तुला जमेल मा रे?

Written by

संसाराच्या रहाटगाडग्यात नवऱ्याशी तडाक्याच भांडण झालेल्या बायकोच आपल्या नवऱ्याला पत्र :

नात तर सात जन्माचं आहे ना रे? तरी कधीकधी अगदीच दुश्मन का होतो?

सुरुवातीच्या काळातलं कौतुक कुठेतरी हळू हळू हरवत जातय का रे?

मी तुझी आणि तू माझा अस म्हणता म्हणता माझी मी आणि तुझं तू कस होत रे?

प्रेम तर आहेच ना रे, मग थोड्या भांडणाने ते संपून जात का रे?

जबाबदाऱ्या दोघांच्याही वाढल्यात मग त्रास फक्त तुलाच होतो का रे?

तुझा तो राग आणि माझा राग म्हणजे आगाव पणा अस का रे?

माझी चिडचिड करण्यामागेही कारणं असतात याची जाणीव कधी होणार रे?

मी पण तर घर एकटी सांभाळते,मुल सांभाळते तरी माझी चिडचिड होऊच नये अशीच अपेक्षा?

तू दमून भागून आलास की तुला पाणी,चहा हातात लागतो.

मी पण तर घर आवरून दमते रे, थोडा विसावा मला ही घ्यावा वाटतो रे पण त्यासाठी तू लगेच माहेरी जा अस बोलायची गरज आहे का रे?

काळजी तुही खूप करतोस माझी माहितीये पण हळूहळू अंतर वाढत चाललंय का रे?

प्रेम माझंही खूप आहे तुझ्यावर पण प्रेमापेक्षा ही परिस्थितीच जिंकते का रे?

थोडाही वेळ देत नाही आपण आता एकमेकांना. तू तुझ्या कामात व्यस्त आणि मी मूल आणि घर सांभाळण्यात.

घर दोघांचं फक्त नावापुरत राहिलंय का रे?
त्यात तर तू आणि मी एकत्र कधी येतो ते आठवतच नाही मला आता.
संसार करता करता आपण एकमेकांनाच विसरत चाललोय का रे?

राग व्यक्त करतोय मग प्रेम व्यक्त करायला काय होतंय?

एकमेकांना चोरून बघता बघता आता एकमेकांच तोंडही बघत नाही इतकं वाईट कस वागू शकतो रे?

कधी मित्र कधी प्रियकर कधी चांगला नवरा बनलास पण दुश्मन होणं आता गरजेचं आहे का रे?

कधी कधी दुश्मनलाही दया येते समोरच्या अवस्थेवर पण तुला येत नाही का रे?

कस विसरतोस लगेच प्रेमाचे शब्द, लावलेला जीव, घेतलेली काळजी आणि तुझ्या माझ्यातल हे अतूट नातं?

संवादाची जागा इगोने घेतलीये का रे?
माघार घेतलीच तर कमीपणा येईल का रे?

मी येईनही बोलायला पण तू बोलणार नाहीस आणि मग अपमान समजून अजून माझं मन धुमसत राहील.

बस कर रे आता , हा अबोला नाही सहन होत. शब्दास शब्द वाढतो पण राग गेल्यावर चूकही कळते. का त्याचवेळी स्वतःच्या मनावर ताबा राहत नाही म्हणून दरवेळी मी स्वतःला कोसते रे.

पण मनावर ती परिस्थिती, तो राग हावी होतो आणि मग वादाला तोंड फुटत. जे नको हवं असत तेच होत रे.

सोडून दे रे आता हा राग.
तू तू मी मी सोडून आपण होऊया ना रे

 

थोडा वेळ तुझ्या माझ्यासाठी देऊया ना रे

नव्याने एकमेकांना समजून घेऊया ना रे

परत हवायस तू माझा मित्र,प्रियकर आणि नवरा म्हणून

जमेल ना तुला रे?

तुझीच,

अर्धांगिनी

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा