#ते_खेळ_खेळुया_का?

Written by

#ते_खेळ_खेळुया_का
©प्रज्ञा लबडे
काही दिवसांपुर्वी मुलाला खेळणी घेण्यासाठी गेलो होतो. दुकानांत अगदी सगळय़ा प्रकारची खेळणी होती. मुलगा खेळणी बघण्यात गुंग झाला. आणि माझी हळूच नजर गेली तिथे असलेल्या भातुकलीवर.आपल्या घरातही नसतील एवढ्या वस्तू त्या भातुकलीमध्ये होत्या. फ्रिज, सोफा, कुलर ,मिक्सर ,टीव्ही, रॅक ,तेलाची किटली ,चमचे, गॅस, विळी, वॉशिंग मशीन ,फूड प्रोसेसर सगळं म्हणजे सग़ होते. आणि त्यातही प्लास्टिक, लाकडी, स्टील, तांबे सगळ्या प्रकारात उपलब्ध. ती भातुकली बघून मला माझी भातुकली आठवली. आठवणारच ना. कारण प्रत्येक मुलीच्या आपल्या भातुकलीशी एक वेगळाच बंध जोडलेला असतो. या भातुकलीमध्ये सगळं काही होतं पण ती मजा नव्हती.
मुलाला आवडलेले खेळणे घेतले आणि घरी आलो.
खरंच आजकाल मुलांना सगळं कसं लगेच मिळतं. म्हणजे एखादी वस्तू घ्यायची, ती दोन, तीन दिवस वापरायची आणि नंतर फेकून द्यायची. त्यांच्यात ना भावनां ना प्रेम. आणि त्यात सगळं रेडीमेड मिळतं, त्यामुळे मुलांमधला क्रिएटिव्हिटीला मिळणारा वाव कमीच. ना बौद्धीक ना शारिरीक ना मानसिक विकास. पण जाऊदे आजकाल त्यांच्यासाठी मोठे मोठे क्लासही उपलब्ध आहेत की.
मला माझे लहानपणीचे दिवस आठवू लागले. आमच्या खेळण्यांशी, खेळांशी एक वेगळेच नाते होतं.
जर भातुकली खेळायची असेल तर अगोदर माती घेऊन ती मळायची. त्यापासून वेगवेगळी भांडे तयार करायची. चुल,पातेले, ताटं सगळं मातीचं असायचं. नाहीतर नारळाच्या करवंट्या गोळा करत सगळं गाव फिरायचं आणि मग त्या फोडुन त्याला आकार देऊन वेगवेगळी भांडी तयार करायची. पोळ्या करण्यासाठी झाडाचे पान तोडून आणायची आणि मग त्यांच्या गोलगोल छोट्या छोट्या पोळ्या तयार करायचा.भाजी कि्ंवा भात म्हणजे बाभळीच्या झाडाचा पाला. थोडा थोडा तांदूळ सारखा दिसतो ना म्हणून . सगळ खोटं खोटं तयार करायचं खोटंखोटं खायचं.
आणि आता स्वयंपाक करायचा म्हटल्यावर दुकानवाला आलाच. दुकानदार झालेल्या मुलगा किंवा मुलगी दिवाळीच्या पणत्यांपासून तराजू तयार करायचे. त्या तराजुतच सामान मोजून मिळायचं. आणि या पणत्यांची पण वेगळीच गंमत असायची. म्हणजे दिवाळीच्या रात्री पणत्या लावलेल्या असायच्या .त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून जमा करायला जायचं. कारण ज्याला जास्त पंणत्या मिळणार त्याला जास्त खेळणे तयार करता येत होती. त्यामुळे पणत्या गोळा करण्यासाठी अगदी पळापळ व्हायचे. पण तीही आनंदाने. अश्या प्रकारे दिवसभर भातुकलीचा खेळ रंगायचा.
आता खेळाचा विषय निघाला होताच तर बाकिचे खेळही आठवले.
भातुकलीचा जोडखेळ असायचा तो म्हणजे बाहुला-बाहुलीचं लग्न.
त्यासाठी रेडिमेड बाहुला बाहुली तर कधी मिळालीच नाही. पण टेडीबिअरचा ही लांबपर्यंत पत्ता नव्हता. मग काय तर शिंप्याच्या दुकानासमोर पडलेल्या चिंद्या(कपडे शिवून कोरलेले कापड ) जमा करून कापडाच्या आणि काठय़ांच्या साहाय्याने त्याचे नवरा नवरी तयार करायचे. सुई दोऱ्याने त्याना छान छान कपडे शिवायचे. आणि त्यांचं लग्न लावायचं. त्यासाठी फुलं पानं आणायची. आंतरपाठ मंडप तयार करायचा. सगळं कसं धूमधडाक्यात व्हायचं. एकही रुपया खर्च न करता.
याच बरोबर रंगायचे ते मैदानी खेळ. तळ्यात मळ्यात, रुमाल-पाणी, दगड-पाणी, ठिक्कर-पाणी, संत्री-मोसंबी, मामाचं पत्र हरवलं, राम-रावण, हत्तीची सोंड, सजीव-निर्जीव, आंधळी कोशिंबीर, सूरपारंब्या, विटी-दांडू आणि खूप खूप खेळ.
या खेळांमुळे शारीरिक व्यायाम तर व्हायचंच.परंतु मानसिक आरोग्यही छान राहायचं.
उन्हाळा सुरू झाला की हे सर्व खेळ बंद असायचे. मग तेव्हा आठवायचे ते बैठे खेळ. सागर गोटे, चंपल-पाणी, गाण्याच्या भेंड्या, गावाच्या नावाच्या भेंड्या, काडीपेटीच्या बॉक्सपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तु, रुमाल व कागदापासून वेगवेगळे पक्षी वेगवेगळ्या वस्तू बनवणे .यांची तर अगदी स्पर्धाच रंगायची.
उन्हाळ्याची सुट्टी कधी संपायची ते कळतही नव्हतं..
ना कधी कोणत्या उन्हाळी शिबिरांची गरज पडली ना कोणत्या अॅक्टिव्हिटी किंवा खेळाच्या क्लासची. आम्हाला घडवलं ते सगळं या खेळांनीच.
‘बालपण देगा देवा’ असं म्हणतात. पण देवा आम्हाला आमचं बालपण नको पण आमच्या मुलांना हे सगळे खेळ नक्की दे.
मी तर हे खेळ मुलांसोबत खेळण्याची सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा प्रयत्न करून नक्कीच बघा.

(या खेळांबद्दल सविस्तर लिहिण्याची खरंच इच्छा आहे. बघुयात इच्छा तिथे मार्ग नक्कीच असतो.)

धन्यवाद!!! ?? लेख आवडला तर लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका .
सदर लेखाचा प्रकाशन तसेच वितरणाचे अधिकार लेखिकेकडे. दुसऱ्या कुठल्याही ग्रुप्सवर लेखिकेच्या नांवासह प्रकाशित करण्यास माझी हरकत नाही. कृपया लेख आपल्या नावाने प्रकाशित करू नये. .
फोटो साभार गुगल.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा