तू विघ्नहर्ता माणसातला…

Written by

अरे रवी, आज जरा उशिरा जाशील का ऑफिसला?

का.. काही काम होत का आई..?

नाही रे, तू रोज घाईगडबडीत निघून जातोस, बाप्पाची आरती देखील करत नाहीस. निदान आज तरी आरती करून जा..

काय… ग, आई तुझं. तुला माहिती आहे न मी माझी पूजा माझ्या कामाला मानतो. अग कामातच देव असतो व तो दिसतो मला.

हो रे… तू बोलतोयस ते योग्यच आहे.. पण आपण 10दिवस त्या बाप्पाची आरास करतो, स्थापना करतो, आराधना करतो, पूजा आरती केल्याने मन प्रसन्न होत. तुझा आपला कामाचा व्याप असतो. घडिभऱ्याची उसंत नाही तुला. रात्री काय ते झोपायला येतोस.. सकाळी नाश्ता करून गेलास की तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसते मी.

किती काळजी करतेस आई, आणि हे सगळं आताच करण्याचे दिवस आहेत. माझ्या कामावर माझे बॉस जाम खुश आहेत. त्यांना खुश ठेवणं म्हणजे, माझ प्रमोशन पक्क. आणखी काय हवंय. आज तर स्पेशल प्रेझेंटेशन आहे. हे सक्सेस झालं की प्रमोशन पक्क समज माझ. आणि राहिली तुझ्या बाप्पाची गोष्ट तर.. तुलाही चांगल माहिती आहे. मी इतकं मानत नाही तुझ्या देवाला.

काय दिल ग तुझ्या बाप्पाने? विघ्नहर्ता न तो.. मग बाबांना का घेऊन गेला मी लहान असतानाच? तुला लोकांच्या घरची धुनीभांडी करून मला वाढवावं का लागल?

 जेंव्हा बाबांच्या आई -बाबांची इतकी इस्टेट असतानाही हलाकीच जीवन जगावं लागल आपल्याला. कुठे होता तुझा विघ्नहर्ता तेंव्हा? का नाही सगळ्या गोष्टी नीट केल्या? माझ बालपण बाबांशिवाय गेलं, आणि तुझा वेळ कामात जायचा मी किती एकटा होतो तेंव्हा.. याचा विचार नाही आला बाप्पाला तुझ्या?

आई तुझी देवावर श्रद्धा आहे म्हणून मी तुला कोणत्याच गोष्टीसाठी नाही म्हणतं नाही. पण माझी श्रद्धा तू केलेल्या कामावर व मिळवलेल्या तुटपुंज्या पैशावर आहे. ज्यातून मी काटकसर व पैशाची किंमत समजलो. देव असता तर त्याने ही वेळ नसती आणली न आपल्यावर..

अरे तो सगळा नशिबाचा भाग आहे.. देवाला दोष कशाला द्यायचा?

का नाही द्यायचा हे सांग मला आई? तुझा बाप्पा विघ्नहर्ता आहे न.. मग बाबांवरच संकट का नाही हरल त्याने? जाऊ दे मला आधीच उशीर होतोय.. तुझ्याशी बोलण्यात आधीच 20मिनिट गेली माझी… चल बाय आई येतो मी…

रवी गडबडीत होता आणि उशीरही झाला होता… त्याने गाडी जरा स्पीड मधेच घेतली. तरी आई दरवाज्यातून “सावकाश जा रे पोरा ” असं म्हणतं होती तोच रवी भरधाव वेगाने गेट बाहेर गेला..

 इकडे त्याची आई आरतीच्या तयारीला लागली व बाप्पाला हात जोडून “देवा तू सगळं जाणतोस.. रवीचा राग देखील कळतो रे बाप्पा तुला. तरीही त्याच्यावर कोणतंही संकट येऊ देउ नकोस बाप्पा. विघ्नहर्ता हात जोडून विनंती तुला, आणि त्याच्या वतीने मी माफी मागते. मंगलमूर्ती, विघ्नहर्ता माझ्या मुलावर कृपादृष्टी ठेव आणि त्याच्यावरचे सर्व संकट दूर कर ??”

रवी लवकर पोहचायच्या घाईने कारचा वेग वाढवत होता. अचानक त्याची नजर रस्त्याच्या कडेला विव्हळत असलेल्या एका व्यक्तीवर गेली. उशीर तर याला झालाच होता.. पण यांच्यातली माणुसकी त्याला ते दृश्य पाहून समोर जायची परवानगी देत नव्हतं. कारण त्याचे बाबा देखील अशेच ऍक्सीडेन्ट नंतर रस्त्यावर विव्हळत होते.. पोलीस कार्यवाहीला समोर जाव लागत म्हणून एकही त्या व्यक्तीच्या मदतीला समोर आलं नाही. आणि तिथेच उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाला होता.

का कोण जाणे पण रवी सगळं विसरला, त्याला होणारा उशीर त्याच्या लक्षात नाही राहिला. कार साईडला लावली त्यांनी आणि लगेच त्या माणसाजवळ गेला. त्याला उचलून गाडीत बसलवल आणि थेट गाडी हॉस्पिटलला नेली.. त्याला ऍडमिट करून त्याच्या घरच्यांचा नंबर मिळवला त्यांच्या मोबाईल वरून आणि घरी कॉल केला.

फोन उचलताच रवीला लहान मुलांच्या रडण्याचा आवाज आला आणि एक स्त्री बोलली जी त्या ऍक्सीडेन्ट वाल्याची पत्नी असेल. हॅलो…..

रवीने त्यांना हॉस्पिटलचा ऍड्रेस दिला आणि ती येईपर्यंत तिथेच थांबला. का कुणास ठाउक त्याला त्या लहान मुलांच्या रडण्याच्या आवाजाने काहीतरी आठवले.. आणि ऑफिस मधे जाण्याची त्याची घाई -गडबड त्या रडण्याचा आवाजाने तो विसरलाच जणू.

लगबगीने त्याची पत्नी, दोन्ही मुलांना घेऊन हॉस्पिटल ला आली.. तिच्या सोबत दुसरं पुरुष माणूस कुणीच नव्हतं.

रवीने तिला झालेलं सर्व घटनाक्रम सविस्तर सांगितला.. तोपर्यंत डॉक्टर नी सांगितलं आता ते ठीक आहे.. पण जो चेकअप केला त्याचे पैसे आधी जमा करा.

   रक्कम ऐकून ती बाई आणखीच घाबरली… तिच्याजवळ एव्हडी पण रक्कम नसेल याची जाणीव झाली रवीला.. त्याने तिला धीर देत “ताई काळजी करू नका मी भरतोय पैसे… तुम्ही स्वतःला व मुलांना सांभाळा. हा माझा नंबर घ्या काही लागलीच मदत तर मला नक्की कॉल करा “

“दादा, देवासारखे धावून आलात बघा तुम्ही. संकटात तर आपली माणसं देखील पाठ फिरवतात, तुम्ही तर ओळख नसूनही मदत केली. तो विघ्नहर्ता, गणपती बाप्पाच तुमच्या रूपात आला बघा आमच्या वरच संकट दूर करायला. तुमचे सर्व पैसे मी नक्की परत करील दादा.. जमेल तसें. आज तुम्ही दोन मुलांना बापाच्या मायेपासून,  पोरक होण्यापासून वाचवलं, तुम्हीच आमचे विघ्नहर्ता दादा.. देव तुमच्यावर कोणतंच संकट न येऊ देउ ” असं म्हणून ती बाई रवीचे पाय धरत होती.

तेच रवी म्हणाला… “अहो ताई असं काही करू नका.. मी माणुसकी जपली इतकंच. काळजी घ्या दादांची. आणि हे काही पैसे ठेवा जवळ लागले तर.. येतो मी “

   रवी हॉस्पिटल मधून निघाला खरा.. पण त्याच्या डोक्यात..त्या बाईचे शब्द घोळत होते.. “दादा तुम्हीच आमचे विघ्नहर्ता “ रवीला विचार आला.. देव सगळीकडे मदतीला नाही जाऊ शकत म्हणून त्याने माणसात माणुसकी निर्माण केली. ज्यांनी त्या माणुसकीला जपलं तो खरा विघ्नहर्ता असतो. मूर्तिरूप फक्त आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी व मार्ग दाखवण्यासाठी असतो.

माझ्या बाबांच्या वेळी देखील अशी माणुसकी कुणी दाखवली असती तर बाबा असे रस्त्याच्या कडेला मरून पडले नसते.

बाप्पा आजवर तुझा राग करत होतो माझ्या बाबांना वाचवलं नाहीस म्हणून.

पण

आज लक्षात येतंय.. बाबांच्या ऍक्सीडेन्टच्यावेळी तू माणसात टाकलेली माणुसकीच लोप पावली होती. आज मी केलेल्या छोट्याश्या मदतीमुळे त्या बाईने मला विघ्नहर्ता म्हंटल.. बाप्पा तुझ्या बरोबरीने मान दिला..

आणि मी.. मी तर तुला मानत नाही.. राग करतो तुझा..

बाप्पा तू खरंच विघ्नहर्ता आहेस. आज माझ्या मनातला मळभ दूर झाला तुझ्याविषयीचा.

   सगळं झाल्यावर रवी जेंव्हा ऑफिस मधे पोहचला तेंव्हा त्याला कळलं की बॉस ने आजची मिटिंग कॅन्सल केली. कारण बॉसच्या घरी बाप्पाचं जेवण होत. आणि स्टाफ ला अर्ध्यादिवसाची सुट्टी दिली आणि सगळ्यांना जेवणाच निमंत्रण देखील दिल.

   माझ आज त्या मिटिंगमधे प्रेझेंटेशन होत.. आणि मी त्या ऍक्सीडेन्ट मधे अडकलेलो, मनात भीती होती बॉस रागवेल याची पण…..आज त्या विघ्नहर्ता गणपती बाप्पा ने माझ्या नोकरीवरच विघ्न देखील हरलं…

गणपती बाप्पा मोरया ” असं रवी जोरातच म्हणाला व तेही पहिल्यांदा..

#माझेलेखन

समाप्त… ©®जयश्री कन्हेरे -सातपुते

लेख आवडल्यास like, कमेंट करायला विसरू नका, जास्तच आवडल्यास शेअर नक्की करा पण नावासहित.. ©®जयश्री कन्हेरे सातपुते.. धन्यवाद ?

माझे इतर लेख वाचण्यासाठी मला फॉलो नक्की करा..

फोटो साभार गुगल…

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत