तो एक हिरा

Written by

#तो_एक_हिरा

भालचंद्र राण्यांचं कुटुंब मोठं होतं. चार मुलगे व दोन मुली होत्या. राणे शाळेत मास्तर होते. चारी मुलांची व दोन लेकींची लग्न राण्यांनी करुन दिली. सेवानिवृत्त झाल्यावर ते पत्नीसोबत गावच्या घरी राहू लागले. सुट्टीत ही सारी जणं गावच्या घरी रहायला यायची. रिझल्ट लागलाकी प्रत्येकण आपापल्या मुलांचे गुण अभिमानाने सांगत असे.

धाकटीच्या मुलाचे,राजेशचे टक्के नेहमी इतर भावंडांच्या मानाने कमी असायचे. त्याच्या आईवडलांनाही मग वाईट वाटायचं. राजेश अभ्यास तर मन लावून करायचा पण त्याच्या लक्षात जास्ती काळ रहात नसे. बाकी इतर कामांत राजेश इतर भावंडांहून उजवा होता. झाडांना पाणी देणं, घराभोवतालचा परिसर स्वच्छ करणं,विहिरीवरुन घरात पाणी आणणं, गुरांना चारा घालणं ही कामं गावी तो आनंदाने करी. त्यामुळे आजोबांचाही राजेशवर जीव होता. आजोबा राजेशच्या आईवडलांना समजवायचे,” तुमच्या पदरात हिरो असा. योग्य येळ येताच चमाकतलो तो. तुमी कायेक काळजी करु नका नी तेका अजिबात मारुझोडू नकोसा.”

गावावरुन मुंबईला परत येताना राजेश आजोबांच्या कुशीत शिरुन खूप रडायचा. मग आजोबा त्याला सांगायचे,”मिया शेतीची कामा सरली काय माझे बाबाक बघूक येतय हा.” मग राजेश आईवडलांसोबत मुंबईला जाई. तिथेही शाळा सुरु झाली की परत तिमाही.. परत सगळ्या आयांचे प्रश्न.. तुमच्या राजेशला किती मिळाले?आमच्या..ला तर इतके मिळाले? तुमचा राजेश अभ्यास करत नाही का? राजेशची आई तर या साऱ्या प्रश्नांनी कंटाळून जायची.

राजेशच्या मोठ्या काकांच्या मुलाने सायन्सला एडमिशन घेतली. मधल्या काकांच्या मुलीला बारावीनंतर मेडीकलला एडमिशन मिळाली.

राजेश बारावीत गेला. त्याच्यासोबत त्याच्या तीन नंबर काकांचा जयेशही बारावीत होता. जयेशला सीईटीत खूप चांगले गुण मिळाले. त्यालाही मेडीकलला प्रवेश मिळाला. राजेशला फारच कमी मार्क्स मिळाले. शेजारपाजारचे,नातेवाईक सगळे जसं काय त्याने फार मोठा गुन्हा केला असं त्याच्याकडे पाहू लागले. आईचं राजेशवर लक्ष नाही असं शेजारपाजारच्या बायका कुजबुजू लागल्या. राजेशचे आजोबा राजेशला भेटायला आले. त्यांनी त्याला धीर दिला. राजेशने बीएससीला एडमिशन घेतली. बीएससीलाही त्याला बऱ्यापैकी गुण मिळाले. पुढे त्याने बी.एड. केलं.

राजेशला शिक्षकाची नोकरीही मिळाली. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी चांगली सुविद्य वधू शोधली. राजेशचं व रेवाचा विवाह झाला. पुढे राजेशने घरी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. रेवा त्याला मदत करु लागली. त्याच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ वाढू लागला तसं त्याने एका इमारतीत दोन फ्लेट भाड्याने घेतले. काही वर्षांतच ते विकत घेतले.

पाचवी ते बारावीपर्यंतच्या राजेश सरांच्या क्लासची ख्याती आजुबाजूच्या शहरांमध्येही पसरली. लांबूनलांबून मुलं खास दहावी बारावीच्या वेकेशन क्लाससाठी राजेश सरांच्या क्लासला येऊ लागली. इतर त्याच्याबरोबरीचे त्याचे सवंगडी दहा ते पाच नोकरीत गुंतले होते. रोजचा दगदगीचा प्रवास करत होते.

राजेशने स्वतःला त्याच्या आवडत्या ज्ञानदानाच्या कार्यात वाहून घेतले. अतिशय वाजवी फी व उत्तम शिकवणी यामुळे त्याच्या क्लासची ख्याती दिवसेंदिवस वाढू लागली. राजेशच्या आजोबांचा नव्वदावा वाढदिवस राजेश व रेवाने त्याच्या क्लासमध्ये साऱ्या विद्यार्थ्यांसोबत साजरा केला व साऱ्या मुलांना त्याच्या आजोबांनी त्याला वेळोवेळी कसे प्रोत्साहन दिले याबाबत सांगितले.

आजोबांच्या डोळ्यांत आपल्या नातवाच्या यशाबद्दल आनंदाश्रू तरळत होते.

——–गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.