ते नाही म्हणून,आम्ही जगणं सोडायचं का?

Written by

काय करायचंय मग अजून? म्हणत काळे काकांनी मला प्रश्न केला.

काही गरज नाही अजून काही करायची. आहे त्या गोळ्या चालू ठेवा, रोजचा तुमचा दिनक्रम उत्तम चालू आहे तो ही तसाच राहू द्या. फक्त आपल्या शरीराला झेपेल इतकंच काम करा, नको त्या उठाठेवी करत आमच्या काकुंना त्रास देऊ नका म्हणत मी काकांच्या बायकोकडे बघत मिश्किलपणे हसले.

अग् , अशी कशी म्हणते तू !  मी उठाठेवी केल्याशिवाय का तुझे पेशंट वाढणारेत म्हणत काकांनी टाळीसाठी हात पुढे केला मग मी ही त्यांच्या हातावर टाळी दिली आणि आम्ही खळखळून हसायला लागलो.

काकांना चेक करून, औषधांचं सगळं सांगत हसणं-चिडवणं होऊन काका- काकू जायला निघाले तेवढयात काका मला म्हणाले ,

“सुनिता, उद्याचं लक्षात आहे ना”? नक्की ये,  उगाच कारणं देत बसू नको म्हणत, प्रेमळ धमकीच देत काका – काकू निघून गेले. आणि मी कितीतरी वेळ त्यांच्या जाण्याच्या मार्गावर बघत बसले. पुढचा पेशंट आला आणि मी कामात गुंतले.

साधारण पासष्टीचे काका अन् काकू साठीच्या, दोघं माझे अगदी जुने पेशंट. ब-याच वर्षांची ओळख आणि त्यांचं दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणूनच तर आमच्यात डाॅक्टर आणि पेशंटचं नातं सोडून मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं.

काका- काकू इथे एकटेच राहतात. दोन मुलांना खुप शिक्षण दिलं आणि मग मुलं परदेशी गेले पण आईबाबांची काहीच सोय होऊ शकली नाही म्हणून ते इथेच राहिले. पण मुलांनी शहरातलं सगळ्यात आलीशान असं वृध्दाश्रम शोधलं होतं त्यांच्यासाठी, पण काका काकूंनी स्पष्ट नकार देत आम्ही आमची सोय करतो म्हणत विषय संपवला.

ज्या वास्तूला घडवायला उभं आयुष्य वेचलं ते सोडून दुसरीकडे राहणं त्यांना पटत नव्हतं.

ज्यावेळी हे सगळं झालं होतं त्यावेळी काकूंना चक्कर आली म्हणून मी त्यांना चेक करायला गेले होते तेंव्हा मी काकुंना काही इंजेक्शन, गोळ्या दिल्या थोड्यावेळाने त्यांना बरं वाटलं पण अचानक माझ्यासमोर त्या ढसाढसा रडायला लागल्या. मुलांना अापली “सोईस्कर सोय “ करावी लागतीये हे काकूंना सहन होत नव्हतं आणि तिकडे काकांचीही हीच स्थिती होती पण आपण डगमगलो तर हिला कोण सांभाणार म्हणत काकांनी स्वतः चं दु:ख लपवलं होतं. त्यानंतर काका-काकू गरजेनुसार माझ्याकडे येत राहिले. नंतर हळूहळू आलेल्या परिस्थितीमधे स्वतःला कसं अॅडजेस्ट करायचं याचं तंत्र काकांना गवसत गेलं.

आता उद्या काकांकडे गणेश स्थापना होणार होती बरयाच वेळा बोलवूनही मला त्यांच्याकडे जाता अालं नव्हतं पण ह्या वेळी मात्र प्रेमळ धमकी आली होती म्हणून जाणं भाग होतं.

मी वेळेवर तयार होऊन काकांकडे निघाले सोबत माझी मुलगीही होती. आम्ही घरी पोचलो तर काकांच्या घरी बरीच गर्दी होती. साधारण त्याच दोघांच्या वयातली लोकं होती तीथे. कोणी मोदक करत होतं तर कोणी सजावट, कोणी आरतीची तयारी करत होतं तर कोणी प्रसादाची. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र प्रसन्नतेचा एकच भाव होता.

मला पाहताच काका खुष झाले, माझी ओळख सगळ्यांना करून देत माझ्या लेकीला त्या सगळ्यांनी मायेने घेरलं.

काका पुढच्या तयारीला लागणारच होते तेवढयात मी काकांच्या खांद्यावर हात ठेवला मागे वळत मला पहात काका पहिल्यांदा मला डाॅक्टर म्हणत म्हणाले की, “डाॅक्टर ! पोरं त्यांच्या- त्यांच्या मार्गी लागली आज ती इथं नाही म्हणून त्रास नक्कीच होतो. पण ते इथे नाही म्हणून आम्ही जगणं सोडावं का? समोर हात दाखवत ते पुढे म्हणाले, आमच्यासारखीच ही सगळी लोकं आहेत. समदु:खी आणि खरंतर आता खुप आनंदी”. 

मुलांच्या गरजा भागवत स्वतः साठी खुप काही करायचं राहून गेलं म्हणून आता आयुष्याचा राहिलेला तो आनंद मी परत मिळवतोय. हाच आनंद माझ्याकडून सगळ्यांना मिळावा म्हणून “आनंदाची ही सुरूवात माझ्यापासूनच करतोय” आनंद वाटण्यासाठीच मी हा ग्रूप बनवलाय, आता आम्ही सगळेजण छोट्या- छोट्या गोष्टींतुन आनंद मिळवतो म्हणत काका प्रसन्नपणे हसले आणि आरतीच्या तयारीला गेले. 

मी काकांकडे बघत राहिले. आणि आज मला काकांकडून आयुष्य सुंदर बनवण्याची गुरूकिल्ली मिळाली होती. “आनंदाची सुरूवात आपल्यापासून करायची असते मग आपण दुस-यालाही अानंदी ठेऊ शकतो हे मला आज नव्याने समजलं होतं”. 

माझ्या विचारात मी गुंग झाले होते, आरती होऊन गेली होती शेवटी कानावर काही शब्द पडले …..

हरे राम हरे राम
राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण
कृष्ण कृष्ण हरे हरे

©Sunita Choudhari.

( मित्र- मैत्रीणिंनो आणि वाचकांनो नमस्कार. आजची ही कथा माझ्या एका पेशंटवरुन मी लिहिली आहे. ही कथा सत्यघटनेवर आधारीत असुन काही प्रसंग कथेच्या गरजेनुसार रंगवले आहेत. आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगाल. सोबत लाईक, कमेंट आणि मला फाॅलो करायलाही विसरू नका. धन्यवाद.)

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा