“तूझी वाट बघेन मी ! येशील ना ग्”? (भाग१)

Written by

काय ठरवणार आहेस ते निट विचार करून ठरव आणि तुझा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल पण कृपाकरून माझ्याबद्दल कोणताही गैरसमज करून घेऊ नकोस की, तुझ्यावर आज ही परिस्थिती आली आहे म्हणून मी तुला असं विचारतोय वगैरे……

माझं तुझ्यावर तेंव्हाही प्रेम होतं आणि अाजही ते प्रेम तसंच आहे. तुझ्या नकाराने माझं प्रेम तेंव्हाही कमी झालं नव्हतं आणि आज जरी तू मला नकार दिलास तरीही माझं प्रेम कमी होणार नाही.

मला फक्त एवढंच वाटतंय की, तु तुझ्या आयुष्याला परत संधी द्यावीस मग त्यासाठी तुझ्या सोबतीला कोणी दुसराही असला तरीही मला आनंदच असणार आहे. तू आनंदी असावीस एवढीच माझी इच्छा आहे.

“अनू ! माझं तुझ्यावर खरंच खुप प्रेम आहे ग् ….तुला मी खरंच नको असेल तर हरकत नाही पण निदान ह्यावेळेस तरी मला, आपल्या भिन्न जातीपाई तू डावलू नकोस एवढीच माझी मनापासून इच्छा आहे. मी तुला आयुष्यातलं सगळंच सुख कदाचित देऊ शकणार नाही पण तुला सुखी ठेवण्यासाठी मी सतत प्रयत्न करेन एवढा विश्वास ठेव”.

कंपनीने मला एक चांगली आॅफर दिली आहे. म्हणूनच मी उद्या इथून कायमचा निघून जाणार आहे. तुझ्याशिवाय इथे जगणं आता मुश्किल झालं आहे. इथे राहिलो तर प्रत्येक ठिकाणी मला तुझा भास होत राहील आणि मला ती वेदना आता सहन होत नाहीये. तुझा काय असेल तो निर्णय मला कळव.

इतका वेळचा अभीषेक म्हणजेच अभी अनघाशी म्हणजेच अनूशी बोलतच होता पण आता त्याच्या भावनेचा बांध फुटला अन् तो लहान मुलासारखा रडू लागला. अनू जवळ येत त्याला थोपटणार होती तेवढयात तो बाजूला सरकला आणि रडतच परत बोलू लागला.

“नको अनू , आता मला कुठलेच पाश नको आहेत नाहीतर मी पूर्णपणे कोलमडेल”.

मी निघतो आता म्हणत अभी निघाला आणि दरवाजा जवळ जात मागे वळून अनूला म्हणाला, अनू , “तूझी वाट बघेन मी ! येशील ना ग्”? म्हणत रडतच तडक बाहेर पडला.

इतका वेळची स्तब्धपणे उभी राहत अभीचं बोलणं ऎकत अनूलाही आता गहिवरून आलं होतं, कदाचित तीला जोरजोरात रडायचं होतं पण तरी तिला तसं करता येत नव्हतं. भावनीक बंधनात आज अनू पूर्ण अडकली होती ….तिने समोर पाहिलं तर अभीसाठी आणलेला चहा गारढूर झाला होता तसंच काहीसं तिच्याबाबतीतही घडलं होतं. सगळंकाही जणू संपलं होतं.

अनूला, अभीचे शेवटचे शब्द ऎकून गलबलून आलं होतं अन् ती विचार करु लागली की, खरंच आपण अभीसोबत जे केलं ते योग्य होतं का? ….आपला त्यावेळचा घरच्यांच्या दबावाखाली घेतलेला निर्णय योग्य होता का? …..

अभी आणि अनू लहानपणापासूनचे मित्र होते. एकमेकांना समजून घेत दोघं मोठं होत गेले आणि एकमेकांच्या भावनांना साथ देत अभी अनूच्या प्रेमात कधी पडला हे त्याचं त्यालाच कळालं नाही. पण अनूच्या मनात मात्र अभीविषयी फक्त मित्रत्वाचंच नातं होतं.

दोघं मित्र जरी असले तरी, दोघांमधे खुप अंतर होतं. अनू मोठ्या घरची होती तर अभीच्या घरची परिस्थिती हलाखीची होती आणि जातीतही खुप अंतर होतं. अभी आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अभीचं शिक्षण होऊन तो जसा नोकरीला लागला तसे त्याचे आई-वडील बसच्या एका अपघातामधे देवाघरी गेले अाणि अभी एकटा पडला.

अनू त्याची काळजी घेतंच होती आणि अभीचं तिच्यासाठी असणारं प्रेम खोलवर रुजत होतं. अाणि म्हणूनच एक दिवस अभीने अनूला लग्नासाठी मागणी घातली.

अचानकपणे आपल्या लहानपणीच्या मित्राने असं लग्नासाठी मागणी घातल्याने अनू गोंधळली होती. आणि म्हणूनच तिला काही समजेना झालं होतं.

अभी मी तुला फक्त माझा एक मित्रच समजते, तुझ्या अचानक आलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला मला थोडा वेळ दे म्हणत ती निघून गेली आणि परत अभीला भेटलीच नाही.

  • क्रमशः …….

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रणींनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार. अनू याआधी अभीला लग्नासाठी का नकार देते? आणि आता असं काय झालं की अभी परत तिच्या प्रेमासाठी वाट बघतोय?…अनू ह्यावेळी तरी अभीच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? … नक्की वाचा आपल्या पुढच्या भागात…धन्यवाद.)

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत