तुला काय येतं…

Written by

अनुजा आणि शिरीष ची ही कहाणी..

त्यांचा लग्नाची गोष्ट तशी फार काही रोचक नाही..स्थळ आलं आणि झालं लग्न…

गोष्ट पुढे आहे…

दोघेही सारखेच शिकलेले, शिरीष ची नोकरी मुंबई ला म्हणून दोघे मुंबई ला राहायला आले, राजा राणीचा संसार…

अनुजा ला आधी माहेरच्या शहरात नोकरी होती, ती सोडावी लागली, आता ती शिरीष सोबत मुंबई ला आली, घरात सगळं स्थिर होईपर्यंत नोकरी चा विचार केला नाही…

पण परत कुठेतरी नोकरी पहावी असा विचार आला आणि तिने शिरीष ला बोलून दाखवलं..

“काय नोकऱ्या करतात तुम्ही लोकं, जरा काही बिनसलं की रडायला सुरू, आमच्या कंपनीत पाहतो ना मी, अजिबात प्रोफेशनल नसतात या बायका..बघ म्हणजे तुला करायची तर कर नोकरी, एखादी छोटी मोठी मिळून जाईल”

अनुजा ला त्याचं बोलणं पटलं नाही,

तिच्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर स्त्रिया कामाला होत्या, आणि कठीण परिस्थिती हाताळायला याच स्त्रिया पुढे येत, आणि सगळ्यात जास्त प्रोफेशनल त्यांचंच वागणं असायचं..असो, आपण आपलं काम बघू असं म्हणत अनुजा ने काम पाहायला सुरवात केली.

एका कंपनीत तिला नोकरी मिळाली आणि ती रुजू झाली..

नवीन कंपनी, नवीन माणसं… त्यांचे अनुभव ती शिरीष ला सांगत असे..

“तुला काय जमणार आहे, मला बघ कसा अनुभव आहे, माझा बॉस माझ्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही…”

शिरीष चा कायम हाच सूर असायचा,

“तुला काय येतं”

“तुला जमणार आहे का”

“ते तुझ्या लायकीचं काम नाही”

“तुझं काम ते अगदी क्षुद्र, माझं तेवढं भारी”

अनुजा च्या उत्कृष्ट कामा मुळे कंपनी ने तिला प्रोमोशन दिलं, घरी येताना आनंदाने ती पेढे घेऊन आली आणि शिरीष ला सांगितलं…

“अरेवा, पण एवढी का खुश होतेय? अगं तुझी कंपनी छोटी, कामं छोटी, त्यात तूला प्रोमोशन मिळालं म्हणजे “वासरात लंगडी गाय शहाणी” असला प्रकार झाला असेल…हा हा हा”

अनुजा ला खूप वाईट वाटलं..

नंतर एक दीड वर्ष लोटलं, दोघांचीही कामं चालूच होती, अनुजा च्या कंपनीत बऱ्याच घडामोडी घडल्या, पण शिरीष ला सांगणं तिने बंद केलं होतं… ऑफिस मध्ये काय झालं, तिला कुठली पोसिशन दिली, तिच कसंं प्रमोशन होत गेलं… काहीही सांगायची तिला गरज वाटली नाही…

खरंच दोघेही नोकरी करत असले तरी दोघांच्या कामात फरक का केला जातो?? बायको कंपनीत जाते, आपल्या सारखच काम करते, आपली हुशारी दाखवते आणि कंपनीला वर नेते.. ही गोष्ट समजून घ्यायलाच तयार नव्हता शिरीष…

एक दिवस शिरीष घरी आला आणि अनुजा ला म्हणाला,

“उद्या आमच्या कंपनीत एक खास व्यक्ती येणार आहेत, त्यांचं स्वागत मला करायचं आहे, माझे कपडे धुऊन इस्त्री करून ठेव”

अनुजा ने ते केलं, शिरीष चा डबा बनवला, त्याचं आवरून दिलं.. दोघेही कामावर सोबत जायचे, पण आज अनुजा तयार झाली नव्हती, शिरीष ला तिने पुढे व्हायला सांगितले आणि ती घरातली उरलेली कामं आवरू लागली..

शिरीष दिमाखात वावरत होता, कारण प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्याची संधी त्याला मिळाली होती…

जी व्यक्ती येणार त्या व्यक्तीचे कार्पोरेट जगतात उल्लेखनीय काम होतं, आणि त्याच कामाचा अनुभव तो पाहुणा शिरीष च्या कंपनीतील लोकांना शिकवणार होता… अर्थात त्या व्यक्तीची पोझिशन खूपच वरची होती…

वेळ झाला आणि पाहुणे येणार म्हणून शिरीष ने केस नीट केले, बुके जवळच ठेवला, पाहुणे एन्ट्री करायच्या आधी माईक वर सूचना आली,

“ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं कंपनीत आगमन झालेले आहे…कार्पोरेट जगात उल्लेखनीय काम असलेल्या, मॅनेजमेंट गुरू, उत्कृष्ट नेतृत्व आणि परफेक्शनिस्ट अशा….मिसेस अनुजा सबनीस यांचं…..”

अनुजा ची एन्ट्री झाली तशी शिरीष च्या हातातला बुके गळून पडला आणि सोबतच त्याचा अहंकारही…

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा