दमलेल्या आईचे आत्मकथन…

Written by

आई होणं जगातला सर्वात सुंदर अनुभव, पालकत्व…केवळ माणसाचच नाही तर अखिल मानवजातीचं पालकत्व सांभाळणाऱ्या ईश्वराचं, माणसाला भरभरून देणाऱ्या निसर्गाचं आणि पिल्लाला घास भरावणाऱ्या पशु पक्ष्यांचं सुद्धा…आपण एक जबाबदार व्यक्ती आहोत, आपल्याला कुणाचं तरी संगोपन करायचंय, तो आपलाच अंश आहे ही भावनाच पालकत्व आपोआप फुलवत जाते… आई झाल्यावर सुरवातीचा टप्पा म्हणजे एक मोठी कसोटी, अशाच एका दमलेल्या आईचं हे आत्मकथन.. “आज खूप दिवसांनी आरशात पाहिलं आणि स्वतःला खरोखर ओळखू शकत नव्हते मी, बाळाला जन्म दिलेल्या दिवसापासून आजवरचे 13 महिने, यातला एकही दिवस मी सलग 4-5 तास झोप घेतलेली मला आठवत नाहीये, जेवण करणं म्हणजे मला मोठं संकट उभं राहतंय, बाळ सोडायला तयार नाही, कधी ताट ओढतो, कधी रांगत रांगत बाहेर पाळतोय, कधी धरपडतोय… प्रत्येक घासागणिक मला उठावं लागतंय, खरकटे हात त्याचा कपड्यांना लागून कपडे धुवायचं कामही वाढत चाललंय, जेवण अर्धवट कोंबून ढसाढसा पाणी पिऊन परत बाळाच्या मागे पळावे लागतेय…अंघोळ करायची झाली तर 5 मिनिट साठी बाळाला आजीकडे सोपवायचं, पण ते 5 मिनिट सुद्धा बाळ धीर ठेवत नाही, बाथरूम बाहेर येऊन दार वाजवतय…मग आज साबण न लावताच अंगावर पाणी ओतून घेतलं..चिकट झालेले केस धुवायचं स्वप्न गेल्या महिन्यापासून मी बघतेय पण वेळच मिळत नाहीये… कुणी पाहुणे आले की त्यांना चहा पाणी देण्याचं काम एका हाताने करावं लागतंय, कारण दुसऱ्या हातात बाळ कडेवर असतं, पोरगं दुसर्याकडे जात नाही आणि खाली बसवलं की रडणं सुरू, कित्येक दिवसापासून मी एका हाताने कामं करण्यात तरबेज झालीये..

बाळासोबत सतत असतांना माझे नैसर्गिक वेग कित्येकदा रोखून ठेवले…कुणीतरी मदतीला यावं, बाळाला अर्धा तास का होईना बाहेर न्यावं, मला किमान 5 मिनिट तरी मोकळं करावं असं स्वप्न बघणारी मी आई.. बरोबरच्या मुली नोकरीच्या ठिकाणचे नाताळ साजरा केलेले फोटो फेसबुकवर जेव्हा टाकत होते तेव्हा माझं बाळ माझ्या सर्टीफिकेट च्या फाईल वर उड्या मारत होतं, घरी बसून काहीतरी काम करण्यासाठी एका कंपनीचा फोन येणार होता, फोन आला..एका हातात बाळ दुसऱ्या हातात फोन, फोन उचलला तसा बाळाने फोन हिसकवायचा प्रयत्न केला, मी फोन पक्का पकडून ठेवला तर राग येऊन तो इतका जोरजोरात रडायला लागला की समोरच्याला कानठळ्या बसून त्याने फोन कट केला…एक फोन करणं, एक मेसेज करणंही मुश्किल होऊन बसलंय… आतेबहिनीच लग्न होतं, सगळ्या बहिणी आणि नातेवाईक आलेले, खूप मजा करायची होती…छान सजायचे होते,

लग्नाच्या दिवशी कशीबशी एक चांगली साडी शोधली, ब्लाउज मात्र होत नव्हतं, मग मिळतं जुळतं दुसरं शोधलं, कशीबशी तयार होऊन लग्नाला पोहोचले, सगळे जण नाचत होते..मी मात्र बाळाचं डायपर बदलत होते…टाळी लागली आणि सगळे स्टेज वर बोलवत होते, मी मात्र वधू कक्षात बसून बाळाला दूध पाजत होते….

कपाट अवरायचंय, साफसफाई करायची आहे, डबे घासायचेत, कपडे धुवायचेत, अंगण धुवायचं आहे, कपडे इस्त्री ला टाकायचेत…कितीतरी काम सोडून आलीये…

2 वर्ष झाली एखादा सिनेमा पाहिलेला आठवत नाहीये, हॉटेल मध्ये बसून निवांत जेवण केलेलं आठवत नाहीये, एखाद्या मैत्रिणीशी मनसोक्त गप्पा केलेल्या आठवत नाहीये…वाईट नाही वाटतं… पण मिस करतेय सगळं…

बाळासाठी 24 तास राबताना, येतात काही जण…बाळाचं संगोपन कसं करावं, तू आई म्हणून किती चुकीचं संगोपन करतेय याचं प्रवचन द्यायला…मग त्यांच्या हो ला हो द्यावंं…बाळ त्यांच्याकडे सोपवावं…दुसऱ्या सेकंदाला बाळाने रडणं सुरू करावं आणि धर तुझं बाळ म्हणत घाबरत त्याने पळ काढावा…

असे अनुभव गाठीशी बांधून चाललंय माझं आईपण…

अशी दमलेली मी, आजारी पडणं मला मंजुरच नाही…मी आजारी पडले तर आराम करणं मला परवडणारं नाही…अंगावर फार तर फार काढू शकते…चक्कर येतेय, रक्त कमी झाल्यासारखं वाटतंय, जो येतोय तो हेच बोलतोय की तब्येत फारच खराब झाली तुझी…मग बाळाच्या गोलमटोल तब्येतीकडे पाहून फक्त हसून उत्तर द्यावं….

अशी जीव मेटाकुटीला आलेली मी, बाळा शेजारी असते, अंगात त्राण नसतो, जीव रडकुंडीला आलेला असतो…अशातच बाळ आपल्याकडे बघून जेव्हा मिश्किल आणि गोड हसतो, तेव्हा वर सांगितलेल्या सगळ्याचा एका क्षणात विसर पडतो, आणि परत सुरवात होते पालकत्वाच्या दुसऱ्या दिवसाची….”

(लेखाच्या प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे आहेत)

© संजना इंगळे

 

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा