तुमची पोरं कोणावर गेलीयेत ???

Written by

#तुमची_पोरं_कोणावर_गेलीयेत??

मला खात्री आहे, प्रत्येक घरात हा प्रश्न दिवसातून एकदा तरी डोकं काढत असणारच!

पोरं चांगली वागली तरी किंवा त्यांनी डांबरटपणा केला तरी…….

पोरांनी काही चांगलं काम केलं तर आईबाप स्वतःची पाठ थोपटून घेणार, वाईट काम केलं तर सरळ एकमेकांच्या अंगावर ढकलणार. आई म्हणणार बापावर गेलीयेत अगदी आणि बाबा म्हणणार आईशीसारखी आहेत नुसती!

पण ही पोरं लहानाची मोठी होताना आपलं बालपण आपल्यासमोर आणत असतात हे नक्की.

आमच्याकडे मुलगा स्वभावाने माझ्यावर आणि दिसायला बाबावर गेलाय; तर मुलगी स्वभावाने बाबावर आणि दिसायला माझ्यावर गेलीये. त्यामुळे एकेक तऱ्हा बघायला मिळतात त्यांच्या……?

लहानपणी मी खूप जास्त भित्री होते, तशी आताही थोडीफार आहेच. पोराला माझा वारा लागलाय?

दिवसा-ढवळ्या सुद्धा त्याला एका रुम मधून दुसऱ्या रुम मध्ये एकटं जाववत नाही. सोबत लागतेच.

रात्री झोपताना लाईट बंद केलेली चालत नाही, भुताच्या सिरीयलची ऍड पण नको असते, ज्या खोलीत खेळायचं त्या खोलीचा दरवाजा त्याला बंद हवा असतो, बाहेरच्या दुसऱ्या कुठल्याही रुम मधलं काही दिसायला नको म्हणून………?

आता मला तर खूप हसायला येतं त्याचे हे चाळे बघून, पण मीही सेम अशीच होते…….आणि हेच सारं करायचे. तो माझ्या बालपणातली गंमतच त्याच्या रूपाने मला दाखवतो असं वाटत कधी कधी.

माझा नवरा मात्र त्याचे हे प्रकार पाहून डोक्यावर हात मारत म्हणतो, मम्मीचा कॉपी बोका? आहे नुसता!!

आणि याच्या एकदम विरुद्ध माझी मुलगी.

जशी जशी मोठी व्हायला लागली, तसा मलाच तिचा आधार वाटायला लागला. ती बरोबर असली की मी एकदम बिनधास्त. भूताचे पिक्चर, सिरीयल एकदम फेव्हरेट. कितीही वाजता बघणार!! भीती हा शब्द माहीतच नाही.

रात्री पाणी प्यायला, बाथरूमला जायला मला साथ देणारं खंबीर नेतृत्व……

नेहमी फुशारकी मारत फिरत असते, म्हणे मी माझ्या घाबरट मम्मीची बॉडीगार्ड?

बापाच्या हातावर हात मारलाय अगदी!!

बरं, या पोरांत फक्त आई बाबाच नाही, तर कधी कधी दोन्हीकडचे आजी आजोबा, मामा, मावशी, आत्या, काका आणखी कोण कोण पण घुसलेले असतात बरं का!!

ही सारी मंडळी प्रसंगानुरूप कधीमधी डोकावून जातातच. घरच्या लहान मुलांमध्ये जो तो स्वतःला पाहत असतो हे अगदी खरंय…….

आणि प्रत्येकाला आपली स्टाईल सापडली की जो आनंद होतो, तो काय वर्णावा!!

आजी म्हणते; बोलण्याचा ठसका माझ्यासारखा आहे बघ, आजोबा म्हणतात; अगदी खणखणीत आवाज आहे माझ्यासारखा, काका म्हणतो; केसांची स्टाईल माझी आहे, आत्या म्हणते; खळी बघ माझी घेतलीये, मावशी म्हणते; हसणं माझं आहे हा, मामा म्हणतो; टारगटपणा माझ्याकडूनच घेतलाय, प्रत्येकजण शोधून काढतातच आपली छटा आणि सुखावुनही जातात.

आणखी एक सगळ्यांबरोबरच होणारी गंमत म्हणजे, सासरकडच्यांना बाळ झाल्या झाल्या , आपल्या पोरावर गेलंय असंच वाटतं असतं आणि माहेरकडच्यांना आपल्या पोरीवर गेलय असं!!?

आई म्हणते, अगदी माझ्या मुलीसारखं रुपडं आहे, आणि सासू त्याहून ठासून म्हणते, बाळ माझ्या पोरासारखं राजबिंड आहे अगदी!!!?

खुन्नस पे खुन्नस चाललेली असते दोन्ही घरांची…….ज्याला त्याला दाखवायचं असतं, बाबडं आमच्याच इकडचं?

बाबडं मात्र त्याकडे दुर्लक्ष करून ज्याला त्याला आपल्या तालावर नाचवत ठेवतं फक्त, सगळ्यांना हसत हसत झेलायचं काम त्याच्या आईलाच करावं लागतं, आणि याचं त्याला काही ढिम्म नसतं?

हो की नाही?

बोला, तुमचा अनुभव काय म्हणतो?

तुमची बाबडी कुणावर गेलीयेत, कुणाची आठवण होते तुम्हाला, त्यांच्याकडे बघून?

चला सांगा पटपट…….

©️ स्नेहल अखिला अन्वित

लेखाचा वाचून आनंद घ्यावा, जास्तच आवडल्यास नावासकट शेअर करावा; चुकूनही नाव गाळायची चूक करू नये. लेख कॉपीराईट आहे, उगाच वाकडं नक्कोच !!!

आम्ही वाचकांचा खूप आदर करतो, तुम्ही आमच्या लिखाणाचा करावा. सुज्ञांस जास्त सांगणे न लागे?

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत