दमलेल्या चिमुकलीची कहाणी

Written by

दमलेल्या चिमुकलीची कहाणी,..
©स्वप्ना मुळे(मायी)
आज सकाळी स्कुलबस मध्ये चढताना आपलं फुलपाखरू जास्तच खुश आहे हे बाबाला जाणवलं स्टॉप वर बसची वाट बघत असताना बाबा म्हणाला ,”काय आज चिऊताई एकदम खुश,…काही रड रड नाही कुरकुर नाही अगदी मजेत चाललं आहे बाबा एका पोरीचं आज,…नाहीतर रोज,…..”
बाबाच बोलणं तोडत चिऊ म्हणाली,..”अरे आज सेकंड शनिवार मग आई घरी आहे,…म्हणजे मला शाळेतून घरी उतरायचं आहे,…बाबा मला बोर होतं रोज शाळेतून पाळणाघरात जायला,.. पण आज नाही जायच रोज खुप वेळाने भेटता तुम्ही आज आई शाळा सुटली की लगेच भेटेल,..तेवढ्यात बस आली,… आनंदाच पाखरू उडून गेलं बसमध्ये,…
त्याने घरी येताच तिला सगळा संवाद सांगितला त्यांचा,…तिच्या डोळ्यात तर खळकन पाणीच आलं,…आपण आपल्या ह्या रहाटगाडग्यात किती गृहीत धरलं आहे ना तिला,… घरात असणारे आजी आजोबा दुर्दैवाने देवाने लवकर नेलेत मग आपल्यालाही पर्याय नव्हता,…ती येई पर्यंत मी सगळी काम उरकून ठेवते म्हणजे ती आली की सगळा वेळ तिलाच आजचा,… तू सुध्दा आम्हला फोन करू नकोस आज तिने नवऱ्याला बजावलं,..
दुपारी बेल वाजली हिने दार उघडलं,…आईडू माझी म्हणत ती गळ्यात पडली,…तो चिमुकल्या हातांचा हार हिला तर स्वर्गच दोन बोट वाटला त्या क्षणी,…असं रोज शाळेतून येताना ही मिस करत असेल आपल्याला,…मग दोघी एकत्र जेवल्या,…..आईने आवडती शेवयाची खीर केली म्हणून आणखीनच आनंद,…पोटभर खाल्ली,…आईला उगाच वाटलं रोज असं आवडीचं दुपारी मिळतही नसेल तरी राहात आपलं बाळ पाळणा घरात,…मग दोघींनी खुप मजा मस्ती केली,..गोष्ट वाचायला पिल्लु आईच्या कुशीत येऊन झोपलं,… खिरीने सुस्ती आलीच होती,..आईच्या गळ्यात हात टाकून गोष्ट ऐकत झोपी गेलं,… आईच्या मात्र डोळ्याला धारा लागल्या,…आपली नोकरी,..ह्यात पिल्लुचं हे बालपण असंच ओझरत मिळेल तेंव्हा अनुभवावे लागेल आपल्याला,…तिला गळ्याच्या हातांची मिठी घट्ट झाल्याची जाणीव झाली जणू पिल्लाला पण हे आईच्या उबेचे क्षण हवेच होते आणि असेच रहावेसे वाटत होते,…
आपल्याला वाटतं आपणच थकतो ,दमतो जॉब घरातली काम करून पण आज चिऊला बघून वाटलं ते हि आपल्या सोबत संघर्षच करत असतात त्यातूनच शिकत असतात आणि मग कधीतरी आपण मिळालो की मग ती ऊब साठवून ठेवत असतील आपल्या अनुपस्थितीत आठवायला हो ना…😢😊
©स्वप्ना मुळे(मायी)औरंगाबाद

Article Tags:
Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा