तु असशील ना

Written by
 • श्वास सुटतांना, डोळे मिटतांना
  वचन एक मज देशील ना

  जिथे जिथे जाणवेल अस्तित्व माझे
  तिथे तिथे तू असशील ना.

  मी पारिजात होऊनी बहरताना,
  तू पहाट होऊनी स्वागता थांबशील ना.

  मी नदी होऊनी वाहतांना,
  तू सागर होऊनी मिठीत घेशील ना.

  मी पाऊस होऊनी बरसताना,
  तू धरणी होऊनी ओंजळीत झेलशील ना.

  मी फूल होऊनी फुलताना,
  तू सुगंध होऊनी चहुबाजू दरवळशील ना.

  ज्या कुण्या रूपात भासेल मी
  तु श्वास होऊनी पुन्हा सामावशील ना.

  जिथे जिथे जाणवेल अस्तित्व माझे
  तिथे तिथे तू असशील ना.

  © प्रज्ञा लबडे

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा