त्याच्या आठवणीतील मीरा

Written by

तब्बल वीस वर्ष झाले होते मोहनला त्याचे गाव सोडून.नौकरीच्या निमित्ताने तो तब्बल वीस वर्षांपासून मुंबईला होता.मोहन आणि त्याची बायको सुमेधा दोघेही नौकरी करत असत. म्हणून सुरुवातीला त्यांना अगदीच तीन ते चार दिवसांची सुट्टी मिळत असे. तेव्हा गावाकडे येत असत.पण जसे जसे दिवस गेले तसे तसे त्यांचे गावाकडे येणे कमी झाले. आणि नंतर त्या दोघांनी मोहनच्या आईवडीलांचा सांभाळ मुंबईला केला.आता ते दोघेही हयात नव्हते.

गावाकडील वाडा आणि असलेली शेतजमीन विकण्यासाठी मोहन गावाकडे चालला होता……गावाकडे जाताना मोहनला रस्ता मात्र खूप अनोळखी वाटत होता.ओळखीचा वाटणार तरी कसा?? खूप बदल झालेला होता.माती धूळ उडवणारा रस्ता आता डांबररस्ता झालेला होता. मातीच्या,दगडांच्या घरांची जागा मात्र आता सिमेंटच्या घरांनी घेतली होती.
गाडी थांबली आणि कंडक्टर ओरडला पिंपरी…..

मोहन ने आश्चर्याने विचारले?? हे पिंपरी आहे?

त्याने त्याचे गाव ओळखलेच नव्हते.जिथे आधी बस स्टॅन्ड वगैरे काही नव्हते तिथे आता त्याला बसस्टॅन्ड दिसत होते.भलेही लोकं खेड्यातले होते प्रत्येकाजवळ मोबाईल दिसत होता. दोन चाकी गाड्याही दिसत होत्या.

आपले गाव तर खूपच सुधारले असे मोहन मनोमन म्हणत होता.

तो आता गावातील व्यवहार पूर्ण होईपर्यंत त्याचा बालमित्र दीपक याच्याकडे राहणार होता.

पण हे काय?? मोहनला कुठे जायचे तेच कळेना.शेवटी त्याने दीपकला फोन लावला… दीपक मला घ्यायला ये बरं मला रस्ताच कळत नाही…… आपलं घर आपल्याला सापडत नाहीये? आता मात्र मोहन एकदम भावनीक झाला… असं कसं ?? इतकं परकं झालो का आपण?? असं मोहनला वाटायला लागलं.

तितक्यात दीपक मोटरसायकल घेऊन मोहनला घ्यायला आला. मग दोघेही मोटर सायकल वर बसून दीपकच्या घरी आले.

दीपकचं घर सिमेंटचं होतं.त्याने छोटया छोटया रूम काढलेल्या होत्या आणि गॅस शेगडी पासून ते हिटर पर्यंत सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्या.

मोहनला हात पाय धुवायला सांगितले.आणि दिपकच्या बायकोने( गंगा ) गरम गरम केलेलं पिठलं भाकरी खाल्लं. आणि आराम करायला बाजेकडे गेला. पण झालं उलटंच होतं आता मोहनचा प्रवासाचा थकवाच गायब झालेला होता.
कसा असेल आपला वाडा?? खूप मोडकळीस आला असेल नाही?विकला जाईल का? किती किंमत येईल त्याची? असे नानाविध प्रश्न मोहनच्या मनात येत होते.

शेत तरी दीपक बघत होता म्हणून थोडाफार जागेवर असेल. दीपकलाच विचारतो घेतोस का म्हणून… मी अगदीच कमी भाव लावेन…. असा विचार करत करत मोहनला कधी झोप लागली हे कळलेच नाही.

पक्षाच्या किलबिलाटाने आणि कोंबड्याच्या आरवण्याने मोहनला जाग आली.गंगा ने मोहनला टूथपेस्ट दिले…. मोहनला एकदम काळ्या मंजनाची आठवण झाली. मनात विचार आला आता खेड्यातही माणसांची जीवन पद्धती ते घर आणि रस्त्यांपर्यंत शहरीकरण झालेलं आहे. खूप सुधारणा झालेल्या दिसत होत्या.

चहा नाश्ता झाल्यावर मोहन आणि दीपक त्याच्या वाड्यावर जायला निघाले. मोहन ला कसं तरीच व्हायला लागलं…. वाड्याविषयी खूप उत्सुकता होती.

दीपक आणि मोहन एकदाचे वाड्यावर पोहोचले.वाडा अगदीच जश्याला तसा दिसत होता…. मोठा चिरेबंदी वाडा…. जणू काही मोहनच्या प्रतिक्षेतच होता…. मोहन आपला वाडा पाहून एकदम आनंदला.आणि त्याचे मन भूतकाळात गेले.

त्याला आईने बाहेरच अंगणात घातलेली अंघोळ, वाड्यात खेळलेली लपाछुपी…. अंगणात ठेवलेला रांजण….. अंगणातील पारिजातकांच्या फुलांचा सडा….. आईने रोज तयार करायला लावलेला पारिजातकांच्या फुलांचा हार…. वडिलांचे ओरडणे, वडिलांचा धाक…. खेळलेल्या काचेच्या गोटया…. विटी दांडू….. बैलगाडीच्या मागे धावणे…. धावत्या बैलगाडीत बसने… बैलाला हाकणे…. शेतात पळणे….. विहिरीत पोहणे….. पाडाचा आंबा खाणे… पेरूच्या झाडावर डाबडूब खेळणे…. असे सगळे दृश्य अगदीच एखाद्या सिनेमासारखे मोहनच्या नजेरेसमोरून गेले.. त्यात त्याला या सगळ्या गोष्टींमध्ये साथ देणारी त्याची बालपणीची जिवलग मैत्रीण मीराची आठवण झाली. आणि टचकन डोळ्यात पाणी आले.

मोहन ने दीपकच्या नकळत स्वतः चे डोळे पुसले आणि विचारले मीरा चे काय चालू आहे रे आता ती कुठे असते?
दीपक म्हणाला अरे ती आता दिल्लीला असते.तिचा नवरा काही तरी क्लास 1 पदावर आहे.तिचं सगळं चांगलं चालू आहे.इथे आली की एकदातरी या वाड्याला भेट देते ती आणि जुन्या आठवणींना उजाळा देते.

मोहन पूर्ण वाडाभर फिरला…. सगळं अगदीच जश्याला तसं होतं अगदी वीस वर्षांनंतरही. फक्त स्वच्छता केली तर अगदी आज राहता येईल अशी.

मोहनने ठरवलं आता स्वछता करून घ्यायची आणि इथेच मुक्काम करू. पंधरा दिवसांनी मुलांना सुट्ट्या लागणार आहेतच तेव्हा त्यांनाही पिकनिक म्हणून बोलावून घेऊ.
मोहनने तीन ते चार गडी बोलावून वाडा स्वच्छ करून घेतला. शहाबादी फरश्या असल्याने त्या देखील जश्याच्या तश्या होत्या.

लवकरच वाडा राहण्यासारखा तयार झाला. मोहन ने दीपकसोबत तालुक्याला जाऊन गरजेपुरते भांडे कुंडे आणि किराणा आणून घेतला.दीपक त्याला म्हणत होता कश्याला कुटाणा करतोस वहिनी आणि मुले राहतील ना माझ्याकडे. तेव्हा मोहन म्हणाला अरे तसे नाही त्यांनाही एकदा राहू दे ना या वाड्यात.

मोहन ने आपला प्लॅन सुमेधाला फोनवर सांगितला.ते ऐकून सुमेधा आणि मुले देखील खुप खूष झाले.
मोहन आता शेताकडे जायला निघाला दीपक आणि तो, दोघेही
शेतामध्ये गेले….. दीपक ने मोहन अगदीच जीवापाड जपले होते त्या शेताला. पिकं सारी हिरवीगार होती….. दीपक ने शेती मध्ये देखील आधुनिक तंत्र ज्ञानाचा वापर केलेला होता.दीपक दरवर्षी त्यातील होणारं पीक विकत असे आणि बऱ्यापैकी धान्य विकत घेऊन मोहनला पाठवत असे.आणि बाकीचे विकून पुन्हा पेरणी करण्यासाठी, काही स्वतः साठी आणि दरवर्षी काहीना काही आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यासाठी करत असे…. हे सगळं रीतसर मोहनच्या वडिलांनीच दीपकशी मुंबईला जाण्यापूर्वी ठरवले होते.

मोहन फिरत फिरत पेरूच्या झाडाच्या तिथे आला….. आणि पुन्हा त्याला मीराची आठवण झाली….. इथे तर आम्ही डाबडुब खेळायचो…… सगळेच मित्र मैत्रिणी….. मोहन पून्हा भूतकाळात गेला….. त्याला अगदी एकदम लहानपणीची मीरा म्हणजे तेव्हा ती 11 वर्षांची असेल आठवली….. सगळे मिळून खूप मस्ती करायचे. ती सतत मोहन सोबत असायची त्याला फुले वेचायला मदत करायची, हार तयार करण्यात मदत करायची, शेतातील कुठलंही फळ असो ती पहिले मोहनला द्यायची आणि मग स्वतः खायची.त्या दोघांचं कधीपण सोबतच नाव घेतलं जायचं… मीरामोहन…. इतकी त्या गावालाही सवय झाली होती. मोहनचे वडील पिंपरी गावचे सरपंच होते आणि मीराचे वडील तिथेच मुकादम.

मीरा आणि मोहन जस जसे मोठे होऊ लागले तस तसे घरच्यांनी त्या दोघांनाही भेटण्याविषयी बंधन टाकायला सुरुवात केली. त्या दोघांनाही समजत नव्हते की आपल्या घरचे असे का वागत आहेत?? पण म्हणतात ना जिथे अश्या प्रकारे बंधन टाकले जाते… तिथेच विरोध निर्माण होतो आणि बंधन तोडली जातात. तसं या दोघांच्या बाबतीत घडायला लागलं दोघेही चोरून शेतात भेटू लागले. खेड्यामध्ये अश्या गोष्टी जास्तकाळ लपत नाहीत. या दोघांच्याही भेटण्याची कुणकुण मोहनच्या वडिलांना लागली. मोहनचे वडील पूर्णपने या गोष्टीच्या विरोधात होते.. आपल्या हाताखाली असलेल्या मुकदमची मुलगी त्यांना सून म्हणून पसंत नव्हती. त्यांना वाटायचं मुलगी कसं आपल्या तोलामोलाची असावी…….. आणि मीरा सून करून घेणं म्हणजे आपली पत गमावणं असं त्यांना वाटायचं.

मोहनने सुरुवातीला त्याच्या वडिलांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे वडील काही ऐकेनात म्हणून त्याने मीरा सोबत पळून जाण्याचा प्लॅन केला….. पण तो ही फसला…. आता मात्र मोहनच्या वडिलांनी त्याला धमकी दिली….. तू फक्त पळून जा… मी मुकादमला उभा चीरीन…. हे ऐकल्यावर मोहन एकदम लटलट कापायला लागला. त्याने त्याच्या वडिलांना गुन्हेगारांना शिक्षा देताना पाहीले होते…. त्यामुळे त्याला धमकी पूर्ण पने खरी वाटली… त्याला खात्री होती की त्याचे वडील असे करू शकतात…… मग वडिलांच्या परवानगीनेच तो एकदा शेवटचं म्हणून तो मीराला भेटायला गेला…

मोहनने मीराला सगळं खरं सांगितलं आणि सांगितलं हे तू तूझ्या बाबांना नको सांगू….. आपल्या आयुष्याच्या वाटा वेगळ्या आहेत….. तू लग्न करून टाक.  मीरा रडायला लागली मोहन हे काय बोलत आहे? लहान पणा पासून…. मला त्याची किती सवय झाली आहे. आणि आता?? पण तिच्या बाबांसाठी तिनेही तो हट्ट सोडला….

लवकरच मोहन च्या वडिलांनी मोहनचं लग्न ठरवलं….. त्यांच्या तोलामोलाच्या मुलीशी…. सुमेधा ही शहरातील त्याच्या आईच्या नात्यातील मुलगी होती…. दोघांच्याही घरी अगदी कडक शिस्तीचं वातावरण…. मुलांच्या इच्छेला तितकं महत्व देत नसत….

मोहन चे लग्न झाले आणि कामानिमित्त तो मुंबई ला राहण्यासाठी गेला. तसंही त्याची इच्छा उरली नव्हती त्या गावात थांबण्याची.

मीरा साठी तिचे वडील वर संशोधन करत होते. पण प्रत्येक वेळा तिचं लग्न हुंड्याच्या बोलणीने फिसकटत होते. तशी मीरा दिसायला खूप सुंदर होती….सर्वगुणसंपन्न होती…. पण हुंडा तिचं लग्न जमण्यासाठी आड येत होता.

अचानक एक दिवस मोहनचे वडील अंगणात असताना त्यांचा बैल उधळला…. मोहनच्या आईवडिलांना दोघांनाही चांगलेच जखमी केले….. मीरा आणि तिच्या वडिलाने दोघांनी त्यांना जसे कळाले तसे धावत जाऊन मोहनच्या आईवडिलांना तालुक्याच्या दवाखान्यात नेऊन भरती केले. मोहन मुंबईवरून निघाला पण तो पावसामुळे तिकडेच अडकला….. मोहनचे गावाकडे जाण्याचे सगळे मार्ग बंद झाले होते…..

इकडे मीरा मात्र मनापासून दोघांची सुश्रुषा करत होती…… आता मात्र मोहनच्या वडिलांना त्यांच्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता….. त्यांनी मीराची मनापासून माफी मागीतली…. आणि त्याच्या मुकादमला सांगितले की मीराचे लग्न मी करतो तूम्ही फक्त चांगलं स्थळ बघा…. पैश्याचा विचार करू नको.. ….. तु जर होकार दिला तर मी समजेल की तूम्ही मला माफ केलं….

आता मुकादमला होकार देण्याशिवाय पर्याय नव्हता…

नंतर मीरा चे लग्न जमले आणि मोहनच्या वडिलांनी ते थाटामाटात लाऊन दिले…. इच्छा नसताना देखील मोहनला मीराच्या लग्नात सगळे कार्यक्रम साजरे करावे लागले… पण मीरा चे चांगलेच व्हावे आणि ती तीच्या संसारात सुखी राहावी असेच आता त्याला मनापासून वाटायला लागलं…… मीरा चे लग्न झाले आणि ती सासरी गेली.
(मोहन मनात म्हणत असे…. देवा मला कोणत्या पापाची शिक्षा देत आहेस…. मी जिच्यावर मनापासून प्रेम केलंय तिच्याच लग्नात मला सगळं हजर राहून करावं लागत आहे…. )

दीपक ने मोहनला हलवले…..मोहन काय उभ्या उभी स्वप्न बघतो की काय?? मी किती आवाज दिले तूला? हो का?
माझं लक्ष नव्हतं…. कान पकडून मोहन म्हणाला. पंधरा दिवसांनी मोहनची घरची मंडळी राहायला आली… सगळ्यांना वाडा खूप आवडला…. गावातील गायी म्हशींचा गोठा बघून मुलं तर खूप खूष झाले….. एका वासराजवळ गेले….. मायेने हात फिरवला…. त्यांना खूप मज्जा वाटत होती.

गायीचं दूध काढणारा माणूस त्यांनी पहिल्यांदा पाहिला होता… आता पर्यंत मिल्क मॅन दूध देतो एवढंच त्यांनी डोळ्यांनी बघितलं होतं. आणि गाय दूध देते हे पुस्तकात वाचलेले होते. मग दुसऱ्या दिवशी मोहन सुमेधा व मुलांना शेतात घेऊन गेला…. मुलांनी भरपूर बोरं, पेरू खाल्ले. विहीर बघितली.खळखळ वाहणारी नदी बघितली खूप मज्जा केली… रोज एक काहीतरी नवीन गोष्ट मुलांना माहित होत असे……

पप्पा आपण दरवर्षी इथे यायचं का? असा प्रश्न मोहनच्या चिमुकल्याने केला? सुमेधा पण मुलाच्या सुरात सूर मिसळत हो मोहन हे खरंच एका रिसॉर्ट पेक्षा कमी नाहीये… खूप सुंदर आहे. शेत पण छान आहे. जसं चाललंय तसं चालू देऊ पण वाडा आणि शेत नको विकायला……

मोहन भावनाविवश होऊन लगेच म्हणाला…. नाही विकत मी घर आणि शेत ……आपण सुट्यांमध्ये येथे येत जाऊ……. ये… ये असं करत मुलांनी टाळ्या वाजवल्या…..

कथा आवडल्यास like करा. Share करायची असल्यास नावासहित share करा.

©®डॉ सुजाता कुटे

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा