थँक्यू वेलकम

Written by

#थँक्यू_वेलकम

अहो,अहो ती कानातली बुच काढा आधी.

हं,काढली.बोल काय ते.

काय बोलायचं.सगळंच सांगाव लागतं तुम्हाला.घरात लक्ष असतं कुठे तुमचं.नुसतं आपला तो मोबाईल एके मोबाईल.

अगं सीएम कोण बनणार ते ऐकत होतो.
कोणीही बनुदे तिकडे.महागाई आहे तशीच रहाणार.ती नेतेलोकं आपापलं गाठोडं भरतील पैशानं.तुमच्या अजून अंगाला पाणी नाही.पारोशे कुठचे.

जातो जातो

आणि हो पिंटूच्या शाळेत पेरेंट्स मिटींग आहे उद्या.पिंट्या खूप मस्ती करतो.म्हणून यावेळी त्याच्या बाईंनी तुम्हाला बोलवलंय खास.

मस्ती करायला?

उगा पीजे मारु नका.उद्या सुट्टी घ्या.

सुट्टी साहेब देणार नाही गं.खूप कामं पेंडींग आहेत ऑफिसात.

मी म्हणते पेंडींग रहातच कसं तुमचं काम. इथे लोळता गाढवासारखं तसंच तिथं लोळत असाल खुर्चीत बसून.लोळालोळी कारभार सगळा.ते काही नाही.तुम्ही पेरेंट्स मिटींगला जाणार आहात म्हणजे आहात.

(अहो वरमतो.गुपचूप ऑफिसात जातो.त्याच्या चेहऱ्यावरचं टेंशन पाहून त्याचा मित्र त्याला विचारतो.)

काय पक्या.आज वहिनींनी फायरिंग केलं वाटतं सकाळीच सकाळी.

हो रे नुसती कटकट च्यामारी

पण काय झालं काय?

अरे पिंटूची पेरेंट्स मिटींग आहे व त्याने काहीतरी उपद्व्याप करुन ठेवलेत म्हणून त्याच्या बाईंनी मला बोलवलंय उद्या.

अरे पिंटूच्या टिचर मिसेस शाह ना.

हो हो.

कसल्या दिसतात सांगू यार.एकदम टकाटक.आमच्याच सोसायटीत रहातात.मागच्या वर्षी आमच्या चिंगीच्या क्लासटिचर होत्या.मी स्वतः जातीने सगळ्या मिटींग्स अटेंड केलेल्या.

काय सांगतोस काय यार!

अरे गुड मॉर्निंग जरी म्हणल्या नं तरी अंगात गुदगुल्या होतात.मीही येऊ का तुझ्यासोबत मित्र म्हणून.

नको नको बाय द वे थँक्स फॉर सॉल्विंग माय इश्यू.

क्या यार दोस्त बोलता है और थँक्स कहेता है,चल मी जातो कामाला.

(दुसरादिवस..सकाळ..अहो लवकर उठून तयार होतो..अगं उठते.)

अगं बाई हे कुठे गेले?मॉर्निंग वॉक सुरु करतायत वाटतं पण बाथरुममधून पाण्याचा आवाज कसा येत़ोय?

(अहो न्हाऊन बाहेर येतो व तयार होऊ लागतो.)

अगं पिंटूला उठव हं.मी त्याला घेऊन पेरेंट्स मिटींगला जातो.

अरे वा!आज अगदी शहाणं झालं बाळ माझं.

लाडात नको येऊ.चहा टाक थोडासा.

(पिंट्याचीही तयारी होते.)

अहो हे काय?गुलाबी रंग आवडत नाही नं तुम्हाला मग हा मी वाढदिवसाला दिलेला गुलाबी शर्ट का घातलात?
तेही पेरेंट्स मीटींगला जायला आणि किती ती पावडर पीठवाला भैया तरी बरा.बाई बाई सेंट वगैरे.

अगं सहजच

(अहो पिंट्याला घेऊन शाळेत जातो,वाटेत लाल गुलाबाची फुलं घेतो.)

हां या प्रथमेशचे(पिंट्याचे)बाबा.
(प्रथमेश टिचरला रोजेस देतो.टिचर थँक्स म्हणते.अहो लाजत वेलकम म्हणतो.)हा प्रथमेश नं फार मस्ती करतो वर्गात. मुलींच्या वेण्या ओढतो.कुणाच्या बेंचवर च्युईंगम लावून ठेवतो. मुलींच्या बऱ्याच कंम्प्लेंट्स येतात याच्याबद्दल.

थँक्यू बाई

अहो थँक्यू काय म्हणताय?

वेलकम

अहो,प्रथमेशचे बाबा,वेलकम काय नी थेंक्यू काय.तुमच्या मुलाला सुधरा आधी. कुठून एकेक नमुने येतात!बाप बेटे सारखेच वाटतात.

अगं बाई आलात पण घरी.

मम्मी आम्ही पिझ्झा खाऊन आलो डोमिनोजमधून.तुझ्यासाठी पण आणलाय.

अरे वा,थँक्यू हं.

अगं मम्मी, टिचर आज मुळी रागावलीच नाही.म्हणजे टिचरने ज्या माझ्या कंप्लेंट्स सांगितल्या त्यावर उत्तर न देता पप्पा नुसतेच थँक्यू, वेलकम करत टिचरच्या चेहऱ्याकडेच बघत होते.टिचरला कानकोंड झालं अगदी.शेवटी टिचर पप्पाना नमुना म्हणाली.

(अगं लाटणं घेऊन येते)

अगं बाई मारू नको गं लागतं गं.अग्गाई..मेलो..मेलो!

कुठे हवं थँक्यू, कुठे हवं वेलकम बोला.

(सपासप लाटण्याचे वार.अहोंच्या मार चुकवत रशिउड्या)

आणि मम्मी पप्पांनी मला छान रेड रोजेस घेऊन दिले टिचरसाठी.मी टिचरला दिले.टिचर थेंक्यू बोलली तर पप्पा तिला वेलकम बोलले.

पिंट्या तो बाथरूमातला खराटा आण इकडे.मला मेलं एखादा गजरा आणत नाही नी रेड रोजेस नेऊन देतात काय!

मम्मी मम्मी हा घे खराटा.

सपासप वार.

अगं बाई बसं करं गं.झोंबतं गं लई!

——गीता गजानन गरुड,आंब्रड.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा