तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही …..(भाग२ अंतिम)

Written by

https://www.facebook.com/581606972323826/posts/668493110301878/  भाग १ साठी इथे क्लीक करा.

आशीषच्या अंगावरून पाऊस बेभानपणे दणादण आपटत होता आणि आशीषच्या डोळ्यातले अश्रूही त्याच्या साथीला येऊन मुक्तपणे बरसत होते.

काय करावं आता!  म्हणून समोरचं आयुष्य त्याला अगदीच निरस वाटत होतं. त्याची पावलं झपाझप चालत होती. आज ह्या पावसाने त्याला भरभरून साथ दिली होती आज तो आणि त्याचं मन मनसोक्त भिजत होते पण हे काय!  पावसाचा जोर कमी झाला होता पण डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नव्हते …..

किती वेळ चालत होता तो आणि चालण्याच्या नादात डोंगराच्या कीती उंचावर तो अाला होता हे त्यालाही कळालं नाही आणि जेंव्हा पाय थकून थांबू लागले, त्याच्या शरीराला रेटू लागले तेंव्हा त्याला समजलं की, आता अापली चालण्याची शक्ती संपत आली आहे म्हणूनच त्याला आता तिथेच थांबणं भाग होतं. त्याने समोर पाहिलं तर डोंगरावरून समोरची हिरवळ डोळ्यांना शांत करण्याऎवजी त्रासदायक ठरत होती. डोंगराच्या उंचीवरुन त्याने खाली पाहिलं तर त्याला स्वतः च्या हारलेपणाची जाणीव प्रकर्षाने जाणवत होती. आणि आता आपल्या जगण्यातही काही रस नाही म्हणून त्याने तो खालचा परिसर मोठ्या कौतुकाने न्याहाळला. तो आता शेवटचा निर्णय घेणारच होता तितक्यात ….त्याला एक ह्रदयातून जोरात कळ आली. अन् तो हबकला….

आईचं काय ? वडील गेल्यानंतर तिनं किती कष्टाने आपल्याला वाढवलं …. भावाचं काय? ज्याने लहान भाऊ म्हणून नाही तर स्वतः च्या लेकराप्रमाणे आपल्याला जपलं. सोडून द्यावी का ही सगळी नात्यांची मोहमाया? ….संपवावं का आता सगळंच …. त्याचं पाऊल पुढे जात मागे पडत होतं त्याच्या मनातून आवाज येत होता…

“आरे मार उडी, वाट कसली बघतोस?….संपवून टाक सगळं अाणि सुखी हो…..आपल्याला दु:ख झालय ना?  ….मग कशाला हवाय दुस-याचा विचार? ….तू टाक उडी” ……त्याच्या मनाची घालमेल वाढतच होती …

पुढे जाणारं पाऊल सतत मागे पडत होतं

तो घाबरत होता का? ….. का,  त्याच्या जवळ असणाऱ्या नात्यांची वीण त्याला सारखी मागे खेचत होती?..

त्याचं मन त्याच्याशी संवाद साधत होतं…’आरे टाक उडी … वाट कशाची बघतोस ….काय होणारे तुझ्या जाण्याने’? …. फक्त “आई ! तुझ्या नसण्याने रोजच्यारोज तुझ्या आठणीत मरेल घरी असणारा भाऊ तुझ्या नसलेल्या अस्तित्वात स्वतः चं हरवलेपण शोधेल . मित्र-मैत्रीणींचा एक हक्काचा आणि हळवा कोपरा नाहीसा होईल. इतके दिवस तुझ्यावर जे- जे लोक तुझ्याकडुन काहीही अपेक्षा न ठेवता तुझ्यावर मनापासून प्रेम करत आले त्यांचं प्रेम हरवेल ….यापेक्षा जास्त काही होणारच नाही  ……पण तुला काय ! त्या सगळ्यांपेक्षा तुझं दु:ख नक्कीच मोठं अाहे ….. तू टाक उडी आणि संपवून टाक स्वतःला ….. कशाला कोणाचा विचार करायचा?… नाही का “? …..

त्याला राहून-राहून विचार येत होता की, ….. ज्या प्रेयसीने पाच वर्षाचं प्रेम फक्त आई-वडिलांसाठी जातीचं आणि स्टेटसचं कारण देत क्षणात संपवलं तिच्यासाठीच आता आपण आपल्या आईचं पंचवीस वर्षाचं प्रेम विसरून जायचं आणि आत्महत्या करायची का? ….

ज्या नात्यात समजून घेणं नाही त्या नात्याचं ओझं बाळगून त्याला प्रेम तरी कसं म्हणावं? …..आशीष मागे झाला आणि तिथेच बसला…त्याने मोबाईलवरून कोणालातरी फोन केला. आणि तिथेच शांत बसून राहिला.

त्याच्या मनातलं द्वंद्व आता संपत होतं आणि त्याने समोर पाहिलं तर त्याचे मित्र-मैत्रीणी काळजीने व्याकूळ होऊन त्याच्याजवळ आले होते. कोणी त्याचे डोळे पुसत होतं तर कोणी त्याला प्रेमाने मिठीत घेत होतं तर कोणी त्याला प्रेमाने शिव्या घालत होतं  ….. दूरवरून त्याला त्याची आई मित्राच्या सहाय्याने धडपडत आपल्या काळजाच्या ह्या तुकड्यासाठी येताना दिसली आणि मोबाईलवर भावाचं प्रेम रिंगटोन बनून खणखणत होतं.

अजून काय हवं असतं आयुष्यात ?

प्रेमाने जोडली जाणारी चार नाती आणि त्यांच्याकडून मिळणारं भरभरून प्रेम …….

तिच्या जाण्याने ह्या प्रेमाच्या नात्यांना विसरून कसं चालेल?…..एक वाईट काळ आला आयुष्यात आणि आला तसा तो निघून गेला.

एखाद्याचा होकार आपण जसं सहज स्वीकारतो तसंच त्याचा नकारही पचवता आला पाहिजे. आपलंच दु:ख कवटाळत समोरच्याला दोष तरी कीती देणार? ….

आयुष्य खुप सुंदर आहे आणि कोणा एकाच्या जाण्याने ते संपत नसतं. थोडे दिवस त्रास होतो पण आपल्या ह्या त्रासासाठी इतरांना त्रास देणं हे कितपत योग्य? …

आपण कोणावर प्रेम करतोय ह्या पेक्षा आपल्यावर किती जण भरभरून प्रेम करतंय ह्याला जास्त महत्त्व असतं नाही का? ……आता आशीषच्या मनातली सारी व्याकुळता संपली होती त्याचं मन त्याला स्पष्ट उत्तर देत होतं ……..तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही ……कारण आता तुझ्याशिवायही माझी प्रेमाची माणसं माझ्या जवळ आहेत हे ही मला कमी नाही ….

समाप्त …

©Sunita Choudhari.

(मित्र-मैत्रीणिंनो आणि माझ्या वाचकांनो नमस्कार.  आज प्रेमात नकार मिळाल्याने बरेच वाईट प्रकार घडतात म्हणूनच त्यावर आधारीत मी माझी ही स्टोरी लिहिली. कोणा एकासाठी बाकी प्रेमळ लोकांना विसरू नका आणि आयुष्य सुंदर आहे त्याला संपवण्याचा आताताईपणा करू नका एवढंच मला सांगायचं होतं. माझी आजची ही स्टोरी कशी वाटली मला नक्की सांगाल आणि सोबत मला फाॅलोही कराल.)

 

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा