तु सध्या काय करतेस ?

Written by

काय वाचकमंडळी,शिर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना, वाटणारच कारण आपल्याला ‘ती सध्या काय करते?’ वाचण्याची सवय झालीय ना त्यामुळे वाचताना आपली काही चूक झाली कि काय असंही वाटलं असेल तुम्हाला. पण ‘तू सध्या काय करतेस?’ या प्रश्नानं गेले पाच सहा महिने माझा पिच्छा पुरवला आहे आणी मला वाटतं मीच काय साधारणतः माझ्या वयाच्या प्रत्येकीलाच ह्या प्रश्नाला नेहमी तोंड द्यावं लागत असेल आता तुम्हाला ‘किती बुवा हिच वय?’ या कुतुहलापोटी माझी प्रोफाईल पाहावी असं वाटेल पण थांबा म्हणजे आधी हा लेख वाचुन घ्या. तर मी असं का म्हणते याचं कारण असं कि,जेव्हा मुलं शाळेत,कॉलेजात शिक्षण घेत असतात तेव्हा सर्व मुल मुली ‘विद्यार्थी ‘ या कॅटॅगरित मोडतात. आपले आजुबाजुचे लोक ( आपले शेजारी, नातेवाईक, काही शुभचिंतक ) यांच्या नजरेत तरि आपण विद्यार्थी असतो कारण दररोज उठुन पाठिवर सॅक लटकवून शाळेत, कॉलेजात जात असतो पण……. पण एकदा कॉलेजची वर्ष संपली म्हणजे तुम्ही पदवीधर झालात, पदव्युत्तर झालात कि या सगळ्या लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळतात. त्यातूनच मुलगी असेल तर शेजारच्या ताई, मावश्या , काकू या वर्गात मोडणार्‍या बायका, दूरच्या नात्यातले, घरातल्यांचे, आई वडिलांच्या ओळखीतले असे हितचिंतक सगळेजणच त्या मुलीला ओघाने बोललो आहोत असं दाखवून एकच प्रश्न विचारतात,’मग तू सध्या काय करतेस?’ आता या प्रश्नाला मी तोंड देण्याचं कारणही तेच आहे.याच वर्षी (दोन तीन) महिन्यापूर्वी माझा एम.ए.चा निकाल जाहिर झाला. चांगले मार्क्सही मिळाले आणी माझ्या College Years चा खर्‍या अर्थाने समारोप झाला. तेव्हापासून या प्रश्नानं मला भंडावून सोडलं आहे. बरं,या प्रश्नावर माझं उत्तर ऐकुन कुणी विषय बदलला तर माझी हरकत नसते.पण उगीच कुतुहलापोटी हा प्रश्न विचारून माझं उत्तर ऐकल्यानंतरही आपलं त्यावर म्हणणं सांगून,फुकटचे सल्ले देणारेच मला जास्त भेटले. रिझल्ट लागल्यानंतर आजुबाजुच्या लोकांपैकी काहींनी एक दोन कॉलेज,कोचिंग क्लास वरती अप्लाय करण्याविषयी सुचवले, काहींनी मला न विचारता शिफारसही करून टाकली. पण माझा उच्चशिक्षणाचा प्लॅन असल्याने सद्यातरी मला अभ्यासावरती लक्ष केंद्रित करायचंय असं मी साभार सांगून टाकलं. त्यावर तुलाच अनुभव मिळेल,आपल्या शहरात तर आहे मग काय प्रोब्लेम असे शेरेही ओढून झाले. तेही मी शांतपणे ऐकुन घेतले. संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले की आजुबाजुच्या काकु,मावश्यांचाही हाच प्रश्न असतो,’काय गं काय करतेस तू सध्या ?’ जॉबच बघायचं,स्पर्धापरिक्षा का नाही देत तू असेही सल्ले मिळतात. त्यावर ‘हो चाललंय’ एवढीच माझी प्रतिक्रिया असते.
काल संध्याकाळी चौकातुन चालता चालता अश्याच एक काकु आणी त्यांची नर्सिंगला असणारी मुलगी भेटल्या. एकटीने चालण्यापेक्षा मीही त्यांच्यासोबत चालू लागले.थोडसं बोलल्यावर त्यांचाही हाच प्रश्न,’ अगं क्लासेसवर का नाही जात शिकवायला,घरि बसुन तरि काय करणार!’ मी रागाने म्हटलं,मी ब्लॉग लिहिते, युट्युबवरही काम करते त्यावर त्यांनी ते न ऐकल्यासारख केलं आणी दुसराच विषय सुरू झाला. त्यांच्याच ओळखीतल्या एका मुलाच्या लग्नाविषयी त्या बोलत होत्या. बरं त्या मुलाने पाहिलेली मुलगी म्हणे महिन्याला पन्नास हजार कमावते. पण वय तीस क्रॉस आहे मग तिचं काय होणार यावर मायलेकींची चर्चा सुरू झाली. त्यावर त्यांनी माझ्याकडे मोर्चा वळवला,मग तु पण घे मनावर लग्नाचं! या सुचनावजा सल्ल्यावर माझं डोकचं भडकलं. पण स्वतःला शांत केलं आणी चालु लागले. मग वाटलं या प्रश्नाचा सामना माझ्या सारख्या,कॉलेज पुर्ण झालेल्या प्रत्येकीलाच करावा लागत असेल. नोकरी नसते तेव्हा जॉबवरून सल्ले, मुलीला जॉब असला की लग्नावरून सल्ले,लग्न झालं कि बाळाचं बघा आता हाही सल्ला असतोच.पण या माणसांच्या मनात साधा विचार येत नाही, प्रत्येक मुलीचे आई वडिल तिच्या भविष्याची काळजी करायला समर्थ असतात. दुसरी गोष्ट तिची नोकरी, करियर, जोडीदार याविषयी निवड करण्याच स्वातंत्र्य प्रत्येकीला आहे. आणी जर ते तिच्या आई वडिलांना मान्य असेल तर आजुबाजुच्यांना त्यात बोलण्याचा काहीएक हक्क नसतो. एका मुलीला असा प्रश्न विचारण्याआधी प्रत्येकाने हा विचार करायला हवा,तिचे तिच्या भविष्याविषयी काही प्लॅन असतील,तिला पुढे शिक्षण घ्यायचं असेल,तिच्या आवडी वेगळ्या असतील,इंन्टरेस्ट वेगळे असतील त्याप्रमाणे ती जॉब शोधत असेल,तिच्या जोडीदाराविषयी तिची स्वप्न असतील,मतं असतील कदाचित काही घरगुती अडचणी असतील पण या कश्याकश्शाचाही विचार न करता आपण मुलींना प्रश्न विचारतो आणी सल्ले देत सुटतो. या गोष्टीचा मला राग येतो कारण मी कधीच कुणाला असे प्रश्न विचारत बसत नाही. राजकारण,महागाई,मुलांचा अभ्यास,गावातल्या समस्या असे बोलण्यासारखे कितीतरी विषय असताना कुणाच्या ‘Personal Life ‘ वरून का गप्पा कुटत बसा ही माझी भावना. याला बोलण्यातले ethics म्हणतात आणी ते प्रत्येकाने पाळावे अशी माझी अपेक्षा असते. तेव्हा वाचकहो, तुम्हीही एखाद्या मुलीला नोकरी,लग्न,करियर यावरून नाहक प्रश्न विचारू नका. विचारण्याआधी थोडं थांबा आणी या सगळ्याचा विचार नक्की करा. 🙂
मला आलेला हा अनुभव कुणासोबत तरि शेअर करावासा वाटत होता म्हणून कागदावर जे वाटलं ते लिहिलं आणी तुमच्यासोबत शेअर केलं.😊😊

( आता ‘मी सध्या काय करते?’ याचं उत्तर मी ब्लॉगर आहे,युट्युबवरूनही चांगला content वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करते. छान छान वाचते. वृत्तपत्रांसाठी लिहिते. यु.जी.सी. नेट चा अभ्यास करतेय. माझ्या थोड्याशा ज्ञानात भर पडावी म्हणून अॉनलाईन कोर्सेस करते. In short माझ्यात जे जे चांगलं आहे त्याचा शोध घेतेय. त्यातून आर्थिक, बौद्धिक, मानसिक, वैचारिक पातळीवर सशक्त स्त्री होण्याचा प्रयत्न करतेय.) 😊🤗

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.