमुरडी येताना मला दिसली. एरवी लहान मुलांना बघताना मलाही कौतुकच वाटतं

पण आत्ता असं अनपेक्षितपणे तिला बघताना मला कसलीतरी भीती वाटायला लागली होती . ती  माझ्या डोळ्यात बघत  होती.

मला तिला असं बघून काहीच सुचत नव्हतं.मला खरंतरं किंचाळून त्या सगळ्यांना उठवायचं होत,त्यांना हि मुलगी दखवायची होती.

कोण आहे हि मुलगी? हि आत्ता इथं काय करत असेल ?

ती माझ्याकडचं का चालत येतीये ?

आणि हे सगळं ह्या झोपलेल्याना कळत का नाहीये ?

मी इतका किंचाळून सुद्धा  हे सगळे  इतक्या शांतपणे कसे झोपू शकतात ?

का माझा आवाज त्यांना ऐकूच येत नाहीये ? मी का आलोय इथं ?

हे सगळे कोण असतील,मी आत्ता घरी झोपण्याऐवजी इथं काय करतोय?

माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ उडालेला होता.

तोपर्यंत ती मुलगी अगदी माझ्या जवळ येऊन पोचलेली होती. ती गरजेपेक्षा जास्तच गोरी होती तिचे ते डोळेपण पांढरे होते. मी बोलायचा,ओरडायचा प्रयत्न करताना ती मला मानेनंच नको म्हणत होती.

ती जवळ यायला लागल्यावर माझे हातपाय  थंड पडायला लागले.

माझ्या तोंडातून शब्दच फुटेनात.ती माझ्यापासून काही हातांच्या अंतरावर उभी होती आणि….

……मला जाग आली

मी माझ्या बेडवर अस्ताव्यस्त पडलेलो होतो,शेजारी ठेवलेलं गजराचं घड्याळ वाजत होत,समोर टीव्ही तसाच चालू होता,मी कदाचित एखादा हॉरर मूवी बघत झोपी गेलेलो होतो,मी माझ्यावरच हसायला लागलो,माझ्या भित्रेपणाची मलाच कमाल वाटली

तसाच कुशीवरून वळलो…

माझ्या बेडशेजारी एक अवघ्या ३-४ वर्षाची चिमुरडी हातात चेंडू घेऊन माझ्याचकडे पाहत बसलेली होती….

 

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत