त्याच्या पुरुषत्वासाठी तिने केलेली तिच्या स्त्रीत्वाशी तडजोड…

Written by

मैत्रेयी,सावळी पण नाकी डोळी नीटस, गालावर खळी, लांब कुरुळे केस, उंच सडपातळ शरीरबांधा पण तिच्या निखळ आणि निरागस हसण्यात एक तेज होते, अगदीच भुलवणारे..कॉलेजला तर तिला सगळेच ‘ब्लॅक ब्युटी’ म्हणून संबोधायचे..अभ्यासातही चांगली होती.. बाबांचा जीव की प्राण!!जिगर का तुकडा म्हंटल तरी चालेल…

एकुलती एक म्हणजे अगदीच लाडात वाढवली आईवडिलांनी.. विशेष म्हणजे तीन पिढ्यांनंतर मुलगी जन्माला आली होती त्यांच्या घरात..अगदी अलगद तळहाताच्या फोडासारखी जपायचे घरात सगळे तिला.. तिच्या आईने खूप काही सहन केलं होतं लहानपणापासूनच, गरीब परिस्थिती, दारुडा बाप, कमी वयात लग्न, सासुरवास आणि असंख्य अशा तडजोडी ज्या प्रत्येक स्त्रीला कराव्या लागतात म्हणून तिच्या आईने ठरवले होते.. काहीही झालं तरी माझी मैत्रेयी कधीच कशाचीच तडजोड करणार नाही…त्यात वडिलांची तर परी होती ती.. तिने कुठे तडजोड करायचा विचार जरी केला तरी बाबाच अस्वस्थ होत तिचे..

पेहरावपासून तर कुठले शिक्षण घ्यायचे, कुठल्या कॉलेज मध्ये घ्यायचे, नौकरी करायची की नाही अगदी लग्नही करायचं की नाही आणि करायचंही असेल तर कुणाशी करायचा, कसं करायचं तेही तिच्याच मर्जीने होणार असं ठरवलं होतं तिच्या आईबाबांनी.. एवढी मोकळीक आणि मुभा होती तिला..पण तीही खूप सोज्वळ आणि संस्कारी होती.. आईबाबांनी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेण्याचा तिने कधीच प्रयत्नही नाही केला.. शिक्षण पूर्ण केले, नोकरीला लागली.. काही वर्षातच चांगली स्थळ येऊ लागली.. तेव्हाही आईबाबांनी तिला सांगितले , तुला कुणी आवडत असेल तर नक्की सांग आम्हाला आणि तुझा वेळ घे.. तू जेव्हा पूर्ण पणे तयार असशील लग्नाला तेव्हाच आपण पूढे ठरवू.. खरंतर इतकं स्वातंत्र्य मिळायला आणि अशा घरात जन्म घ्यायलाही नशीब लागते..तिला तिच्या आईवडिलांच्या प्रगल्भ विचारांचा खरोखर खूप अभिमान वाटत असे..

बरीच स्थळ तर आईबाबांनीच नाकारली, मोजकीच मुलं तिला बघायला आली त्यात एक स्थळ घरच्यांना आवडल खूप पण त्यांनी तिला कसलाच आग्रह नाही केला.. निर्णय सर्वस्वी तिच्यावर सोपवला होता.. मुलाचे नाव मनीष.. दिसायला छान, मैत्रियीच्या वर्णाचा पण नाकी डोळी तरबेज,अगदी दिलखुलास व्यक्तिमत्त्व आणि स्वभावही खूपच मनमिळाऊ वाटला.. चांगल्या पगाराची नोकरी, घरी बंगला,गाडी, जागा जमीन सगळंच एकदम व्यवस्थित त्यामुळे नकाराची काही सबबही नव्हती.. मनिषला आई नव्हती, त्याला जन्मतःच आईच्या छत्राला मुकावे लागले होते मग घरी फक्त तो आणि त्याचे बाबा जे सतत फिरतीच्या नोकरीला होते.. तेही अगदी समंजस आणि प्रेमळ..मनीष आणि मैत्रियीच्या भेटीगाठी झाल्या.. लग्न ठरवण्याआधी एकमेकांना थोडं समजून घ्यावे असं त्यांना वाटत होते आणि मैत्रियीच्या घरच्यांचाही आग्रह होता की निर्णय घेण्याआधी थोडा वेळ घ्यावा कारण त्यांच्यासाठी तर ती अजूनही छोटीशी परीच होती ना..

मैत्रियी आणि मनीषने लग्नाचा निर्णय घेतला, मनीष च्या बोलण्यातून तो तिला खूपच समजूतदार आणि प्रगल्भ विचारांचा वाटला.. नोकरी कर नको करू, कसलीच जबरदस्ती नाही, तुझ्या मनाप्रमाणेच निर्णय घे, तुझ्या करिअरला महत्व दे असं पहिल्याच भेटीत तो तिला म्हणाला.. व्यक्तिस्वातंत्र्य जपणारा, तिच्या आवडीनिवडी जोपासणारा जसा तिला हवा होता अगदी तसाच.. आईशी शेयर केलं तिने हे सगळं.. आईला मनोमन खूप आनंद झाला माझ्या मुलीला इथंही काही तडजोड नाही करावी लागली.. आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला की आयुष्यातल्या अर्ध्या तडजोडी कमी होऊन बसतात नाही.. तोही तिला तसंच जपेन जसं आपण जपलंय अशी खात्री झाली आईची..

लग्न थाटामाटात पार पडले.. आईबाबांनी काळजावर मोठा दगड ठेवून पोरीचं कन्यादान केलं पण समाधानही होतं की योग्य जोडीदार मिळाला पोरीला..पहिल्या रात्री मैत्रियी थोडी घाबरलेली होती.. जसजसा तो क्षण जवळ येत होता तिची धाकधूक वाढत चालली होती..त्याने लगेच हेरले तिच्या चेहऱ्यावरील हावभाव तो तिला म्हणाला.. “मैत्रेयी आपण थोडा वेळ घेऊया..आधी आपण छान मैत्री करूया..एकमेकांना ओळखुया..कसलीच घाई नाही..तुला जेवढा हवा तेवढा वेळ घे..थकली असशील खूप..आराम कर” आणि तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेऊन त्याने तिला अंगावर पांघरून घातले आणि तो झोपुन गेला. ती विचार करत राहिली किती हा मनाचा मोठेपणा आणि किती समजूतदारपणा..खरंतर त्याचा हक्क आहे आपल्यावर आता पण किती हळुवारपणे त्याने तो नाजूक क्षण हाताळला.. एक मुलगी नेहमीच आपल्या नवऱ्यामध्ये वडिलांना शोधते..तिचा पहिला सुपरहिरो बाप.. त्याची छवी ती नवऱ्यामध्ये बघत असते.. मैत्रेयीला पापणीच्या केसासारखे जपणारे तिचे बाबा आठवले आणि मनोमन सुखावली आणि म्हणाली खूप योग्य निवड केली..आईबाबा तुमची परी तडजोड नाही करतये..?

छान संसार सुरू झाला.. फिरणं, मौजमजा, सिनेमा, शॉपिंग सगळं अगदी मैत्रियीच्या मनासारखं.. एक महिना होत आला लग्नाला.. आता तिलाही आतुरता लागली होती जवळ येण्याची.. त्याचा स्पर्श तिला हवाहवासा वाटू लागला होता..नकळत एकेमकांचे हातात आलेले हात,समुद्रकिनारी बसून गप्पा मारताना तिची त्याच्या खांदयावर विसावलेली मान,पावसात चिंब भिजल्यानंतर झालेले ते ओले स्पर्श सगळंच तिला हुरवून टाकत होते.. तिची इच्छा होती की त्याने जवळ यावे पण तो तसा प्रयत्न करत नव्हता.. तीही पुढाकार घेणाऱ्यातली नव्हती..मग उगीच आपलं लटके, झटके, लाडिक रुसवे फुगवे करायची पण तो लहान बाळासारखी तिची समजूत काढून वेळ काढून नेई.. अजून पंधरा वीस दिवस असेच निघून गेले.. शेवटी मैत्रेयीला वाटले आपणच पुढाकार घ्यावा का?मनीष माझ्या पुढाकाराची वाट बघत असणार का? त्याने पुढकार घेतला आणि माझी इच्छा नसतानाही मी मन मारून त्याच्यासाठी तयार होईल असा तर त्याला वाटत नसेल ना? अशा अनेक प्रश्नांची तिच्या मनात काहूर माजलं होतं.. शेवटी खूप हिम्मत करून तिने निर्णय घेतला की मीच पुढाकार घेते..संध्याकाळी ती छान तयार झाली, त्याच्या आवडीची साडी,हातभार बांगड्या, छानशी टिकली, मोकळे केस, हलक्या गुलाबी रंगाचा लिपस्टिक..ती अगदी आतुरतेने त्याची वाट बघत होती.. दाराची बेल वाजली तसा तिच्या काळजाचा ठोका चुकला.. दारात मनीष..?तिला बघून तो तर पुरता घायाळ झाला आणि गालातल्या गालात मिश्किल हसला.. दोघेही सोबत जेवले.. आज शब्दांची जागा हावभाव आणि इशाऱ्यानी घेतली होती..डोळ्यांनीच बरच काही बोलत होते ते दोघे.. म्हणतात ना प्रेमाला भाषा नसते.. मौनानेही खूप काही बोलता येते..

ती वेळ जवळ आली.. मैत्रेयीने हळुवार मनिषला मागून जाऊन मिठी मारली ..त्यानेही तिला अलगद पुढे ओढून जवळ घेतले.. “खूप छान दिसतेस”असं तो हळूच तिच्या कानात पुटपुटला..तसं तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले..ती नकळत त्याच्या कुशीत हरवत होती.. तोही मिठी घट्ट करत होता..पुढे काही घडणारच तेवढ्यात मनीष तिला म्हणाला, ‘मला अर्जंट फोन करायचा आहे मी आलोच’ तसा तिचा हिरमोड झाला.. पुरती रागावली ती.. रागातच पाय आपटत बेडवर जाऊन झोपली.. तो सॉरी सॉरी म्हणत निघून गेला..अर्धा पाऊण तास झाला तरीही मनीष फोन संपवून आला नाही शेवटी तिचा डोळा लागून गेला.. असच वारंवार काही न काही कारण देऊन मनीष मैत्रेयीला टाळू लागला..सुरुवातीला काही दिवस मैत्रेयीने मनावर नाही घेतले पण नंतर तिला जाणवले की प्रकरण काहीतरी वेगळं आहे, मनीष फक्त याच गोष्टीत तिला टाळतो, बाकी वेळेस तर तो खूप लाड करतो तिचे,जपतो तिला.. ती खूप विचार करू लागली पण कुणाशी शेयर ही करू शकत नव्हती.. आईला सांगितलं तर आई टेन्शन घेईन आणि बाबांशी या विषयावर कसं बोलणार.. शेवटी तिने मानिषशी समोरा समोर बोलण्याचा निर्णय घेतला..

तिने हा विषय त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण तो हसून विषय टाळू लागला.. कामाचं टेंशन आहे, थकवा अशे हे न ते फालतू कारण देऊ लागला.. शेवटी तिच्या संयमाचा बांध फुटला आणि ती खूपच रडू लागली, ओरडू लागली, भांडू लागली त्याच्याशी.. तिचा हा अवतार खरंतर खूप आश्चर्यचकित करणारा होता पण साहजिकही होता.. तिचा तो अवतार बघून मनीष बिथरला..पण ती काही केल्या ऐकत नव्हती तिला उत्तर हवं होतं .. शेवटी मनीष चिडलाच..”एवढी भुकेली आहेस का?शरीरसुख म्हणजेच लग्न का? आणि आधी तर तुला वेळ हवा होता मग आता काय झालं?” त्यावर ती म्हणाली,” लग्नाचा अर्थ जरी तेवढाच नाही तरी लग्नाचा अविभाज्य भाग आहे तो आणि मी घेतला वेळ मला हवा होता तेवढा, या सुखावर माझा एक बायको म्हणून नक्कीच अधिकार आहे आणि मला तो मिळवण्यात कसलीही लाज नाही”! जसजशी ती बोलत होती मानिषला संताप होत होता, तो खूप प्रयत्न करत होता ना चिडण्याचा पण शेवटी त्याचा राग अनावर झाला त्याने तिच्या जोरदार कानाखाली मारली आणि तो ओरडून उठला, “नाही देऊ शकत मी तुला शरीरसुख!!! मी नपुंसक आहे..जा तुला जे करायचं ते कर..” मैत्रेयीच्या पायाखालची जमीन सरकली..

तिला क्षणभर स्वप्नात असल्याचाही भास झाला..पण स्वप्न नव्हतं ते..कटू सत्य होतं.. जी स्वप्न तिने आयुष्यासाठी रंगवली होती, त्या स्वप्नांना भंग करणारं सत्य..तिला मनीषच्या प्रत्येक कृतीचा आणि बोलण्याचा उलगडा होऊ लागला पण वेळ निघून गेली होती.. काय करावे तिला सुचेना.. आईबाबांकडे परत गेली तर ते जगू शकणार नाही आणि त्यांना हे सगळं सांगून इथेच राहिली तरी त्यांना हे कदापि आवडणार नाही की मी एवढी मोठी तडजोड करतेय शेवटी तिने गप्प राहून सगळं सहन करण्याची निर्णय घेतला..तिला वाटले शरीरसुख दुय्यम आहे, मनीष शिवाय ती राहुही शकणार नव्हती, जसं आहे तसं आपली नियती समजून तिने मान्य केलं पण मनिषच वागणं पूर्णपणे बदलून गेले..तो अधूनमधून दारू पित असे पण आता जरा जास्तच दारू पिऊ लागला, रोज शिवीगाळ, मारझोड.. खरतर हेच त्याचं खरं रूप होतं पण मुखवटा आता उतरला होता. मैत्रेयीने खूप प्रयत्न केला त्याला सावरण्याचा पण निष्फळ होतं सगळं… आपलं प्राक्तन म्हणून सहन करत राहिली आणि स्त्री जन्म आणि तडजोड हे नातंच विजोड आहे..आईबाबांनी तडजोड नाही करू दिली कुठेच पण देवही तडजोडीशिवाय स्त्रीचा जन्म लिहीत नसावा असं मानून गुपचूप दुःख गिळत होती.. असेच दोन वर्षे निघून गेली..आईबाबांनी नातवाचा आग्रह करायला सुरुवात केली. तिला सुचेचना काय करावे.. त्याच दरम्यान मानिषला बाहेरगावी नोकरीची संधी आली..तिला मार्ग दिसला..

तिने मानिषला सुचवले, “आपण तिकडेच राहू काही वर्षे, एखादं मुल दत्तक घेऊ तसही आईच्या तब्येतीमुळे माझे आईबाबा एवढा हजार किमीचा प्रवास कधीच नाही करणार आणि तुझे बाबाही नाही म्हणताय सोबत यायला किंवा एक आणखी पर्याय आहे आपण IVF चाही मार्ग निवडू शकतो..कुणाला काहिच समजू द्यायचं नाही.मला मान्य नाही तुझ्याकडे कुणी बोट दाखवलेलं किंवा काही तुला वाईट साईट बोललेलं…” हे ऐकून मानिषचा पारा चढला, त्याचा अहंकार दुखावला गेला.. त्याने पुन्हा मैत्रेयीलाच दोष दिला, शिवीगाळ केली…तिचा धीर संपत आला आता तिने त्यालाच यावर मार्ग काढ म्हणून सांगितले तर त्यावर तो म्हणाला, “जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर तुला सगळं तुझ्यावर घ्यावं लागेल.. तू आई होऊ शकत नाहीस असं सगळ्यांना सांगावं लागेल, मान्य असेल तर ठीक नाहीतर तू जाऊ शकतेस”.. मैत्रेयी कोसळलीच हे ऐकून.. तिला वाटले ज्या माणसासाठी मी इतकी मोठी तडजोड केलीये त्याला आपल्या असण्या किंवा नसण्याचा काहीच फरक पडत नाही??कमतरता तुझ्यात आहे तरीही मी ती स्वतःवर घ्यायची.. आईबाबांच्या घरी कसलीच तडजोड न करणारी मी आज या माणसासाठी संपूर्ण आयुष्यच तडजोड करणार आहे तरी याचा एवढा अहंकार.. का माझ्या नशिबात असं आला असावं.. तिची स्वतःवर चिडचिड होत होती पण तरीही शांतच राहिली..

पुढे मनीष तिच्यावर संशयही घेऊ लागला.. मग हळूहळू अन्याय अत्याचार वाढत गेले.. तिच्या सहनशक्तीचा अंत बघत होता जणू तो.. शेवटी तिने ठरवले या माणसासोबत आयुष्य वाया घालवण्यात काहीच अर्थ नाहीये.. तिने आईबाबांना सगळं सांगण्याचा निर्णय घेतला.. आईबाबांना सगळं सांगितलं.. त्यांच्या परिच्या आयुष्याला ग्रहण लागलं होतं हा धक्का तिची आई पचवू शकली नाही, मनोमन स्वतःला दिलेलं वचन की मुलीला तडजोड करू देणार नाही हे ती पाळू शकली नाही याचा धसका घेऊन तिने आपलं जीव सोडला.. वडीलही पुरते कोसळले होते पण लेकरासाठी सावरलं स्वतःला आणि लेकीलाही.. घटस्फोट घेतला..बाबांनी कठीण परिस्थितीत खूप साथ दिली तिला.. ती आज मानाने नोकरी करतेय आणि स्वतःच स्वतंत्र आयुष्य जगतेय..बाबांची सेवा करतेय आणि ताठ मानेने आयुष्याचा लढा लढतेय..

पण हा लढा इथेच संपत नाही मित्रमैत्रिणींनो.. म्हणतात ना लोक घोड्यावरही चालू देत नाहीत आणि पायीही चालू देत नाही.. कोण काय बोलते तर कोण काय.. रोज एक नवीन लांछन तिच्यावर लावले जाते..पण ती खंबिररीत्या उभी राहतेय.. डगमगते, कोसळते पण परत उभी राहते पुन्हा एक तडजोड करून की लोक असेच असतात आपणच तडजोड करायला हवी.. सतत नोकरी बदलते पण ती पोहचण्याआधी तिच्या जीवनाच्या हृदयद्रावक कहाणीची आपल्या सोयीनुसार बदललेली लक्ख्तर तिथंही वेशीवर टांगलेली असतात मग पुन्हा एक नवीन तडजोड..

का?? खरंच काय चूक होती मैत्रेयीची आणि तिच्यासारख्या असंख्य स्त्रियांची ज्या काहींना काही कारणास्तव नवऱ्यापासून वेगळ्या होतात.. फक्त हीच की ती नवऱ्याच्या सोयीनुसार वापरलं जाणारं खेळणं बनायला नकार देते?? ‘स्त्रीलाच तडजोड करावी लागते संसार टिकवायला’ हे वाक्य मी जास्त स्त्रियांच्याच तोंडून ऐकलं आहे ..एक स्त्रीच दुसरीला तडजोड करायला सांगते.. एखादी त्याला विरोध करून वेगळी होते मग आपण मोकळे तिला दोष द्यायला पण रोज ती या जीवनाच्या जीवघेण्या प्रवासात कुठे ना कुठे तडजोड करतच असते.. पण ही तडजोड कुणीच समजून घेत नाही..

सत्य घटनेवर आधारित..

लेख आवडल्यास लाइक आणि कमेंट जरूर करा.. नावसाहित शेयर करायला काहीच हरकत नाही..

©®सुवर्णा राहुल बागुल

#माझलेखन (स्त्री आणि तडजोडीचं नातं)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत