दिल,दोस्ती दुनियादारी!! भाग-१

Written by

“तुला समजत नाहीये का रे ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाहीये. मीच काय आपल्या सगळ्या ग्रुपच्या मित्रमैत्रिणींना तसंच वाटतंय.. त्यात तुला विनय किती जवळचा आहे..माझ्यापेक्षा जवळचा नाही मला माहितीये पण आपल्यात सगळ्यात समंजस आणि शांत डोक्याने विचार करणारा तोच आहे, हे तर तुला मान्य आहे ना? मग आज तू आमच्या सगळ्यांच्या बोलण्यावर एकदा विचार करावा असं आम्हाला वाटतं कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि लग्नही एकदाच होते.. आपण कितीही म्हंटल ‘चार पल की जिंदगी’तरी खूप मोठा आणि खडतर प्रवास असतो तो.. त्यात योग्य जोडीदार मिळाला तर खूप सोपा होतो तो प्रवास पण जर का इथे गणित चुकलं तर सगळ्या आयुष्याची राखरांगोळी होईल रे! तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना मी? माझ्यावर एवढा विश्वास तर असेलच तुझा की विनाकारण कुठलीच गोष्ट तुला मी करायला भाग पाडणार नाही आणि आजपर्यंत मी तुझ्या प्रेमप्रकरणात भाग घेतला का? अलिप्त राहिले तुझ्या त्या विषयापासून, खूप गोष्टी कानावर येत होत्या तिच्याबद्दल पण सपशेल दुर्लक्ष केलं मी कारण तिसऱ्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवणाऱ्यातली मी नाहीच. आणि राहिला प्रश्न मी का तुला हे सांगतेय तर माझा काय स्वार्थ असणार यात माझ्या बेस्ट फ्रेंडचं आयुष्य खराब होऊ नये एवढंच वाटतं मला म्हणून आज चार वर्षानंतर एवढे बोलायची हिम्मत केली.. तुझ्या लग्नाचे प्लॅन सारखे सारखे पुढे ढकलले जाताय, तिच्या बाजूने काही न काही कारण काढून ती वेळ घेतेय दोन वर्षांपासून.. माझ्या मनात तरी शंकेची पाल चुकचुकतेय, आता तुझा निर्णय तू घे पण विचार करून घे कारण अजूनही वेळ हातातून गेली नाहीये! “Sometimes delay in plan is God’s protection”…आणि एवढं सगळं बोलूनही मी सांगेन जरी तू तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला तरी आम्ही मित्र मैत्रिणी तर आहे तसेच राहु सदैव तुझ्यासोबत पण आमची कळकळीची विनंती की तू पुन्हा एकदा विचार करावा.”मीरा राघवला फोन वर समजावत होती.

मीरा आणि राघव एकमेकांचे बेस्ट फ्रेंड अगदी जय आणि वीरूच्या शोलेच्या दोस्तीला लाजवेल एवढी घट्ट मैत्री त्याची अगदी कॉलेजपासून. इतकी घट्ट मैत्री की कॉलेज मध्ये अफवा होती की त्या दोघांचं नक्की काहीतरी असेल पण या मीरा आणि राज त्यांचाच वर्गमित्र त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होतं.. हळूहळू सगळ्यांचा गैरसमज दूर होत गेला आणि मीरा व राज कॉलेजचे बेस्ट आणि फेवरेट कपल म्हणून ओळखले जाऊ लागले. जरी ते दोघे प्रेमात आकंठ बुडाले होते तरी त्यांनी कधीच त्यांच्या इतरांसोबतच्या मैत्रीवर त्याचा परिणाम होऊ दिला नाही. राज खूप समंजस आणि प्रेमळ होता तशी मीरा एकदम तडफदार आणि फटकळ.. पण तितकीच हळवी..अगदी तलवारीची धार तिच्या जिभेवर होती..खोटं वागणं बोलणं कधी रुचलच नाही तिला. जे बोलेल ते मनापासून आणि अगदी खरं म्हणून तर सगळ्यांची अवडतीही होती ती वर्गात..

अगदी नऊ जणांचा मोठा ग्रुप होता त्यांचा.दोघी मुली बाकी सगळे मुलं.. कॉलेजचे कमिटी मेंबर्स होते सगळे मग कॉलेज फंक्शन,पार्टी याचं नियोजन करता करता खूप वेळ सोबत घालवायचे..राघवही खूप समजूतदार.. अकरावी बारावीत एक गर्लफ्रेंड होती त्याची पण काही कारणास्तव नाही टिकलं पुढे ते नातं आता पुन्हा प्रेमात पडण्यावरही विश्वास नव्हता त्याचा. तसाच विनय..राघवचा खास मीरा पेक्षा कमी पण खूप जवळचा मित्र.. सगळ्यात शांत, समजूतदार.. सगळ्यांचे प्रॉब्लेम समजून घेऊन शांत डोक्याने सोडवायचा पठ्ठा.. अगदी फॅमिली प्रॉब्लेम पण.. त्याच्याशी बोलून सगळ्यांना हलकं वाटायचं.. विनयचं मराठी भाषेवर अभूतपूर्व प्रेम.. कधीकधी तर त्याचं बोलणं बॉउन्सर जायचं सगळ्यांना पण नेहमी हसत खेळत राहणारा हा ग्रुप..मीराचा प्रियकर राज नव्हता हा या ग्रुपमधे पण मीरा व राज छान जपत होते एकमेकांचे आणि स्वतःचेही मित्र मैत्रिणी आणि त्यांचं नातंही..

कॉलेजचे दिवस भुर्रकन उडून गेले. सगळे नोकरी निमित्ताने वेगवेगळ्या शहरात गेले. सुदैवाने मीरा आणि राजला एकाच शहरात मुंबईत नोकरी मिळाली. पण विनय पुण्यात तर राघव नागपूर..बाकी मित्र सगळे पुढचे शिक्षण घेण्यात व्यस्त झाले. ते हळूहळू बाहरेच्या जगातले अनुभव घेत, कॉलेजच्या आठवणी काढत नोकरी करत होते.विनयला काही दिवसांनी मुंबईत नोकरीची संधी चालून आली, त्याचा इंटरव्ह्यू छान झाला, पाहिजे तसं पॅकेज मिळालं.. मग तर तो लगेचच शिफ्ट झाला मुंबईत. मीरानेच तिच्या एक कंपनी कलिग सोबत राहायची व्यवस्था केली विनयची. आता राज, विनय आणि मीरा अगदी जवळजवळ रहायला होते मग काय दर वीकेंडला मस्त मुंबई दर्शन, मज्जा, धमाल आणि पुन्हा ते मैत्रीचे सोनेरी दिवस जगायला लागले. आठवडाभराचा कामाचा शीण कसा मिनिटात गायब व्हायचा ते तिघे भेटले की..

मीरा एका मुलीच्या होस्टेलला राहत होती, राज त्याच्या नातेवाईकांसोबत आणि विनय रूम भाड्याने घेऊन..होस्टेलला मिराची सगळ्यांशी फक्त तेव्हढ्यापुरतीच मैत्री. तसंही ती वीकेंड घरी जायची किंवा राघव राजसोबत बाहेर असायची आणि सगळ्याच मुली नोकरी करणाऱ्या त्यामुळे एवढे बोलायला आणि खूप घट्ट मैत्री व्हायला पुरेसा वेळही मिळत नव्हता. त्यात होस्टेलचे नियमही कडक, रात्री दहानंतर कुणीच कुणाच्या रूममध्ये जाणार नाही, मिराला वाचनाची भयंकर आवड, ती आपली जेव्हा बघावं तेव्हा पुस्तकात तोंड खुपसून बसलेली असायची.त्यामुळे फारशी कुणाशी मैत्री झाली नाही तिची. पण एक मुलगी स्वतःहून बोलायची मीराशी..खूप गप्पा मरायची, पुस्तकांबद्दल कुतूहल दाखवायची, मिराच्या लॅपटॉपमधे त्या दोघी मग छान विषयांवर वाचन करायला लागल्या, मूवी बघायला लागल्या, एकमेकींसोबत वेळ घालवू लागल्या त्यामुळे चांगली मैत्री झाली दोघींची.विधी तिचं नाव. ती ही जॉब करत होती मुंबईत.

मीराच्या गप्पांमधे नेहमी फक्त तिची फॅमिली, मित्र मैत्रिणी आणि तिची पुस्तकं एवढंच असायचं.. एकही मित्राला न भेटता विधीच्या नजरेत विनय, राज, राघव सगळ्यांची हुबेहूब प्रतिकृती उभी राहिली होती. विधीला खूप उत्सुकता होती मीराच्या मित्रांना भेटायची. त्यात राजला भेटण्याची जास्त करण मीरा त्याच्या समजूतदारपणाचे खूप गोडवे गात असायची जिथे “एक लडका लडकी कभी दोस्त नही हो सकते” चा ट्रेंड आहे तिथे राजचा मीरावर किती विश्वास..राज आणि मीराचं हे विश्वासावर टीकलेलं नात या सगळ्यांचं विधीला खूप अप्रूप वाटत होतं..तिने निखळ मैत्री कधी अनुभवलीच नाही..ती नेहमी मीराला म्हणायची की तू खूप नशीबवान आहेस तझे एवढे छान मित्र आहेत.. आणि राघवलाही भेटायचं होत तिला कारण मीराचा बेस्ट फ्रेंड कसा असेल हेही तिला बघायचं होतं..

मीराने विधीची ओळख राज आणि विनयशी करून दिली. हळूहळू तीही त्यांच्यात छान मिक्स झाली. आता ते चौघे मस्त फ्रेंड्स झाले.त्यांच्यात आता फक्त राघव दूर होता पण हे सगळे भेटले की त्याला नक्की फोन करायचे. आणि मीरा आणि राघव तर सगळंच एकेमकांशी शेयर करायचेच.असेच दोन वर्षे निघून गेले… रोज बोलणं, भेटणं नाही झालं तरी एक अनामिक ऋणानुबंध होता त्या सगळ्यांमध्ये मैत्रीचा अतूट..कॉलेजला जशी मैत्री होती तशीच टिकवून होते ते सगळे..सोबत मीरा आणि राज घरी त्यांच्या लग्नासाठीही बोलत होते अद्याप घरचे तयार नव्हते. मीराच्या घरी एवढा प्रॉब्लेम नव्हता पण राजच्या घरी खूपच कठीण परिस्थती होती. खूप विरोध झाला त्याच्या घरून पण ते दोघेही अडून होते, लग्न करू तर एकमेकांशी नाहीतर नाही..

दरम्यान राघवलाही मुंबईत नोकरी मिळावी म्हणून राज, मीरा, विनय सगळेच प्रयत्न करत होते. राघवही खूप कंटाळला होता एकटा नागपूरला. तोही खूप ठिकाणी एप्लिकेशन टाकत होता. अखेर त्याला मुंबईच्या एका ठिकाणी इंटरव्ह्यूचा कॉल आला.

आता पुढे काय होईल? राघवचं सिलेक्शन होईल का? ते सगळे एकत्र येतील का? असं काय झालं की मीरा राघवला फोनवर समजावते आहे? राज आणि मीराच्या रेलशनचं पुढे काय झालं?

क्रमशः

कथा आवडल्यास लाइक आणि कंमेंट करा. पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी मला नक्की फॉलो करा.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत