“तो-ती आणि पाऊस” #पावसातील ओलिचिंब lovestory। ©दिप्ती अजमीरे.

Written by

‘तो’ अगदीच  साधासा…
‘ती’ तशी एकाकी, स्वतःभोवती सीमित असलेली, मात्र निसर्ग तिचा जिवाभावाचा मित्र…
अशा या दोघांची ही कहाणी …

घरी जाऊन आता काय करू ह्या विचारात असतानाच आभाळाची नजर त्याच्यावर पडली अन् घामाने भिजलेला तो आभाळाच्या मायेत ओलाचिंब होऊ लागला…

आयुष्यात असा एकाकीपण पहिल्यांदाच अनुभवत होता…  काहीशा कारणाने विश्वास उडाला आणि तो एकटा पडला…
याच विचारात तो एका तळ्याच्या बाजूला बसला आणि डोळे मिटणार तोच त्याची नजर दूर बसलेल्या तिच्याकडे गेली…

चिंब चिंब भिजलेली ती…
खडकावर एकटीच बसलेली होती…
दूरवर भिरभिरणारी नजर जणू कोणालातरी शोधत असावी…

शून्यात दडलेली ती, त्याला भावून गेली…
जणू हीच ती, जिला, मी शोधतोय; असं त्याला वाटलं…

आपसूक तो तिच्या दिशेने निघाला…
पुढे चालू लागला… ती आता त्याला स्पष्ट दिसत होती… तशी ती अतिशय भावनिक झालेली जाणवली…

ती दिसेल, असा तो बसला…
अप्सरा नसली, सुंदर होती ती….
नाजूक, सावळीशी, गुलाबी ओठ, साधंसं च नाक, मध्यम बांधा पण रुबाबदार – कमनीय…

निळसर फिटिंग चा ड्रेस त्यावर गुलाबी ओढणी अंग झाकेल अशी घेतलेली…
तरीही हा पाऊस तिला चिंब करतच होता… आणि ती निःशब्द आपल्याच विचारात गढलेली…

तिच्याकडे तो सहज ओढल्या जावू लागला…
आपसूक नजर तिच्याकडे जात होती आणि त्याचे विचार सोडून तिच्याच विचारात गुंतला…

पावसाचा मनसोक्त आनंद घेत असतानाच, ‘तिची’, त्याच्यावर नजर खिळली…

‘तो’ तिच्याकडे, ‘ती’ त्याच्याकडे
असं दोन तीन वेळा नजरानजर झाल्यावर ‘ती’ तावातावाने उठून त्याच्याकडे गेली

चांगल्या पोटभरून शिव्या हासळून झाल्यावर ‘ती’ जायला निघाली आणि पाय घसरला… हो!!! तिचा…

तसं ‘तिला’ त्याने आपल्या कवेत धरलं… ‘तिच्या’ चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता त्याला…

आता ती सावरली, थोडी घाबरली…  थोडी लाजली… ते ही इतकी गोड की काय सांगावे!!
तो आता पुरता घायाळ झाला…

‘ती’ thanks म्हणून जाऊ लागली पण जाता जाता आपलं हृदय घेऊन जाते आहे असं त्याला वाटू लागलं….

‘तो’ मात्र तिच्या वळलेल्या कटीबद्ध आकृतीकडे बघू लागला…

एव्हाना पाऊस ही कमी झाला होता…
मात्र तिच्या केसांतून झिरपलेलं पाणी अजून त्याच्या तळ हातात होते…

‘तो’ घरी पोहोचला पण शरीराने च
तिच्या केसांचा सुगंध अजूनही तळ हाताला येत होता… so हात धुवायची इच्छा होत नव्हती…

खिडकीतून सहज बाहेर लक्ष गेले तर दूर समोरच्या ‘खिडकीत’,  केस झटकताना ‘ती’ दिसली… त्याने जरा खिडकीजवळ जाऊन बघितले, पण तिथे ‘ती’ नव्हती… थोडासा नाराजीत पण हसत ‘तो’ वळला तर आरशात ‘ती’ त्याला बघून हसत होती…
तो पुन्हा दचकला… वळून पाहिले तर ‘ती’ नव्हती… भास चं सारे!!!

आता ‘ती’ त्याला रात्ररात्र जागवू लागली…
कधी इथे, कधी तिथे, येता-जाता, रस्त्यात दिसू लागली… जवळ जाताच गायब होऊ लागली…

अनेक वेळा ‘तो’ परत त्या जागी गेला पण ‘ती’ नव्हती म्हणून तसंच परत यायचा…

अचानक एक दिवस परत तसाच पाऊस…

पुन्हा त्याच्यातली आस जागी झाली आणि ‘तो’ त्या तळ्याकडे ओढीने जाऊ लागला…

आज ‘ती’ पुन्हा तिथेच त्या खडकावर तशीच शून्यात नजर लावून बसलेली… आनंदी वाटत होती…

जेव्हा पावसामुळे बाकी लोक आसरा शोधायचे, ‘ती’ मात्र कोसळणाऱ्या सरींना आपल्या अंगावर झेलायची आणि मनसोक्त भिजायची…
पाऊस कमी झाला की निघून जायची…

आणि ‘तो’ दुरूनच तिच्याकडे, तिच्या आनंदी, गंभीर, कधी खट्याळ, चेहऱ्याकडे बघत राहायचा…

त्याला आधी हा पाऊस इतका कळलाच नव्हता जेवढा ‘तो’ ‘तिला’ भिजतांना बघून कळायला लागला…

हळूहळू तिलाही कळू लागले की, प्रत्येक पावसात ‘तो’ तिला भिजतांना बघतो आणि तिच्यासोबत ‘तो’ ही रमतो मग या चिंब पावसात…

कधी भडकायची त्याच्यावर आणि ‘तो’ निःशब्द, शांत… मग ‘ती’ चिडून निघून जायची…

हळूहळू तिला सुद्धा सवय झाली…

‘तो’ बघतो आहे हे बघून ‘ती’ मोहरून जायची… ‘तो’ आला की ‘ती’ गिरकी घेत, खट्याळ लाजायची आणि पावसासोबत बोलायची…

अवखळ, अल्लड ‘ती’
पाऊस म्हणजे तिचा जीव…
पाऊस म्हणजे तिचा आनंद…

‘ती’ आणि ‘तो’ आता सोबत भिजु लागले…

तिला पाहल्यापासून ‘तो’ पावसाला समजून घेऊ लागला…
पहिल्या पावसातील पहिली भेट रोज नव्याने अनुभवू लागला…
तिच्या ओठांतून पडणाऱ्या प्रत्येक शब्दांना मग ‘तो’ त्याच्या स्वप्नांवर झुलवू लागला…

‘ते दोघे’ आता एकत्र त्या खडकावर बसून पावसाची वाट बघायचे… कधी हा पाऊस त्यांना हुलकावणी द्यायचा, तर, कधी हा खट्याळ पाऊस कधीही गाठून त्याच्या च तालावर नाचवायचा…

‘ती’ सुद्धा सारे बंधनं झिडकारून त्याच्या तालावर बेभान व्हायची आणि ‘तो’ तिला बघत राहायचा…

दोघे बाईकवर लॉंग ड्राईव्ह ला पावसात चिंब होत जायचे आणि ती मागे त्याला घट्ट चिपकायची… तिचा स्पर्श त्याला मोहित करून जायचा… ‘तो’ अजून स्पीड वाढवुन पावसाशी शर्यत लावायचा की, कोण जास्त वेळ तिला देणार…

कधी ‘तो’ जिंकायचा तर कधी ‘पाऊस’…
पण ‘ती’ मात्र दोघांसोबत ही तेव्हढीच खुष…

असंच एका पावसात prapose करण्याचे त्याने ठरविले… तो ‘पाऊसच’ होता त्यांच्या प्रेमाच्या साक्षीला…

तिला भेटला… गप्पा रंगल्या होत्या पण वाट होती ती पावसाची… मात्र पाऊस काही केल्या येईना…

बाईक वरून लॉंग ड्राईव्ह ला निघाले पण आज पाऊस त्याची परीक्षाच बघत होता जणू…
यायचं नाव च घेत नव्हता की, येण्याचे कुठले लक्षण ही दाखवत नव्हता…

किती तरी वेळा असंच झालं…

कधी ‘तो’ यायचा तर ‘पाऊस’ नसायचा आणि ‘पाऊस’ असला तर ‘तो’ तिला बघण्यात हरपून जायचा…

आज बरेच दिवस झाले ना पाऊस भेटला ना ‘ती’ तशी अवखळ,अल्लड…

जणू पावसातली ‘ती’ दूर गेलेली निघून…
तिला किती किती आठवणी तो सांगायचं त्या पावसाच्या… पण ‘ती’ चातका सारखी पाऊसवेडी…

दोघांच्या भेटी वाढल्या…
प्रेमाची ओळख ही झाली…
दोघेही रमू लागले आपल्या विश्वात…
साऱ्या जगाचे भान हरपून, आपले नवे स्वप्न रंगवू लागले…

मात्र दोघांनाही वाट होती ती त्या ‘पावसाची’…

आज जरा ‘तिला’ उशीर च झाला होता यायला…
‘तो’ वाट बघून बघून थकला…
तरीही येईल थोड्यावेळात, म्हणून, पुन्हा एकदा सज्ज झाला आणि तिची वाट बघू लागला…

त्याची तंद्री लागली… जुने दिवस, पहिली भेट नजरेसमोर येऊ लागली…
कशी ‘ती’ त्याला आवडू लागली आणि तिच्यासोबत ‘तो पाऊस’ ही आवडू लागला… सगळं सगळं आठवू लागला…

तोच मंद मंद झुळूक आली कुठूनशी…
‘तो’ त्या दिशेकडे वळला…
‘ती’ येताना दिसली…

Faint अबोली साडी… flowing पल्लू… एकच लांब मोत्याची सर, गळ्यात शोभून दिसत होती…
लांब मोकळे भुरे केस, तिला छळत होते जणू…
तिचे गुलाबी ओठ अजूनच मोहक वाटत होते…
तिच्या पाणीदार डोळ्यांत जणू एक चमक होती…
लयबद्ध तिची चाल जणू त्याला वेडावून गेली…

आणि निसर्गात जणू सोहळा चालू झाला…
गार वारा तिच्या भोवती पिंगा घालू लागला…
रम्य ती सायंकाळ, थोडी गुलाबी-सावळी झालेली…
त्यामुळे तिचं सौंदर्य अजून खुलून आले…

‘ती’ अशी… अगदी अशी…
त्याच्या समोर येऊन थांबली…
दोघांची ही धडधड वाढली…
एकमेका भेटण्यास आतुर झालेले ते… एकमेकांच्या डोळ्यांत हरवून गेले आणि तोच…

‘तो पाऊस’ वेडावणारा जणू, रिमझिम  बरसू लागला त्या दोघांवर…
जणू तो आपला आशीर्वाद च देतोय दोघांना…

‘ती’ दोन्ही हात पसरून पावसाच्या थेंबांना आपल्या चेहऱ्यावर खेळवू लागली…
मधेच गिरकी घेत त्याच्याभोवती फिरू लागली…

‘ती’ अशी ओलिचिंब बघून ‘तो’ ही बेभान झाला… ‘तिला’ आपल्या मिठीत घेऊन, तिचे ओले केस, आपल्या बोटांनी बाजूला करू लागला…

‘ती’ लाजेने गुलाबी झालेली, अजूनच खुलू लागली… तिच्या हृदयाची धडधड आता स्पष्ट जाणवू लागली… एकमेकांच्या डोळ्यांत ते दोघे हरवणार, तोच ‘तीने’ गोड लाजत-हसत आपली नजर चोरून घेतली…

‘तिच्या’ हनुवटी वरील थेंबांना ‘तो’ आता अडथळा समजून, ‘तिला’ आपल्या मिठीत घट्ट करत म्हणाला, हाच ‘तो पाऊस’ ज्याने तूला आणि मला भेटवले…

मला ‘तू’ अशी भिजलेली खूप आवडतेस…
आता पावसात भिजतांना माझ्यासोबत सुद्धा भिजशील का???

‘ती’ लाजत नजर खाली ठेवून,
एक सुंदर-अवखळ हसू उमटवत,
त्याला थोडं दूर लोटत म्हणाली,

नक्कीच…
पण माझा तो…

” ‘मी’ आणि ‘तो’ आम्हा दोघांना तुला स्वीकारावं लागेल… हे मान्य असेल तर…”

“तो!!! तो!! कोण??”

“अरे, हा पाऊस!!! अरे…”

आणि मग दोघंही हसत हसत एकमेकांच्या मिठीत हरवले…

चल तुझ्यात मी आणि माझ्यात तू आता सामावून जाऊया… म्हणत पावसात आणि प्रेमात भिजत राहिले….

आणि ती सायंकाळ अजूनच गुलाबी होऊन बरसत राहिली…

समाप्त…

  • दिप्ती अजमीरे…
Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा