तुझ्या आईने तुला हेच शिकवले का?

Written by

तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का??

अजयचं घर तसं छोटसं,वन रुम किचन.त्यात तो, त्याच्या तीन बहिणी व आई रहात होते.अजयचे वडील लवकर देवाघरी गेले होते.साहजिकच कुटुंबाची जवाबदारी अजयवर फार लवकर पडली होती.

अजयने वेळोवेळी एफडी मोडून,कर्ज काढून तिन्ही बहिणींची लग्ने चांगल्या घरात करुन दिली.
या साऱ्यात त्याची वयाची बत्तीशी उलटली.

अजयच्या आत्याने ठरवलेल्या स्थळाशी,सायलीशी अजयचं लग्न झालं.सायलीचाही हात अजयसारखाच वर होता.सायलीच्या नणंदा दिवाळी,गणपती,उन्हाळ्याच्या सूट्टीत हक्काने माहेरी येत.सायलीही त्यांची आवडनिवड जपे.त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना निगुतीने खायला घाली.

सायलीच्या सासूला,वसुधेला वाटू लागलं ,ही कालची पोर..नवऱ्यालाही ताब्यात घेतलंन आत्ता माझ्या मुलींनाही ताब्यात घेतेय.तिला सायलीची प्रत्येक गोष्ट चुकीची वाटू लागली.

खरंतर वसुधेच्या मनात तिच्या चुलत भावाची मुलगी, सून म्हणून भरली होती पण तिच्या वन्संनी स्थळ आणलं व फोटो पाहताक्षणीच अजयने होकार दिल्यामुळे तिचा नाविलाज झाला होता.

चुलत भावाची मुलगी एकुलती एक असल्याकारणाने चुलतभावाच्या मुलीशी वसुधेच्या मुलाचं अजयचं लग्न झालं असतं तर तिच्या भावाचं माडीचं घर,साखर कारखाना सगळं तिच्या मुलाला अजयला मिळालं असतं,शिवाय चाळीसेक तोळे सोनं घालून ती सून घरात आली असती.

सायलीचे वडील हायस्कुलात शिक्षक.देऊन देणार ते काय.दोन बांगड्या,कानातली कुडी,गळ्यात बारकासा कैरीहार,झालं सोनं.इतर प्रॉपर्टी अशी नव्हतीच.ते स्वतःच भाड्याच्या घरात रहात होते.

मासिक वेतन मिळत होतं.पण वर्षाकाठी दहा गरीब शाळकरी मुलांना मोफत शिक्षण, गरीब मुलींची लग्न लावून देणं,कुणा बेरोजगाराला थोडी आर्थिक मदत करुन त्याचा धंद्यात जम बसवून देणं अशा प्रयत्नांत फारच थोडे पैसे त्यांच्याकडे उरत.मग सायलीला कोठून देणार?

सायली आत्ता आपल्या स्वैंपाकघरावरही कब्जा करणार,मग आपली किंमत काय? आपलं आयुष्य कशासाठी?आपण एक अडगळीची वस्तू तर नाही नं होणार या विचारांचं काहूर वसुधेच्या मनात माजू लागलं.

या सततच्या चिंतेने,काळजीने तिचा रक्तदाब वाढू लागला,शुगर वाढू लागली व ह्या नव्या सुनबाईच्या पायगुणानेच आपल्यामागे दुखणं लागलंय असं तिला मनापासून वाटू लागलं.रात्रीची नीज येईनाशी झाली.

या साऱ्याचा राग म्हणून वसुधाने येताजाताना सायलीला टोमणेे मारायचा सुरुवात केली.
विभाने चहा दिला की काय गं, कित्ती गोड केलास.साखर जरा कमी घातली तर किती अगोड हा.साखर आहे नं घरात. तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का?

सायलीने केर काढला की वसुधा मुद्दामहून त्या जागी परत केर काढू लागे.कपाटामागे , शोकेसच्या मागे केरसुणी घालून कचरा बाहेर काढून तिला विचारु लागे,”तुझ्या माहेरी असाच कचरा काढतेस का.”

सायली व अजय सुट्टीला फिरायला निघाले की वसुधेचं चालू होई,”आई गं,माझी कंबर..माझे पाय.तुम्ही जाल हुंदडायला.घरातलं कोण बघणार?माझ्या जीवावर सगळं टाकून चालले मजा मारायला.

आमच्या वेळी ही थेरं नव्हती हो.घरात दिर,नणंदा,सासू,सासरे होते.साऱ्यांच करत होते मी.आताशा नाही होत माझ्याने.कोणाला सांगणार? माझं कोण आहे ऐकून घेणारं?आपला मुलगाच आपल्या ताब्यात नाही म्हंटल्यावर सारं संपलं.
सायली मग नजरेनेच अजयला राहुदे म्हणून सांगे व कपडे बदलून कामाला लागे.

सायलीला कांदाभजी आवडत.वसुधा तिला बटाट्याची भजी करायला लावे.एकदा सायलीला सडकून ताप भरला.अजयने तिला डॉक्टरकडे नेऊन आणले व आपण ऑफीसात गेला.वसुधाने स्वतःची साडी धुतली .सुनेचे व लेकाचे कपडे तसेच भिजत ठेवले.एकतर पाऊस.त्यामुळे कपडे वाळत नव्हते.

तसल्याच तापात सायली उठली व टबमधले दोघांचे कपडे धुवू लागली.कपडे धुताना अंगातून गरम वाफा येत होत्या.तिच्या डोळयांतून कढत पाणी वहात होतं.कशी माया वाटणार तिला सासूबद्दल?
जीवाला जीव लावावा लागतो.वसुधा तर धरसोडचीच भाषा करत होती.

संध्याकाळी अजय कामावरुन आला.सायलीचं अंग कढतच होतं.अजयने मऊसर वरणभात केला.लगेच वसुधा बडबडू लागली,”किती बाई नवऱ्याकडून लाड करुन घेणं.आमचे नाही हो असे केले कुणी लाड.ताप काही कोणाला येत नाही काय?”

सायलीला बीएड शिकायची इच्छा होती.तिने तसं अजयला सांगितलं.अजयची कसलीच आडकाठी नव्हती.तिने बीएडसाठी प्रवेश घेतला.सासूने सरळ सांगितलं,तुला जे काय करायचंय ते तुझ्या जीवावर कर.घरातलं सगळं आवरुनच तुला जावं लागेल.

सायलीही पहाटे पाच वाजता उठून पोळीभाजी,आमटी भात सगळं करी.घरातला केरवारा,देवपूजा,वसुधेचा चहा,नाश्ता झाला की आठ पर्यंत बाहेर पडे.संध्याकाळी आल्यावर उरलेली कामं करी.आत्ता वसुधेला काहीतरी दुसरा टाईमपास हवा होता.सुनबाईला बोलेल तर ती बोलायला काही जागाच ठेवत नव्हती.

मग वसुधा एका वयस्कर महिलांच्या ग्रुपमध्ये जॉईंट झाली.या महिला दुपारी एकत्र जमून कधी गाणी गात,भजन करीत,रेसिपी शेअर करीत.कुणाला काही अडचण असेल तर मिळून सोडवत.अनाथाश्रमांना भेटी देत.तिथल्या मुलांना फराळाचे डबे ,कपडे घेऊन जात कधी इडली चटणी,कधी पावभाजी असं छानछान बनवून नेत.आपापसात कामं वाटून घेत.एकमेकींना घरातल्या अडचणी सांगीत.साऱ्या मिळून त्यांवर मार्गही काढीत.

दोघीतिघींची मुले परदेशात होती. आईवडीलांना येऊन भेटायला त्यांच्याकडे वेळच नव्हता.काहींना नातवंडे सांभाळावी लागत.तर काहींच्या सुना सगळा स्वैंपाक सासूवर टाकून जात व सांगत घरातच तर असता नं.मग करायला काय होतं?

एका रविवारी त्यांनी व्रुद्धाश्रमाला भेट दिली.ते पाण्याने भरलेले डोळे बरंच काही सांगत होते.सगळ्याजणी या आजीआजोबांचे हात हातात घेत होत्या.एक आजी म्हणाल्या,”मी पापड लाटून माझ्या मुलाला मोठं केलं.आत्ता त्याला आई शोभत नाही ओ.”

एक म्हणत होती,”मला वाटलेलं निदान या दिवाळीलातरी माझा बाळ माझ्या नातींना घेऊन येईल.मी अगदी डोळे लावून बसलेले ओ त्याच्या वाटेकडे.”

एक आजोबा म्हणाले,”आमची ही गेल्यावर मला इथे आणून ठेवलं मुलांनी.पण आहे ते छान आहे म्हणायचं.माझा वेळ येथे छान जातो आणि तरीही आपण कुणावर ओझं बनून राहूच नये.आत्ता आमची रमाआजीच पहा ऐंशी पार केली तरी सकाळी मॉर्निंग वॉक,कँटीनमध्ये स्वैंपाकात मदत,बागेतल्या फुलांची निगराणी,मनमोकळ्या गप्पा.”
रमाआजी म्हणाल्या,”तेच तर गुपित आहे, माझ्या निरोगीपणाचं.कोणावर ओझं होऊन मुळी जगायचंच नाही मला.होता होईल तो माझी कामं मी करणार.जमेल तशी इतरांना मदतही करणार.तिथे जमा असलेल्या साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या.वसुधेनेपण टाळ्या वाजवल्या.”

वसुधा परत येताना विचार करत होती की तिचं जीवन किती सुखी आहे.नक्षत्रासारखी सून व मुलगा असुनही ती अर्ध्या भरलेल्या ग्लासातला रिकामी भागच बघत राहिलेय.भरलेला भाग तिने कधी पाहिलाच नाही.

वसुधा आईसक्रीम घेऊन घरी आली.लेकाला व सुनेला आईसक्रीम दिलं.गेलरीत झोक्यावर बसून स्वतः खाल्लं.आजचं आकाश तिला छान निरभ्र दिसलं.सगळं मळभ दूर झालेलं.

दुसऱ्यादिवशी सकाळी वसुधेने सुनेआधी उठून भाजी तयार केली, पीठ मळलं,..तितक्यात सायली उठली.तिच्याआधी स्वैंपाकघर जागलेलं पाहून तिला खूप बरं वाटलं.

आत्ता रोजच वसुधा घरातली थोडीथोडी कामं करु लागली.सायलीही तिच्या रेसिपींचं तोंडभर कौतुक करु लागली.वसुधेने सायलीपुढे कबुल केलं,”पुर्वग्रहदुषित मनाने मी तुझ्यावर फार अन्याय केला सायली.मला माझं अस्तित्व तू हिरावून घेत आहेस असं वाटत होत गं.बाहेर जगात काय चाललंय ते पाहिलं अन् माझे डोळे उघडले.आत्ता नाही हो मी ललिता पवारसारखी वागायची तुझ्याशी.अगदी प्रॉमिस.”

सायलीही मग सासूच्या कुशीत शिरली.

एका महिलामंडळाने वसुधेला जगण्याची नवीन दिशा मिळवून दिली.

———-गीता गजानन गरुड,आंब्रड,मोगरणेवाडी.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा