तूच माझी भाग ३

Written by

#तूच माझी

भाग -३

दुसऱ्या दिवशी उर्वशी १० मिनिट आधीच कामावर आली ..नवीन ड्रेस आणि चप्पल मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती ..ती reception मधेच बसली होती ..जोपर्यंत साहेब येत नाहीत तोपर्यंत तिला तिथेच बसावं लागणार होतं ..थोड्याच वेळात तिथे HR मॅनेजर आले ..त्यांनी उर्वशीला पहिलं.
HR मॅनेजर मनदीप हे खूपच भारी पात्र होत त्यांच्या ऑफिस मध्ये …डोक्यावर पगडी, नेट लावून व्यवस्थित केलेली दाढी…गोरा गोरापान रंग ..हातात कडा ..आर्मी रिटायर्ड मेजर..उंची 6 प्लस होती त्यांची ..एकदम रुबाबदार व्यक्ती.. पण खूपच जॉली ..काय जोक करेल कधीच अंदाज यायचा नाही याचा …मनदीप उर्वशी जवळ जाऊन तिला पाहू लागले… उर्वशी पटकन जागेवरच उभी राहिली ..तिला समजत नव्हतं हा माणूस मला इतक्या संशयाने का न्याहाळत आहे ..इतक्यात त्याच्या आवाजाने ती घाबरली ..
मनदीप: ओये गुड मॉर्निंग जी !! तुस्सी उर्वशी हो ना जी ? वो तुमचा फोटो वेखा था अस्सी ..थारे बायोडाटा विच… आज तुम्हारा फर्स्ट डे हे ..रेस्ट करो ..बैठो बैठो.. मिळते हे जी थोडी देर के बाद…आणि तो निघून गेला.
उर्वशी : मनातच हसत होती ..हे काय पात्र आहे ..ना नीट मराठी ..ना इंग्लिश , ना हिन्दी ..आणि ना पंजाबी..जाऊदेत आपल्याला काय आपण आणि आपलं काम ..मला माझं कामच तर करायचंय ..मला तात्यांना आता आराम करायला लावायचं आहे ..आई ने पण खूप कष्ट केलेत आयुष्यभर आता या दोघांच्या आरामाची वेळ आहे .
आज साहेब आणि उत्तम भराभर येऊन सरळ केबिनमध्ये गेले ..त्यांनी कोणाच्या गुड मॉर्निंगला पण उत्तर दिलं नाही ..काय झालं होतं कोणास ठाऊक .दोघे खूपच अस्वस्थ झाले होते ..इतक्यात फॅक्टरी वरचा एक कर्मचारी धावत आला ..मनदीपला म्हणाला साहेब माणिक ची हालत खूपच खराब आहे ..ते विमा वैगरे बघा ना ..अहो पैसे भरायला लवतायेत नाहीत आमच्याजवळ.मनदीप ने त्याला शांत केलं पाणी दिल ..
मनदीप : पाजी तुस्सी पाणी पी ..थंडा होकार मुझे बताव हुआ की हे?
तो कामगार : काल रेणू आमच्या माणिकला घेऊन आली होती कामावर , घरी कुणीच नव्हतं तिला बघायला ..रेणू कामात असताना माणिक अचानक एका मशीनच्या लोखंडावर धडकली तिच्या डोक्याला लई लागलं ..आम्ही नेलं डॉक्टर कड पण रातची येळ आणि पैश्याशिवाय कोणी तिला बघना ..मग मी माझ्या दोस्तांकडून घेऊन भरलं पैस पण आता ते परत पैस मागतात..मग माझा दोस्त बोलला तुमची विमा असलं ..म्हणून धावत आलोय . आत्ताच साहेबांशी पण बोललो मी..ते बोलले ऑफिसला ये ..आलेत का ओ साहेब ..
हे सगळं उर्वशी ऐकत होती ..आत्ता तिला समजलं हे दोघे असे का अस्वस्थ आहेत ..ती धावतच केबिनमध्ये गेली. आज तिने नॉक नाही केलं तर सरळ साहेबांच्या समोर उभी राहिली .. आणि तावा तावाणे बोलू लागली : हे काय साहेब .आपली इतकी मोठी कंपनी आणि मुलांसाठी काहीच व्यवस्था नाही ?अंगणवाडी , सांभाळायला बाई माणस.. त्यांची खायची व्यवस्था ..लेबर लॉ प्रमाणे आपल्याला त्यांचा विमा , त्यांच्या मुलांची व्यवस्था करायलाच हवी आहे ..जर त्या बाळाला काही झालं तर त्याला कँपनी जबाबदार राहील ..केस होऊ शकते आपल्यावर..
आधीच टेन्शन मध्ये असणारा उत्तम खूप चिडला : ओ मिस तुम्ही काय समजता स्वतःला ?आम्ही काय लहान मूल आहोत का ?हे सगळं आम्हाला पण माहीत आहे की केस होऊ शकते ..अंगणवाडी चालू करण्याची आमची तयारी चालू होतीच ..पण त्यापूर्वीच ही घटना घडली आहे ..आणि कामगारांचा विमा आहे आमच्याकडे ..तात्या आत्ता हॉस्पिटलमध्येच गेले आहेत पैसे घेऊन ..आम्ही आमच्या स्टाफ ची काळजी घेत असतो .पण त्या मुलीच्या डोक्याला मार लागला आहे ..कॉम्प्लिकेशन्स आहेत आम्ही त्यामुळे आधीच टेन्शन मध्ये आहोत ..आणि तुम्ही काय मधेच झाशीची राणी बनून आलात इथे ..आजून तुम्ही आमच्या एम्प्लॉयी नाही आहात ..please जा तुम्ही बाहेर बसा..सगळं आटोपलं की बोलावतो तुम्हाला..
उर्वशी : सॉरी ..पण मला नाही राहवलं त्यामुळे अशी आले मी आत ..आणि ती पाठमोरी वळाली इतक्यात साहेबांनी तिला आवाज दिला
साहेब : मला सांग यात तू काय करू शकतेस काय?
उर्वशी : म ..मी ..म्हणजे ..काय करू तुम्ही सांगा साहेब ..
साहेब : तू त्या बाळाची काळजी घ्यायला जाशील का हॉस्पिटलमध्ये? तिची आई अडाणी आहे ..डॉक्टरांनी काही सांगितलं तर समजणार नाही तिला ..तू असणार तिथे तर तिला आधार वाटेल
उर्वशी : मनातच ..किती वेगळा आहे हा माणूस ..कोण इतकं विचार करत का आजकाल ? तोंडावर पैसे फेकून मोकळे होतात ..खरच मला खूप चांगला बॉस भेटला आहे ..काम करायला खरच खूप मजा येईल मला इथे ..उगाच नाही तात्या इतकी वर्षे झाली तरी इथेच काम करतायेत..
साहेब : आग तुला जबरदस्ती नाही ..तू काहीच उत्तर नाही दिलंस मला समजलं ..तुला नाही जमणार ..काही हरकत नाही ..
उर्वशी : साहेब ..तस नाही मी जरा वेगळ्याच विचारात होते ..जाईन मी हॉस्पिटलमध्ये..
साहेब : धन्यवाद मुली ..आता माझी एक काळजी कमी झाली ..हे बघ तिथे जाऊन त्या बाळाच्या डॉक्टर ला भेट .सगळ नीट समजून घे आणि मला पण सांग ..नक्की कशी आहे ती पोरगी..
उर्वशी : हो साहेब ..मी लगेचच निघते ..
इतक्यात उत्तम : थांबा मी पण येतो तुमच्या सोबत ..काही पैसे वैगरे लागले तर ..आणि ते दोघे लगबगीने लिफ्ट कडे गेले ..
या टेन्शन मध्ये पण साहेब गालातल्या गालात हसले ..हो रे लबाडा ..इथे पण तुला ती सोबत हवी आहे काय ? काळजी नको करुस ..मी अशी व्यवस्था करणार आहे की ती आयुष्यभर तुझ्याच सोबत राहील ..

©पूनम पिंगळे

क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा