ते दिवस स्त्रीच्या आयुष्यात परत न येणारे

Written by

ते दिवस स्त्रीच्या आयुष्यात परत न येणारे,…
©स्वप्ना मुळे(मायी)
जशी ती घरात आली तसं ते पिटुकल कोंडुळ झोपू घातलं,…आणि लगेचच आपण नसल्यामुळे 2 महिन्यात घराची अवस्था पाहून लगेच झाडूच हातात घेतला,…भरभर ती आवरायला लागली पण तिच्या लक्षात आलं,…जरा थकल्यासारखे वाटतंय,…आणि तेवढ्यात चिमणा जीव पण रडून हाक मारतच होता,…त्याला मांडीवर पाजायला घेतलं आणि आता मात्र तिच्या डोळ्याला धाराच लागल्या,…तिला आईची वाक्य आठवू लागली,….”अग आताच आराम करून घे ग,..फक्त बाळांतपणच असं असत ग बाई,…कि आयुष्यातला आराम बाईला मिळतो परत तिने किती ठरवलं तरी ते शक्य नसतं ग,…मस्त मी देते ते गरम खाऊन पिऊन झोपा काढ,… अग बाईचा हा पुनर्जन्म आहे ग बाई,…खुप झीज होते ग,..तुम्हाला वाटतं काही होत नाही पण आता जर आराम केला नाही तर लवकर थकत मग शरीर,…आणि मग काढतं दुखणे कुठे पाठ,पाय,कम्बर दुखतच राहते,…सोपं नसतं ग आई होणं,…निसर्गाने झालो तरी संस्कार करणारी आई व्हायला आपलं मन आणि शरीर दोन्ही तंदुरुस्त राहील पाहिजे म्हणून हा आराम आहे ग दोन महिन्याचा,…आईला किती कष्ट झाले तरी तिने केलंच सगळं आपलं,…गार पाण्यात हात सुध्दा घालू देत नव्हती,…तिला सगळं आठवलं आणि ती गहिवरली,…”
त्याच लक्ष होतच तिच्याकडे त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला,..”आम्ही पण घेणार आहोत काळजी तुमची ,आई येतीये उद्या सकाळ पर्यंत,… ती पण म्हणाली आहे,…सुनबाईला अजून थोडा आराम पाहिजेच,…काय मजा असते ग तुम्हा बायकांची मस्त आराम,… ती हसली आणि म्हणाली ,..”जरा आठव ना हि गोड बातमी कळल्या पासुन सुरू झालेले त्रास,..चार महिने तर पाणीही पचल नाही मला,…मग तो सगळा भार घेऊन केलेले सगळे कामं,… सोबत थाट ही होताच म्हणा,…पण खरी परीक्षा निकालाची रे बाबा,…मरण बरं असं वाटणाऱ्या त्या वेदना,…काही क्षण तर असं वाटलं सम्पलं आता सगळं,…त्या वेदनेच्या खेळात मग आलेला तो रडण्याचा आवाज,…मग वाटलं चला सुटलो आता,…पण मग कळलं आता तर खरं अडकलोय,… त्याच्या भुकेच्या वेळा,… शी शु ची चालू असणारी सायकल,…डोळ्यात गाढ येणारी झोप बाजूला करून त्याला रात्री बेरात्री पाजावं लागणं…पण एक स्त्रीच हे दुःख जाणून असते म्हणून तर ती बाळंतिणीला होईल तेवढा आराम देऊ पाहाते,…”
हम्म म्हणून तर माझी आई येतीये तुझ्या सेवेसाठी,…दुसऱ्या दिवशी सासुबाई आल्या हिने थंड पाण्यात हात घातलेला पाहून त्यालाच रागावल्या,”अरे एक दिवस तुला करायला काय झालं रे,तिला कामाला लावलं,…तो म्हणाला,”आई अग बिघडलं काय त्यात केलं तर,…??”तशी त्याची आई म्हणाली,…अरे पुनर्जन्म आहे हा तिचा हे जोडीदारांने समजून घ्यायला पाहिजे,…नेहमी हसरी खेळती बायको पाहिजे तर ह्या दिवसात तिची काळजी घ्या,…आणि आजकाल काय तुम्ही एक किंवा दोन तर मुलं होऊ देणार,….मग तेवढे तिच्या आयुष्यातले तीन महिने तिला आरामाचे दिलेच पाहिजे नाही का,…?चल घे तिच्या हातातल्या कपबश्या इकडे आता आपली जबाबदारी तिला महिनाभर आराम देण्याची आणि सुनबाई माहेरी जशी राहिलीस तशी बिनधास्त रहा,…आयुष्यात हे दिवस परत येत नाहीत बरं,… करून घे आराम,…
झोपलेलं बाळही तिला हसताना दिसलं,…आई आता आपल्या जवळच बसेल ह्याचा आनंद झाला असेल लबाडाला,…मनात आलेल्या ह्या विचाराने तिला ही हसू आलं,…😊
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा