त्या चार लोकांचा विचार करण सोडल मी आता …

Written by

नात्यात पूजा होती म्हूणन आम्ही सर्व गावाकडे लगबघिने निघालो, १० वाजताचा वेळ सांगितला होता काकूने पूजेचा, आम्ही विचार केला १२ पर्यंत पूजा आटोपते मग जेवण आणि सर्व नातेवाईकांनाशी बोलणं होईल आणि आम्ही सगळं आट्पुन २ पर्यंत मोकळे होऊन परतीचा मार्ग पकळू. अगदी दिवसाच्या आत घरी पोहचता येईल. पण गावी पोहचलो, तर कळलं पूजा १२ वाजताची ठरली आहे, काकूला म्हटलं, “फोन करून कळवायचं ना” त्या म्हणाल्या, “तुम्ही येणारच होते तर, काय कळवायचं? दोन तास इकडे कि तिकडे.” मी विचार केला असू देत, आपण जेवण नाही केलं तरी चालेल पण दिवसाच्या आत घरी पोहचायला पाहिजे. लहान मुलं सोबत असले कि वेळ हातात ठेवावी लागते. आणि मी ही कामात मदतीला लागली, बायकांमध्ये बसून होती तर गोष्टी गोष्टीत कळलं कि भटजी दोन पर्यंत येणार आहेत.

मी काकूला परत जाऊन विचारलं तर त्या म्हणाल्या, “होतेच वेळ, आता ते भटजी निघाले आहेत येतीलच, थांब ना आज उद्या जा.” मी म्हटलं, “थांबणं तर शक्यंच नाही, मुलीची शाळा, आमचं ऑफिस आणि मुख्य म्हणजे लहान मुलीची इंजेकशन साठी अपॉईनमेंट आहे. आणि २ वाजता पर्यंत निघालो नाही तर थंडी खूप वाढेल, मुली सोबत आहेत, कस जाणार? आधी सांगितलं असतं तर सर्व अडजेस्ट करूनच आम्ही आलो असतो ना, राहण्याच्या हेतूने.” मग काकू म्हणाल्या, “बघ बाबा, असं निघून जाण तुला शोभत का, चार लोक काय म्हणतील.” असं म्हणून त्या भटजीला फोन करण्यात बेझी झाल्या.

आता माझ्या समोर मोठा प्रश्न होता, काय करावं, थांबलं तर आमची घरी पोहचे पर्यंत वाट लागणार हे नक्की, आणि प्रवास म्हटलं कि काय होईल सांगता येत नाही, आणि थांबलं नाही तर मग चार लोक काय म्हणतील ह्या विचाराने मन खात होत. काय करावं सुचत नव्हतं. जर कुरकुर केली, तर सगळे जमलेले लोक मलाच सुनवतील आणि माझ्याबद्दल हवं तस बोलतील. एका ठिकाणी मुलींना घेऊन विचार करत बसले होते.

विचार करता करता मला दोन वर्षा आधीच प्रसंग आठवला. माझी मोठी मुलगी ३ वर्षाची आणि लहान अगदीच ४ महिन्याची होती, एका जवळच्या नात्यात लग्नाला गेलो होतो आम्ही, दहाच लग्न २ ला लागलं, सगळं आटपून आणि सगळ्यांच्या आग्रहास्तव आम्ही नीघेपर्यंय ५ वाजले होते आणि आम्ही निघालो होतो. टुव्हीलर वर होतो आम्ही, अचानक पाऊस सुरु झाला मग एका झाडाखाली उभे होतो, पण पाऊस थांबेच ना, उलट समोर वीज पडली होती तर रास्ता बंद आहे असं लोक बोलत होते, मग नजीकच्याच गावातील बस स्टॉप बघितलं आणि थांबलो तेथे सकाळ पर्यंत. हे मला बोलत होते आणि मी त्यांना कि लोक म्हणतील तसच वागायचं का? हे मला म्हणत होते “तूच तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल असं म्हणत सर्वांशी बोलत बसली होती, आता येतील का ते चार लोक तुझ्या मदतीला, बघ कस पोरीचं अंग तापतंय” मी हि चिडचिड करतच म्हटलं “तुम्ही पण तर हलत नव्हते जागून, आता कुठे आहेत तुमचे ते जिवलग मित्र, बोलवा त्यांना”. एकमेकांवर आरोप करत आणि मुलींना सांभाळत सकाळ झाली आणि आम्ही निघालो. घरी परते पर्यंत कुणाचाच फोन नव्हता, कि आम्ही पोहचलो कि नाही कि काय, मनात एवढी खंत वाटली कि ज्या चार लोंकाच्या आणि नातेवाईकांच्या मनासाठी तिथे छोट्या मुली घेऊन अगदीच पाच वाजे पर्यंत थांबले त्यान्ना तर माहीतही नाही कि आम्ही कुठल्या प्रसंगाला तोंड दिल म्हणून. मग मीच फोन लावला मामी आज्जीला, आणि सांगितलं तर त्या म्हणाल्या, “तुला समजायला हवं होत मुली सोबत आहेत म्हणून, तुला कुणी बांधून ठेवलं होत का, आम्ही आपली विनंती केली होती” मी फोन ठेवला आणि मला कळून चुकलं कि, मी थांबली आणि असं काही घडलं तरी ते चार लोक बोलतीलच आणि नाही थांबली असती तरी ते चार लोक बोलतीलच.

ह्यांनी मला हात लावून विचारलं कि काय करायचं, मी लगेच भानावर आले आणि ताबोडतोब उत्तर दिल, “नाही…. आपण निघूया, ह्यांच्या हो मध्ये हो करत राहील तर वाट लागेल आपली आणि आपण कितीही सांगितलं तरी कुणाला कळणारच नाही” काकू ला सांगितलं तेव्हा त्याना वाईट वाटलं कि, मी पूजेला थांबत नाही म्हणून आणि बाकी नातेवाईकही कूज बुजत होते पण मी परवाच केली नाही. एकीने तर बोलूनही दाखवलं कि मग आलीच कशाला? मी हि म्हटलं “अग ताई, तुम्ही तुमची सोय बघत आहात ना, माझ्या इथे थांबल्या ने किंवा न थांबल्याने पूजा तर होणारच ना, पण ते तुमच्या सोईनुसार, तुम्ही ठरवतांना सर्वांचा विचार केला का, आणि तुमच्या मनाप्रमाणे वागलं नाही तर मला चार लोकांची पर्वा नाही असं म्हणता, उलट माझं काही बर वाईट झालं तर तुम्हीच बोलणार कि स्वतःला समजायला पाहिजे होत ना वगैरे वगैरे .. ” हे माझ्या कडे बघतच राहिले आणि मी उत्तर दिल “त्या चार लोकांची पर्वा करणं सोडलं मी आत्ता ..”

आपला समाज नेहमी समोरच्याला गृहीतच धरतो, सामोच्याने अगदी आपल्या मानाप्रमाणेच वागावं असच वाटत सर्वांना, समोरचा माणूस काय अडजेस्ट करून येतो आणि त्यालाही त्याच बरच काही लागून असते. किंवा एखादी गोष्ट तो कुठल्या हेतूने, कुठल्या परिस्थितीत करतो हे ते चार लोक कधीच समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात आणि आपण ते चार लोक काय म्हणतील ह्या विचाराने नेहमीच गुरफटून जातो आणि कधी कधी तर एखाद्या संकटालाही सामोरे जातो..

मी तर ते चार लोक कधीच बघितले नाही आणि मुख्य म्हणजे मी आता त्यांचा विचारच करत नाही ..आणि तुम्हीही त्या चार लोकांचा विचार करूच नका.. ते कधीच आपल्यासोबत नसतात आणि ते कधीच कुणाचे नसतात…

मग ह्या नवीन वर्षात हा संकल्प नक्की करा कि कुठलीही गोष्ट करतांना त्या चार लोकांचा विचार करूनच नका ….

धन्यवाद!!!

शुद्धलेखनाच्या चुका माफ करा ?

©उर्मिला देवेन
नोट – सदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. माझी पोस्ट माझ्या नावासोबत शेअर करायला माझी काहीच हरकत नाही. पोस्ट चोरून/ कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावाने प्रसिद्ध केल्यास कादेशीर कारवाही करण्यात येईल.

 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा